Manoj Jarange : समाजासाठी विकली जमीन, हॉटेलात केलं काम; कोण आहेत मनोज जरांगे?
Who Is Manoj Jarange patil : जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात मनोज जरांगे हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे कोण आहेत? मनोज जरांगे यांनी कधीपासून सामाजिक कार्याला सुरुवात केली?
ADVERTISEMENT
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात पुन्हा ऐरणीवर आलाय. सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेला हा विषय चार वर्षात अडगळीत पडला होता. पण, आता पुन्हा एकदा मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. याला कारण ठरली ती आंतरवली सराटी गावातील घटना. याच घटनेनं मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. पण, याची सुरूवात झाली ती मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणामुळे. मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी असंख्य लोक आले. त्याच्यावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. आता सरकारकडून मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जरांगे यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी काय हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. (Who Is Manoj Jarange Patil)
ADVERTISEMENT
मराठा आरक्षणा मिळावं, या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारमधील नेत्यांनी चर्चा केली. पण, लवकर निर्णय घ्या, अशीच मागणी मनोज जरांगे करत आहेत. आता मनोज जरांगे पाटलांबद्दल सांगायचे म्हणजे ते मूळ बीड जिल्ह्याचे रहिवासी. गेवराई तालुक्यात माथोरी हे त्यांचं मूळ गाव. मनोज जरांगे शहागडचे जावई आहेत. काही वर्षांपूर्वी ते जालना जिल्ह्यातील शहागड शहरात स्थायिक झाले. मागील 12-15 वर्षांपासून ते इथेच राहतात.
हेही वाचा >> ‘अरे व्वा! तुम्ही काय केलं असतं?’, राज ठाकरे फडणवीसांवर भडकले
जरांगे यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीभूमीबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालं आहे. आई-वडील, पत्नी, चार मुलं आणि तीन भाऊ असं त्यांचं कुटुंब आहे. मनोज जरांगे 2011 पासूनच मराठा आंदोलनात सक्रीय आहेत. सामाजिक कार्याची आवड आणि समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी, यामुळे ते सतत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतात.
हे वाचलं का?
मनोज जरांगेंनी विकली जमीन
सामाजिक चळवळीत काम करत असताना मनोज जरांगे यांनी स्वत:च्या मालकीची जमीन विकली. त्यातून त्यांनी मराठा आंदोलनाला बळ देण्याचं काम केलं. मनोज जरांगेंच्या घरची आर्थिक थिती बेताचीच आहे. पण, ते मराठा आरक्षणासाठी सतत रस्त्यावर संघर्ष करताना दिसतात. ज्यावेळी त्यांनी सामाजिक चळवळीत काम करायचं ठरवलं, त्यावेळी ते हॉटेलात काम करायचे.
हेही वाचा >> गिरीश महाजनांची बैठक निष्फळ, मनोज जरांगे आंदोलनावर ठाम, सरकारसमोर ठेवले दोन पर्याय
जरांगे पाटील यांच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर ते सुरूवातीला काँग्रेसमध्ये होते. पुढे त्यांनी काँग्रेसला सोडली. वेगळं काही करण्याचे निर्णय घेत त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचाराचा मुद्दा राज्यात तापला. या प्रकरणातील आरोपींवर हल्ला केल्याचा आरोप त्यांच्या शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर झाला होता.
ADVERTISEMENT
मनोज जरांगेंनी आधीही केलीत अनेक आंदोलनं
मनोज जरांगेंनी आतापर्यंत अनेक आंदोलनं केली आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यावरून, मागण्यासाठी ते प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसले. त्यांच्या नेतृत्त्वात 2014 मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची चर्चा राज्यभरात झाली होती. 2021 मध्ये मनोज जरांगेंनी जालना जिल्ह्यातीलच साष्ट पिंपळगावमध्ये जवळपास तीन महिने ठिय्या आंदोलन केलं होतं. जरांगे यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना मदतही मिळवून दिलेली आहे. आता मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आंदोलनाचा चेहरा बनले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT