लाइव्ह

Maharashtra Lok Sabha Election Live : शिंदेंच्या नेत्याचं तिकीट कापलं, पालघरमधून भाजपचा उमेदवार जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Eknath shinde, hemant sawara
पालघरमधून भाजपने हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
social share
google news

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live News : जिकडे तिकडे राजकारणाचीच चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता उर्वरित टप्प्यातील प्रचार जोरात सुरू झाला आहे. 

ADVERTISEMENT

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी पुन्हा सत्ता राखण्यासाठी प्रचारात उतली आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीही प्रचारात जोर लावताना दिसत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून भाजप टीका करत आहे. तर 'चारशे पार'च्या घोषणेवरून काँग्रेस भाजपला घेरताना दिसत आहे. 

महाराष्ट्रातही १३ लोकसभा मतदारसंघात पहिल्या दोन टप्प्यात मतदान झाले असून, उर्वरित तीन टप्प्यातील मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्येही प्रचाराचा पारा चांगला वाढला आहे. मोदी-शाह यांच्यासह महायुतीचे नेते मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. दुसरीकडे पवार-ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेतेही फिरत आहेत. 

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणूक, त्यानुषंगाने घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि इतर महत्त्वाचे घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी वाचा लाईव्ह अपडेट्स...

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 10:18 PM • 02 May 2024

    शिंदेंच्या नेत्याचं तिकीट कापलं, पालघरमधून भाजपचा उमेदवार जाहीर

    पालघरमधून भाजपने हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हेमंत सावरा हे दिवंगत माजी मंत्री विष्णु सावरा यांचे सुपूत्र आहे. दरम्यान भाजपने हेमंत सावरा यांना उमेदवारी दिल्याने शिदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झाला आहे. राजेंद्र गावितपुर्वी भाजपमध्ये होते. मात्र तिकीट वाटपानंतर त्यांनी शिवसेनेकडून पालघरची लोकसभा लढवली होता. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारली आहे.

  • 09:13 PM • 02 May 2024

    ''भाजपला घटना बदलाचे डोहाळे लागलेत'', संविधान बदलावरून ठाकरेंचा हल्ला

    भाजप जर रोज खोट बोलत असेल, तर मी खरं बोलायता काय हरकत आहे. भाजपचे माजी मंत्री, माजी खासदार उघड उघड बोलत असतील आम्हाला घटना बदलासाठी 400 पार जागा पाहिजे आहेत. यांना खरंच घटना बदलायची. कारण महाराष्ट्राच आकस यांच्या नसानसामध्ये इतका भिनला आहे. केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या सुपूत्राने ही घटना लिहली आहे. त्याच्या पलिकडे जाऊन एका दलित कुटुंबियांमध्ये जन्मलेला माणूस इतका बुद्धिमान होतो आणि देशाची घटना लिहतो. ही घटना मी कशी पाळायची म्हणून पंतप्रधान म्हणून मी कशी पाळायची. हे कस शक्य आहे म्हणून ही घटना बदला, असा आरोप ठाकरेंनी भाजपवर केला. 

  • 08:23 PM • 02 May 2024

    रोहित पवारांचा अजित पवारांना सणसणीत टोला

    विचार आणि परंपरा जपण्याची जबाबदारी सगळ्यांची असते. दादा पलीकडे का गेले आख्या दुनियेला माहिती आहे.
    जर दादांना साहेबांचा आवाका माहीत असेल तर त्यांचा प्रश्न आहे. मात्र त्यांना आवाका खरंच माहीत असता तर दादांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती. आम्ही का लढतोय हे आम्हाला माहित आहे ते सत्तेसाठी गेले ते त्यांना माहिती आहे. ज्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत ते त्यांच्यासाठी लढताहेत. आमच्यासाठी विचार महत्त्वाचे आहेत म्हणून आम्ही विचारासाठी लढत आहोत. तिथून पैसा ताकद दबाव तंत्र मोठ्या प्रमाणावर असू शकते इथे सामान्य नागरिक स्वाभिमानी लोक व आम्ही सगळेजण पवार साहेबांच्या बरोबर आहोत. पैशाची ताकद मोठी की लोकांची ताकद मोठी. 

