संतोष देशमुखांच्या हत्येचा जिथे कट रचला, तिथल्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब आला समोर, वाचून तुम्हीही जाल हादरून!
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत अनेक हादरवून सोडणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र, आता मुंबई Tak च्या हाती लागलेल्या महत्वाच्या माहितीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचताना उपस्थित असलेल्या एकाचा जबाब समोर आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट

हत्या होताना ज्यानं पाहिली त्यानं जबाबात काय म्हटलं?

वाल्मिकचा आदेश, विष्णू चाटेचा निरोप, सुदर्शन घुलेचा शब्द... वाचा सविस्तर
Santosh Deshmukh Case Updates : संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला तीन महिने उलटून गेलेत. संतोष देशमुखांना मारताना हसणारे आणि पाणी मागितलं म्हणून तोंडावर लघुशंका करणारे राक्षसी मनोवृत्तीचे आरोपी, सध्या तुरुंगात आहेत. पण यातील एक आरोपी कृष्णा आंधळे सध्या फरार आहे. तसेच या प्रकरणात SIT ने न्यायालयात चार्जशीट दाखल केलीये. या चार्जशीटमधील महत्त्वाचा जबाब मुंबई Tak च्या हाती लागलाय. वाल्मिक कराड कसा खंडणी गोळा करायचा, त्याच्यासाठी कोण कसं काम करत होतं, कोणाचा रोल काय होता हे समोर आलंय.
हे ही वाचा >> Haribhau Bagde : "अत्याचारी नराधमांना नपुंसक करुन टाका", शिवरायांच्या आदेशाचा उल्लेख केला, बागडे काय म्हणाले?
संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कुठे रचला? कुणी रचला? त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होतं. संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचताना जो व्यक्ती तिथे उपस्थित होता. त्यानं पोलिस जबाबात काय म्हटलंय, ते संभाषण अनेक प्रश्नांची उत्तरं देणारं आहे. SIT ने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सर्व तपास पूर्ण करुन न्यायालयात चार्जशीट दाखल केली. या चार्जशीटमध्ये जवळपास 180 पेक्षा जास्त जणांचा जबाब नोंदवण्यात आलाय. आता याच प्रकरणातला अत्यंत महत्वाचा आणि सुदर्शन घुलेच्या मित्राचा हा जबाब आहे. ज्या व्यक्तीने हा जबाब नोंदवला आहे, त्याने ओळख लपवली आहे.
हत्येचा कट कुठे, कसा रचला? जबाबात काय म्हटलंय?
"सुदर्शन घुले हा कामानिमित्त अंबाजोगाईला येत होता. तेव्हा माझी माझ्या मित्रामार्फत सुदर्शनशी ओळख झाली. मागच्या 8 ते 10 वर्षांपासून माझी आणि सुदर्शन घुलेची ओळख आहे आणि जवळीक वाढल्याने आमची मैत्री झाली. त्यानंतर मी केजला गेल्यावर किंवा सुदर्शन माझ्या गावी आल्यावर आमची भेट व्हायची. तसंच माझ्या नावावर एक सिमकार्ड घेतलेलं, ते सुदर्शन वापरायचा.
6 डिसेंबरला मस्साजोगच्या आवादा वाईन्ड मिलच्या कंपनीच्या आवारात झालेल्या वाद हा जबाब देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मित्राने सांगितला. व त्या भांडणाचा व्हिडीओ दाखवला. त्यामध्ये सुदर्शन दिसला. त्यानंतर सुदर्शनला मी भांडण झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबरला फोन केला व भेटायला येतो, असं सांगितलं. पण मला भेटायला जाणं जमलं नाही", असं जबाबात त्या व्यक्तीनं म्हटलंय.
"त्यानंतर मी 8 डिसेंबरला संध्याकाळी 7 ते 7.30 च्या सुमारास अंबाजोगाईवरुन केजच्या गंगा माऊली कारखान्याच्या आवारात सुदर्शन घुलेला भेटलो. त्यावेळी सुदर्शन घुले म्हणाला की, विष्णु चाटे यांचा फोन आला होता. त्यांनी आपल्याला नांदुर फाट्यावर तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बोलावलंय."
