लाइव्ह

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live : संजय निरूपम यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live updates : देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक प्रचारातून एकमेकांवर जोरदार हल्ले करताना दिसत आहे. त्याचबरोबर आपापले जाहीरनामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिरत आहेत. 

महाराष्ट्रातील वातावरणही लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने ढवळून निघाले असून, महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान असलेल्या मतदारसंघांमध्ये पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. 

मोठंमोठ्या सभा, शक्तिप्रदर्शने उमेदवारांकडून सुरू असून, नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. 

महाराष्ट्र आणि देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीबद्दलच्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स...

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 07:05 PM • 03 May 2024

    संजय निरूपम यांचा शिंदे गटात प्रवेश

    काँग्रेसमधून हाकलपट्टी झाल्यानंतर संजय निरूपम यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. '20 वर्षानंतर माझी घरवापसी झाली आहे. माझ्या रक्तात बाळासाहेबांचे विचार आहेत. आता स्वगृही परततोय.' असं संजय निरूपम यावेळी म्हणाले.

  • 04:08 PM • 03 May 2024

    'उद्धवने मला शिवसेना शिकवण्याची गरज नाही'- नारायण राणे

    'महिलांच्या शौचालयाचा मोठा प्रश्न देशात होता. 11 कोटी 72 लाख शौचालय संपूर्ण देशात बांधले. महिलांसाठी घर तिथे नळ आणि पाणी 8 कोटी लोकांना दिले. छत नव्हतं डोक्यावर कुठेतरी सावलीचा आधार घेऊन राहावं लागणार अशी गरीबी आपल्या देशात होती. अशा लोकांना पावणे चार कोटी घरं मोदी सरकार आणि अमित शाह यांनी दिली. माननीय अमित भाईंना सांगेन, हे बसलेले आहेत ना त्यातील 60-65% लाभार्थी आज येथे आहेत. मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील त्यावेळी मी देशातील जी गरीबी आहे आणि देशाला महासत्तेकडे न्यायचं आहे हे काम आम्ही करू. सत्ता येताच आम्ही या कामाला लागू. जातपात, धर्म नाही माणुसकी ही एकच जात आहे. निवडूण आल्यावर आम्ही महिला, युवा, शेतकरी आणि गरीबी अशा 4 जातींसाठी काम करू एवढे विचार स्पष्ट आहेत. शिवसेनेत मी 39 वर्ष राहिलो त्यामुळे उद्धवने शिवसेना शिकवण्याची गरज नाही.' असं नारायण राणे भाषणात म्हणाले. 
     

  • 03:17 PM • 03 May 2024

    Lok Sabha Election Update : "कोण कुणाला लबाड ठरवतंय?", मोदी-शाहांचं नाव घेत पवारांचा शेलारांना सवाल

    मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. 

    'विधानसभा निवडणुकीतील कौल धुडकावून उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याने, तर एकत्र येण्याचा प्रस्ता स्वतःच देऊनही वेळकाढूपणा करणाऱ्या शरद पवारांना भाजपशी लबाडी केल्याने या दोघांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशावरून धडा शिकवला, असे खळबळ उडवून देणारे विधान शेलार यांनी लोकसत्ता ला दिलेल्या मुलाखतीत केले. 

    रोहित पवारांचा शेलारांना सवाल

    "आशिष शेलारजी, तुम्ही आणि तुमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब एक बोलताय, तर तुमचे हायकमांड अमित शाह आणि मोदी साहेब दुसरं बोलताय... तुमच्यात नेमकं कोण कुणाला लबाड ठरवतंय?", असा सवाल पवारांनी शेलारांना केला. 

    "शिवसेना-राष्ट्रवादी फोडल्याचं कारण काय सांगायचं, हे एकतर आपापसात एकमताने आधी ठरवा नाहीतर लोकांना येडं बनवण्याचे धंदे बंद करा... या निवडणुकीत लोकं तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत", असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

     

  • 12:18 PM • 03 May 2024

    Rohit Pawar : "मोदी साहेब, कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का?"

    "या वयात कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत, ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?", असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना लगावला. या विधानावरून रोहित पवारांनी मोदींना प्रत्युत्तर दिले.

    "आदरणीय मोदी साहेब, कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का? 'लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण' अशी तुमची गत आहे….", अशा शब्दात रोहित पवारांनी मोदींना उत्तर दिले.

    "पत्रकारांना कधीही सामोरे न जाणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्रासाठी एक स्पेशल मुलाखत करावी लागतेय, यावरूनच मराठी स्वाभिमानाचा आणि पवार साहेबांचा आपण किती धसका घेतला, हे आज कळलं", असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

     

    "असो! पण मराठी माणूस दिल्लीला कशाप्रकारे झुकवू शकतो याचा एक स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान आहे", असे रोहित पवार मोदींच्या विधानावर बोलताना म्हणाले.

  • ADVERTISEMENT

  • 11:30 AM • 03 May 2024

    Sangli Lok Sabha : '...तर पंचाईत होईल', जयंत पाटलांचे विश्वजित कदमांना चिमटे

    महाविकास आघाडीत चांगलीची जागा वादाचा विषय ठरली. सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेने घेतल्याने विशाल पाटलांनी बंड केलं. यावरून अंतर्गत राजकारण रंगलं होतं. यासाठी जयंत पाटील आणि संजय राऊतांना जबाबदार ठरवलं गेलं. अखेर या सगळ्यांवर जयंत पाटील यांनी मौन सोडलं. 

    महाविकास आघाडीचे सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेत जयंत पाटलांनी विश्वजित कदमांना चिमटे काढले. 

    "महाराष्ट्रातील भाजपचा बुरखा उतरवायचा असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपविरोधात लढलं पाहिजे. कुणाची तरी इच्छा होती, मान्य झाली नाही. पण त्याच्यासाठी आपण आपली दिशा बदलू शकत नाही. आपण ठामपणे चंद्रहार पाटील यांचे काम केले पाहिजे. स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा आपण केली तर पंचायत होईल", पाटील कदमांचं नाव न घेता म्हणाले.

    राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पाटलांचा इशारा

    "विवेकबुद्धी जागृत ठेऊन काम केलं पाहिजे. माझ्या पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटील यांचे काम केलं पाहिजे. दुसरं काही केलं तर माझा शेवटचा नमस्कार असेल. भाजपचा पराभव करताना शिवसेना आणि काँग्रेस सोबत पाहिजेत", असे ते म्हणाले. 

    "आम्ही महाराष्ट्रात 10 जागा लढवतोय. तिथे काँग्रेस आणि शिवसेना आम्हाला साथ देत आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही सर्व मित्र पक्ष हातात घालून काम करतोय. अपवाद फक्त सांगलीचा आहे. हा मतदारसंघ काँग्रेस आणि शिवसेनेच्या चर्चेमध्ये सेनेकडे गेला. शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. हा पक्षाचा निर्णय आहे, आघाडीचा निर्णय एकट्या शिवसेनेचा निर्णय नाही", असे जयंत पाटील म्हणाले. 

  • 10:14 AM • 03 May 2024

    Ahmednagar Lok Sabha : ठाकरेंच्या शिवसेनेतून माजी आमदारांची हकालपट्टी

    Ahmednagar Lok Sabha election Updates : शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदार विजय औटी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. विजय औटी यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निलेश लंकेंच्या विरोधात भूमिका घेतली होती. 

    अहमदनगर दक्षिणचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांच्या निलंबनाचे पत्र काढले आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

    विजय औटी आणि निलेश लंके यांच्यात २०१९ पासून संघर्ष आहे. विजय औटी हे शिवसेनेचे आमदार असताना निलेश लंके हे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. २०१९ मध्ये दोघांनी एकमेकांविरोधात लोकसभा लढवली होती.

  • ADVERTISEMENT

  • 10:01 AM • 03 May 2024

    Lok Sabha Election Maharashtra : "गडकरींची जागा धोक्यात, मविआ 38 जागा जिंकणार" 

    पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांच्या निकालाबद्दल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे.

    लातूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत वडेट्टीवार म्हणाले की, "नितीन गडकरी यांची जागा धोक्यात आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये देशाचा कल लक्षात आला आहे. भाजपबद्दल लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. यामुळे महाविकास आघाडी राज्यामध्ये ३८ पेक्षा जास्त जागा जिंकेल. देशात भाजप दोनशेच्या आत येईल आणि चित्र बदलेल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. 

  • 09:17 AM • 03 May 2024

    Palghar lok sabha Election : शिंदेंच्या खासदारला भाजपचा झटका; पालघरमध्ये सावरा उमेदवार

    पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना झटका बसला आहे.

    शिंदेंच्या शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघात यावेळी भाजपने उमेदवार उतरवला असून, राजेंद्र गावित यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. 

    भाजपने स्वर्गीय विष्णू सावरा यांचे सुपुत्र डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे. 

    शिंदे यांनी ठाणे, कल्याणबरोबरच पालघरची जागा मिळवण्याचे प्रयत्न केले. पण, भाजपची येथे सरशी झाल्याचे दिसून आले. यात फटका राजेंद्र गावितांना बसला आहे. 

    जागा भाजपकडे गेली, तरी राजेंद्र गावितच उमेदवार असतील, अशी चर्चा होती. त्यामुळे गावितांनी प्रचारही सुरू केला होता. पण, त्यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी भाजपमधून प्रचंड विरोध होता. 

    महत्त्वाची बाब म्हणजे राजेंद्र गावित यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी अर्जही विकत घेऊन ठेवला होता. पण, ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाल्याने ते अर्ज भरणार की, हेमंत सावरांच प्रचार करणार, हे बघावं लागेल.

    महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेच्या आणखी एका विद्यमान खासदाराचे तिकीट कापण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेच्या चार खासदारांची तिकिटं कापण्यात आली आहेत. 

    भारती कामडी विरुद्ध हेमंत सावरा

    पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत टळली आहे. ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत बघायला मिळणार आहे. 

    उद्धव ठाकरेंनी भारती कामडी यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांचा प्रचार आधीपासूनच सुरू झालेला आहे. आता हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी मर्यादित कालावधीच महायुतीला मिळणार आहे. 

    पालघर लोकसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची ताकद आहे.

    त्यांच्या पक्षाचे ती आमदार या लोकसभा मतदारसंघात असून, ते कुणाला पाठिंबा देतात, यावरही निकालाचे चित्र अवलंबून असणार आहे. 

    २०२९ मध्ये शिवसेनेचे राजेंद्र गावित विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव अशी लढत झाली होती.

    या निवडणुकीत राजेंद्र गावित यांना ५ लाख ८० हजार मते मिळाली होती. तर बळीराम जाधव यांना ४ लाख ९१ हजार मते मिळाली होती. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. 

follow whatsapp

ADVERTISEMENT