    अजितदादांचे पूर्वीचे भाषणे काढावी लागतील. त्यामध्ये दादा स्वतःहून म्हणाले आहेत की सुप्रिया सुळे यांचे काम चांगले आहे. दादा जर आता काही वेगळे बोलत असतील जे पूर्वी बोलले त्याच्या उलट बोलत असतील एवढे बदललेले दादा आम्ही पाहिलेले नाहीत. आजचे भाजपच्या भूमिका सांगणारे दादा हे बदललेले दादा आता सोसायटीमध्ये प्रचार करू लागलेत गल्लीबोळा प्रचार करू लागले आहेत. भाजपने त्यांची लोकल नेते अशी परिस्थिती करून ठेवली आहे आम्ही आधी तेच म्हणत होतो की तुम्ही मोठे नेते आहात तुम्ही देशात फिरले पाहिजे महाराष्ट्र तुम्ही मतदारसंघावरून फिरले पाहिजे भाजपने त्यांना एक स्थानिक नेता करून टाकले आहे.त्यामुळे ते कधी कधी त्यातून अशा स्तरापर्यंत दादा पोहोचत आहेत बारामती मध्ये पूर्वी दहशत होती मात्र कितीही दहशत केली तरी लोकांचा स्वाभिमान हा जास्त महत्त्वाचा असतो 

    स्वाभिमानी लोकांना कळले आहे की आता स्वाभिमान टिकवण्याची व विचार जपण्याची वेळ आली आहे. पुढे बलाढ्य शक्ती आहे प्रचार तंत्र आहे मलिदा गॅंग मोठी आहे असे असतानाही चार जून रोजी कळेल पैशाची ताकद मोठी की लोकांची ताकद मोठी आहे. लोक म्हणतात की आम्ही आमचे घर चालवतो आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला विचार दिले संस्कार दिले आम्ही पुढच्या पिढीला संस्कार देतो अशातच जर आमच्याच कुटुंबात अशी वेळ आली असती की ज्या व्यक्तीला मदत लागते तिथून पळून जातो पळून जाण्याचे दिवस नाहीत म्हणूनच इथली जनता साहेबांच्या पाठीमागे भक्कम आहे. 

    तिकडे मलिदा गॅंग आहे आणि इकडे जनता आहे त्यामुळे जनता विरुद्ध नेता अशी लढत होईल. पक्ष चोरीला गेला चिन्ह चोरीला गेले होते त्यासाठी अजितदादांनी सुप्रिया सुळेंना आधी शब्द दिला होता मी राज्य बघतो. लोकसभेच्या सहा महिने आधी ती सगळी यंत्रणा चोरीला गेली ती सगळी यंत्रणा दादा स्वतःसाठी वापरत आहेत. ज्या मैदानावर गेली 40 वर्ष सभा होते ते मैदानही चोरीला गेले आहे आता सगळेच चोरीला जाऊन जात असले तरी लोकांचा विचार चोरीला जाऊ शकत नाही तोच विचार आणि तीच ताकद आणि विजय हा तुतारीचा झाल्याशिवाय राहणार नाही.

  • 04:58 PM • 02 May 2024

    Brij Bhushan Singh News : ब्रिजभूषण सिंह यांना झटका! भाजपने तिकीट कापलं

    Brij Bhushan Singh Lok Sabha Election Updates : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची १७वी यादी जाहीर केली. या यादीत सगळ्यांचं लक्ष असलेल्या रायबरेली आणि कैसरगंज लोकसभा मतदारसंघामधील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 

    ज्या शक्यता व्यक्त केल्या जात होत्या, त्या खऱ्या ठरल्या आहेत. भाजपने ब्रिजभूषण शरण सिंह याचा पत्ता कट केला आहे. पण, या मतदारंसघातून त्यांचा मुलगा करण भूषण यांना तिकीट दिले आहे. पक्षाने रायबरेलीच्या उमेदवाराचे नावही जाहीर केले आहे. पक्षाने येथे दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

    कोण आहे करण भूषण सिंह?

    भाजपने विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट रद्द करून त्यांचा मुलगा करण भूषण सिंह यांना कैसरगंज मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. करण भूषण सिंह हे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा धाकटा मुलगा आहे. 

    13 डिसेंबर 1990 रोजी जन्मलेला करण भूषण हे एक मुलगी आणि एका मुलाचे वडील आहेत. डबल ट्रॅप शुटिंगमध्ये ते राष्ट्रीय खेळाडू राहिले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, करण भूषण यांनी डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठातून बीबीए आणि एलएलबीची पदवी मिळवली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमाही केला आहे.

    सध्या ते उत्तर प्रदेश कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. ते सहकारी ग्राम विकास बँकेचे (नवाबगंज, गोंडा) अध्यक्षही आहेत. त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे.

