Jitendra Awhad : “मी एवढंच बोलेन की…”, आव्हाडांनी व्यक्त केला खेद, काय बोलले?
Jitendra Awhad : प्रभू रामाबद्दल केलेल्या विधानावर जितेंद्र आव्हाड यांनी सविस्तरपणे भूमिका मांडली. इतिहासाचे संदर्भ दिल्यानंतर त्यांनी खेद व्यक्त केला.
ADVERTISEMENT

Jitendra Awhad explanation on Controversial statement : “राम हा बहुजनांचा आहे. तो शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता”, या जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षातील नेत्यांनी आव्हाडांवर टीका केली. अनेक ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करत तक्रारी देण्यात आल्या. दरम्यान, वाद वाढल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला.
शिर्डी येथे पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांनी भूमिका मांडली. आव्हाड म्हणाले, “मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणे हे माझं काम नाही, पण काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू राम… त्या श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की, ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाहीये, पण जे याविरोधात उभे राहिले, त्यांच्या माहितीसाठी सांगतो की, वाल्मिकी रामायणात सहा कंद आहेत.”
वाल्मिकी रामायणात लिहिलं आहे -जितेंद्र आव्हाड
“बाला कंद, अयोध्या कंद, अरण्य कंद, रिषी कंद, सुंदर कंद आणि युद्ध कंद… त्याच्यातील अयोध्या कंदातील सर्ग ५२ आणि श्लोक १० आणि १०२ हे आहे. एक दस्ताऐवज आहे. १८९१ चं दस्ताऐवज आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रकाशित झालेले आहे. ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायणा. ममता नाथा दत्त यांनी भाषांतरित केलेले आणि गिरीशचंद्र चक्रवर्ती यांनी प्रकाशित केलेलं”, असे आव्हाड पुराव्यांबद्दल बोलताना म्हणाले.
हेही वाचा >> रोहित पवारांचा आव्हाडांना डोस; म्हणाले, “नको त्या…”
“वाल्मिकी रामायणामध्ये काही लिहिलं असेल, तर त्यावर कुणाचा आक्षेप आहे का? असेल तर त्यांनी सांगावा. खरंतर चित्रपटाबद्दल मला बोलायचं नाही. १ डिसेंबर २०२३ ला अन्नपुराणी चित्रपट आला आहे. दक्षिणेतील सुपरस्टार त्यात आहेत. वाल्मिकी रामायणातील एक श्लोक त्यांनी म्हटला आहे आणि त्याचा अर्थही सांगितला आहे. तेही माझ्याकडे उपलब्ध आहे. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही”, अशी भूमिका आव्हाडांनी मांडली.










