लाइव्ह

Maharashtra News Live : जालन्यातील ख्रिश्चन धर्मगुरूंनी जरांगे पाटलांसाठी केली प्रार्थना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra News Live Marathi : लोकसभा निवडणुका पार पडल्या. देशात नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे देशातील राजकीय घडामोडी संथ झाल्या असल्या तरी महाराष्ट्रातील घडामोडींना वेग येताना दिसत आहे.

राजकीय पक्षांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून, त्यानुषंगाने सगळेच तयारीला लागले आहेत. भाजप, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांसह छोट्या पक्षांनीही विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. 

राज्यात लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असेच राजकीय समीकरण दिसणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांतील राजकीय पक्षांनी जागावाटपावर जोर देण्यास सुरूवात केली आहे. राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी होण्याचे संकेत मिळत आहेत... याच संदर्भातील घडामोडींची माहिती वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये....

ADVERTISEMENT

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:24 PM • 11 Jun 2024

    Maharashtra News : आम्ही काल दिल्लीत होतो, कुठेही मतभेद नाहीत- अजित पवार

    आम्ही काल दिल्लीत होतो, कुठेही मतभेद नाहीत. माध्यमांतून काहीही बातम्या लागल्या. फडणवीस यांनीही वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी सांगितलं राज्यमंत्री स्वतंत्र कारभार हे पद दिलं जाईल, पण आमच्याकडून प्रफुल्ल पटेल आहेत, ते कँबिनेट‌ मध्ये राहिलेत, तेव्हा आम्ही सांगितलं ‌आम्ही पद स्वीकारणार नाहीत. आम्ही एनडीएतच राहू, जुलैपर्यंत आपले राज्यसभेत तीन सदस्य होतील असे अजित पवार यांनी सांगितले

     

  • 05:12 PM • 11 Jun 2024

    Jalna News : जालन्यातील ख्रिश्चन धर्मगुरूंनी जरांगे पाटलांसाठी केली प्रार्थना

    जालन्यातील ख्रिश्चन धर्मगुरूंनी जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी ख्रिश्चन समाज बांधवांनी जरांगे यांच्यासाठी प्रार्थना करत जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिलाय. मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. आज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. जालन्यातील ख्रिश्चन धर्मगुरूंनी जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेऊन त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडे प्रार्थना केलीय. यावेळी ख्रिश्चन समाज बांधवांनी जरांगे यांच्या मागणीला आणि उपोषण आंदोलनाला पाठिंबा दिलाय.

  • 02:21 PM • 11 Jun 2024

    Maratha Reservation: सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ काटेवाडी गावातील ग्रामस्थ एकवटले! 

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मूळ गावी काटेवाडीत ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून मंत्री करण्याची सरपंच आणि ग्रामस्थानी एकमतानी मागणी केली. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेतल्यास बारामती व पुण्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळून काम करण्याची ऊर्जा मिळेल ग्रामस्थांची मागणी आहे.

  • 02:19 PM • 11 Jun 2024

    Maharashtra News : ठाण्यात कोसळतोय मुसळधार पाऊस; ठिकठिकाणी पाणीच पाणी

    ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पहिल्याच पावसात महानगरपालिकेच्या नाले आणि गटार सफाईची पोलखोल झाली आहे. ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरच गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहन चालकसह रस्त्यावर पायी चालत असलेले नागरिकदेखील त्रस्त झाले आहेत.

     

  • ADVERTISEMENT

  • 02:06 PM • 11 Jun 2024

    Manipur Violence Update : मोहन भागवतांच्या विधानांचे मनापासून स्वागत -सुप्रिया सुळे

    मोहन भागवत यांनी मणिपूर हिंसाचाराचा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवा, असे म्हटले आहे. त्यांच्या घेतलेल्या भूमिकेचे सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे. 

    "मी त्यांच्या (मोहन भागवत) विधानाचे मनापासून स्वागत करते. कारण मणिपूर हा भारताचा भाग आहे. आणि जेव्हा आपण आपल्या लोकांना त्रासातून जाताना बघतो, ते खूप वेदनादायी आहे. इंडिया आघाडी खूप काळापासून याबद्दल विचारत आहे. चर्चा करा. सर्वपक्षीय समिती नेमा. भेट द्या आणि त्यांना बळ देऊ. सगळे प्रश्न बंदुकीने सुटत नाहीत. प्रेमाचीही गरज असते. मी मोहन भागवत यांचे आभार मानते", असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

  • 11:52 AM • 11 Jun 2024

    Maratha Reservation: 'गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न', जरांगेंची सरकारवर टीका!

    आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. 'गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे.' असे गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केले आहेत. 'राज्य सरकारला जाणीव असती तर मागणीची दखल घेतली असती.' असंही जरांगे पाटील यावेळी माध्यमांसमोर बोलले.  

  • ADVERTISEMENT

  • 11:07 AM • 11 Jun 2024

    Maharashtra News : 'बारामतीचा दादा बदला', शरद पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी

    युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडे अशी मागणी करत आहेत. युगेंद्र पवार यांना बारामतीमधून उमेदवारी द्या या मागणीसाठी बारामती शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेतील.