  • ADVERTISEMENT

  • 04:41 PM • 02 May 2024

    Thane Lok Sabha Updates : हॅट्रिक झाली पाहिजे व रेकॉर्ड ब्रेक मोडले पाहिजे -एकनाथ शिंदे

    Kalyan Sabha Election 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

    शिंदे म्हणाले, "श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीचा एकही कार्यकर्ता घरी राहिला नाही. रस्त्यावरती आला. आज विजय रॅली झाल्यासारखं वातावरण निर्माण झालं आहे. यावेळी महायुतीची लाट निर्माण झालेली आहे. संपूर्ण राज्यात फिरतोय, 45 डिग्री तापमानामध्येही कार्यकर्ते रस्त्यावरती उतरत महायुतीच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी संकल्प करत आहेत", असे शिंदे म्हणाले. 

    "कल्याण लोकसभेत कुठलेही काम शिल्लक नाही. त्यासाठी कुठलेही पैसे कमी पडणार नाही ही खात्री माझी. पहिल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा मुलगा म्हणून ओळख होती. मात्र, आता श्रीकांत शिंदेंनी त्यांच्या कामातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे."

    "तुम्ही वीस तारखेपर्यंत मेहनत  करा. खासदारांचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे. आतापर्यंतचे सगळे विक्रम उडवायचे आहेत. त्यासाठी जास्त मतदान झाले पाहिजे. त्यासाठी बुथवरती काम करा, जेवढी आपल्याला जिम्मेदारी दिलेली आहे; प्रत्येक मतदाराला बाहेर काढा; तर तुमचं रेकॉर्ड ब्रेक होईल", असे शिंदे म्हणाले. 

    "जे गावाला गेलेत आपले नातेवाईक वगैरे, सगळ्यांना बोलवा आणि त्यांना सांगा आपल्या श्रीकांत शिंदे यांना मत करा. 70 टक्के पेक्षा जास्त मतदान झालं, तर तुम्ही रेकॉर्ड मोडाल. ही निवडणूक कल्याण डोंबिवली नाही, तर देशाच्या नेता ठरवण्याची आहे. यावेळी हॅट्रिक झाली पाहिजे आणि रेकॉर्ड ब्रेक झाला पाहिजे", असे शिंदे म्हणाले.

     

  • 12:54 PM • 02 May 2024

    Nashik Lok Sabha election : तिकीट मिळालं, पण 'हा' उमेदवार हेमंत गोडसेंचा खेळ बिघडवणार?

    Hemant Godse Shiv Sena Candidate : शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यात हेमंत गोडसेंना यश आले आहे. तीन विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आल्यामुळे गोडसे यांची धाकधूक वाढली होती, पण अखेर त्यांची उमेदवारी जाहीर झाली. 

    हेमंत गोडसे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. कारण नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी दाखल केली आहे. शांतिगिरी महाराज हे उमेदवारी मागे घेण्यास नकार देत आहेत. इतकंच नाही, तर निवडणूक लढवणार आणि जिंकणार, असा पवित्रा शांतिगिरी महाराजांनी घेतला आहे. त्याचा थेट फटका गोडसेंना बसेल, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे हेमंत गोडसेंच्या चिंतेत शांतिगिरी महाराजांनी भर घातल्याची स्थिती सध्या तरी आहे.

  • ADVERTISEMENT

  • 12:29 PM • 02 May 2024

    Maharashtra Lok Sabha election Updates : "उद्धव ठाकरे हसून सांगत होते की...", फडणवीसांचा घणाघात

    देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. महाराष्ट्र दिनी भाजपच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

    यात कार्यक्रमात फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्र तयार होत असताना काँग्रेसकडून अनेक लोकांना हुतात्मा करण्यात आले. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले होते की, 'ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ माझ्यावर येईल त्यावेळी माझं शिवसेना नावाचे दुकान मी बंद करून टाकीन' आणि परवा त्यांच्या सुपुत्राची प्रेस कॉन्फरन्स मी पाहत होतो."

    "ते हसत सांगत होते की, 'उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार काँग्रेसच्या वर्षाताई आता मी तुझा मतदार आहे. तुझ्या पंजाचे बटन दाबून मी काँग्रेसला मतदान करेल. काय वाटलं असेल वंदनीय बाळासाहेब यांच्या आत्म्याला...? खुर्ची करता हा ऱ्हास आपल्याला पाहायला मिळत आहे", अशी टीका फडणवीसांनी केली. 

    "एकीकडे बाळासाहेबांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचारांशी पूर्णपणे प्रतारणा करायची. बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असतील पण विचारांचे मालक एकनाथराव शिंदे आहेत. विचारांना जिवंत ठेवण्याचे, हिंदुत्व जिवंत ठेवण्याचे काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने केले आहे", असे फडणवीस म्हणाले.

  • 12:06 PM • 02 May 2024

    "...तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल"

    Pune Lok Sabha election Update : पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलं. 

    "ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस सत्तेत नसतील तेव्हा त्यांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल", असे मत धंगेकर यांनी मांडलं आहे. 

    ठाकरेंचं कौतुक करताना धंगेकर म्हणाले की, "आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री आपण पाहिले आहेत, पण कोरोना काळात केलेलं श्रेय हे उद्धव ठाकरे यांना द्यावं लागेल."

    पवार कुटुंबात पडलेल्या फुटीवर त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, "पवार कुटुंब फोडू नये असे कार्यकर्त्यांना वाटत होते. पण, दादांना कसे नेले ही सगळ्यांना माहिती आहे. भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला त्रास दिला. आता अजित पवारांना काय करतील सांगता येत नाही", असं धंगेकर म्हणाले.

  • 10:30 AM • 02 May 2024

    Sanjay Raut : "निवडणूक आयोग मोदी-शाहांच्या पकडीमध्ये गुदमरलाय" 

    निवडणूक आयोगाने दोन टप्प्यातील मतदानाची आकडेवारी काही दिवस लोटून गेल्यानंतर जाहीर केल्याने शंका उपस्थित होत आहेत. विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. 

    शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत याबद्दल म्हणाले की,"या देशात निवडणूक आयोगाने मोठा घोटाळा केला आहे. हा विषय गंभीर आहे. निवडणूक आयोग हा मोदी शाहांच्या पकडीमध्ये गुदमरलेला आहे. निवडणूक आयोग मोदी-शाह यांच्या हातातील बाहुले बनला आहे. काल जाहीर केलेल्या आकडेवारी मध्ये मोठी तफावत आहे. आणि मतदान झाल्यानंतर 11 दिवसांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. ज्यात  6-8 टक्क्यांची वाढ आहे. हे जादा करून घेतलेले मतदान कोणाचे हा मोठा प्रश्न आहे", अशी शंका राऊतांनी उपस्थित केली आहे. 

  • 10:17 AM • 02 May 2024

    Maharashtra News Update : किरण सामंत आता 'या' जागेवरून लढवणार निवडणूक?

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या किरण सामंत यांची निराशा झाली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता किरण सामंत हे दुसऱ्या निवडणुकीच्या तयारी लागले आहेत. (Kiran Samant News)

    किरण सामंत आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातून तयारीला लागल्याचे दिसत आहे.

    लांजा-राजापूर मतदारसंघाची जबाबदारी किरण सामंत यांनी स्वतःवर घेतली असल्याचं शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी जाहीर केलं आहे. किरण सामंत यांच्या उपस्थितीत हे सांगितलं. 

    किरण सामंत यांनी लांजा-राजापूर विधानसभा मतदार निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यात आता त्यांनी या मतदारसंघाची जबाबदारी घेतल्याने ते विधानसभेच्या तयारीला लागल्याचे म्हटले जात आहे.

  • 08:50 AM • 02 May 2024

    Madha Lok Sabha Election Updates : अभिजित पाटलांचा मोठा निर्णय, मविआला धक्का

    माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण पुन्हा बदललं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. (Abhijeet Patil Latest News) 

    अभिजित पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच त्यांनी कारखाना वाचवण्यासाठी कुणालाही पाठिंबा देऊ, असे म्हटले होते. 

    त्यानंतर मंगळवारी रात्री अभिजित पाटील यांनी कारखाना सभासद, पदाधिकारी आणि आपल्या कार्यकर्त्याची बैठक घेतली. याच बैठकीत त्यांनी भाजपला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. या बैठकीला भाजपचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही हजेरी लावली होती. 

    महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने काही दिवसांपूर्वी अभिजित पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. बँकेने साखरेची पोती असलेला गोदामही सील केला आहे. ४४२ कोटी रुपये कर्ज प्रकरणी ही जप्तीची कारवाई केली गेली.

    लोकसभा निवडणुकीमुळे अभिजित पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरले होते. सोलापुरात शरद पवारांच्या कार्यक्रमात उपस्थित असतानाच ही कारवाई झाली. अभिजित पाटलांवर राजकीय सूडापोटी कारवाई केल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

    क्लिक करा >> माढ्यात खरी लढाई पवार विरुद्ध फडणवीस?

follow whatsapp

ADVERTISEMENT