  • 11:03 AM • 11 Jun 2024

    Maharashtra News : पेट्रोल पंपावर दुचाकीनेे घेतला पेट, मोठा अनर्थ होताहोता टळला

    छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील बजाज ऑटो गेट समोरील पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असताना अचानक मोबाईल फोन वाजला अन् पेट्रोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी  झालेली नाही. मात्र, गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. प्रसंगावधान राखत दुकजाकीस्वाराने व पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लोटत लांब नेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि आग विझवली.

  • 10:29 AM • 11 Jun 2024

    Maharashtra News Update : ...तर मोहन भागवतांनी हे सरकार खाली खेचावं -संजय राऊत

    "वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे. त्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्याकडे कुणी लक्ष द्यायचे", असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्र सरकारला फटकारले. 

    सरसंघचालकांच्या भूमिकेवर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "हे सरकार हटवा. बोलून काय होतं? मणिपूरमध्ये काय झालं? काल कश्मिरमध्ये काय झालं? मोहन भागवतजी आदरणीय आहेत. बोलतात. पण, सरकार तर त्यांच्या आशीर्वादाने चाललं आहे ना. बोलून काय होतं?"

    "जे अहंकार बाळगतात, त्यांना सत्तेवरून कसं हटवता येईल ते पाहा. मग सरकारला आशीर्वाद कशाला देता? आरएसएस आणि भाजपचा समन्वय नाही. जे.पी. नड्डांनी सांगितले आहे की, आम्हाला संघाची गरज नाही. मोहन भागवतांना वाटत असेल की, हे सरकार राष्ट्राच्या हिताचे नाहीये. राष्ट्राच्या अखंडतेच्या हिताचे नाही, तर मोहन भागवतांनी हे सरकार खाली खेचावं. त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे", असे राऊत यांनी यांनी म्हटले आहे.

  • 09:14 AM • 11 Jun 2024

    Maharashtra News : छगन भुजबळ आक्रमक, सुनील तटकरे काय म्हणाले?

    लोकसभा निवडणुकीत 4 जागाच वाट्याला आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच विधानसभेच्या जागांच्या मुद्द्याला हात घातल्याचे दिसत आहे. जाहीरपणे बोलून एकीकडे महायुतीत दबाव निर्माण केला जात असताना दुसरीकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कान टोचले आहेत. 

    पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सातत्याने पक्षाला जास्त जागा मिळायला हव्यात हा मुद्दा उपस्थित करताना दिसत आहेत. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही भुजबळांनी या मुद्द्याला हात घातला. 

    "विधानसभेला राष्ट्रवादीला ८० जागा मिळायला हव्यात, असे बोललो होतो. त्यानंतर माझ्याविरोधात अनेकजण बोलले. अशा प्रकारे काही बोलू नका मला सांगण्यात आले. पण, माझ्या मते जागावाटपाचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालवून त्याचा फायदा आपल्याला होणार नाही. जागावाटपाचा निर्णय लवकर घ्यायला हवा. त्यानंतर उमेदवार ठरवता येईल", असे भुजबळ म्हणाले. 

    इतकंच नाही तर पुढे ते असेही म्हणाले की, "भाजप मोठा पक्ष आहे. मोठा भाऊ आहे. आम्ही त्यांना सांगितलं आहे की, आमचे सुद्धा ४०-४५ आमदार आहेत. तेवढेच आमदार शिंदे गटाचे सुद्धा आहेत. त्यामुळे शिंदेंना जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्या आम्हालाही मिळाल्या पाहिजे. आता शिंदेंचे खासदार जास्त निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळायला हव्यात असे कुणी म्हणू नये", असे म्हणत त्यांनी जास्त जागांबद्दलची मागणी आग्रहीपणे मांडली. 

    सुनील तटकरे काय म्हणाले?

    भुजबळांनी पक्षाच्या कार्यक्रमात जागावाटपाच्या मुद्द्यावर जोर दिला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भुजबळांचे नाव न घेता याबद्दल काही न बोलण्याचे सांगितले. 

    "आपल्याला लोकसभा निवडणुकीत केवळ चार जागा मिळाल्या. विधानसभा निवडणुकीत काय होईल अशी चर्चा आहे. पण, जागावाटपाबद्दल मंत्र्यांनी आणि इतर कुणी काही बोलू नका. तुम्ही बोललात की, मित्रपक्षाचे प्रवक्ते बोलतात. मग महायुतीतील वातावरण कलुषित होते", असा इशारा त्यांनी दिला.

    अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात एका मंत्रिपदाची संधी असताना राष्ट्रवादीने ते घेण्यास नकार दिला. प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे सुनील तटकरेंची संधी गेल्याचेही बोलले जात आहे. त्यातच आता जागावाटपावरून सतत बोलणाऱ्या भुजबळांना तटकरेंनी नाव न घेता मौन बाळगण्यास सांगितले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षात चाललंय काय? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. 

follow whatsapp

ADVERTISEMENT