तो म्हणाला "मी, सुदर्शन घुले आणि अजुन एक त्यांचा मित्र हे नांदुर फाटा येथील तिरंगा या हॉटेलमध्ये गेले. तेव्हा तिथे विष्णु चाटे आधीच येऊन बसले होते. त्यावेळी विष्णु चाटे सुदर्शन घुलेला म्हणाले की, आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं. स्वत:ची इज्जत घालवलीस आणि आमची पण इज्जत घालवली. तुला प्लँन्ट बंद करायला पाठवलं होतं, तो तुम्ही बंद केला नाही. उलट तु परत हात हलवत आलास. त्यावेळी सुदर्शन घुले विष्णु चाटेला म्हणाला की, आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो पण तिथे संतोष देशमुख आला. त्याने आम्हाला कंपनी बंद करु दिली नाही. तसंच मस्साजोगच्या लोकांनी आम्हाला हाकलून लावलं.
त्यानंतर विष्णु चाटे सुदर्शन घुलेला म्हणाला की, वाल्मिक आण्णांचा निरोप आहे की, कामही बंद केलं नाही, आणि खंडणीही दिली नाही. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. इतरांना संदेश जाईल की, आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय परिणाम होतात. त्यानंतर विष्णु चाटेने सुदर्शन घुलेला सांगितलं की, वाल्मिक आण्णा कराड यांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा.
त्यानंतर सुदर्शन घुले हा विष्णु चाटेला म्हणाला की, आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा करणार नाही असा बंदोबस्त करुन दाखवतो. आणि त्यानंतर सुदर्शन घुले आणि जबाब देणारा व्यक्ती त्या ठिकाणावरुन निघून आलोत. मी दिलेला हा जबाब खरा आणि बरोबर आहे, असं त्या व्यक्तीनं म्हटलंय." अशा शब्दात हा जबाब नोंदवण्यात आला आहे.
जबाबानंतर निर्माण झाले अनेक प्रश्न...
- जेव्हा आवादा कंपनीचे अधिकारी सुनिल केदु शिंदेंना 29 नोव्हेंबरला विष्णु चाटेच्या फोनवरुन वाल्मिक कराडने खंडणीची धमकी दिली, तेव्हा पोलिस तक्रार का झाली नाही? हा गुन्हा संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर नोंद झाला.
- त्यानंतर 6 डिसेंबरला वाद झाल्यानंतर आवादा कंपनीचे सुरक्षारक्षक सोनवणे यांची अँट्रोसिटीची तक्रार झाली नाही? याचा गुन्हा संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर नोंद झाला.
- विष्णु चाटे आणि सुदर्शन घुलेचं संभाषणावरुन हेच दिसतंय की, वाल्मिक कराड हा खंडणी मागायचा. त्याच्यासाठी विष्णु चाटे आणि सुदर्शन घुले हे केजमध्ये काम करायचे. पण SIT ने जी चार्जशीट कोर्टात दाखल केलीये. त्यात तर खंडणीच्या टोळीचा प्रमुख हा सुदर्शन घुले आहे, असं नमूद आहे. पण ज्यावेळी कट रचला त्या दिवशी विष्णू चाटे सुदर्शन घुलेला सांगतो की, वाल्मिक आण्णा कराड यांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा. म्हणजे वाल्मिक कराडनेच संतोष देशमुख यांच्या हत्येची सुपारी दिली का?
- वाल्मिक कराडचे फोन SIT ने जप्त केले असले तरी, विष्णू चाटेने त्याचा फोन नाशिकमध्ये फेकून दिलाय. तो पोलिसांना अद्याप सापडला नाही. त्यामुळे विष्णू चाटेने कुणाकुणाला वाल्मिकच्या सांगण्यानुसार खंडणी मागितली, फोन शोधून समोर आणलं जाईल का?
हे ही वाचा >> Badlapur Case : "पोलिसांवर FIR दाखल व्हायला पाहिजे...", बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात पोलीसच अडचणीत?
दरम्यान, सध्या समोर आलेल्या या माहितीनुसार सुदर्शन घुलेने तिरंगा धाब्यावर विष्णू चाटेला शब्द दिला आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण केलं व नंतर अंत्यत अमानूष पद्धतीने त्यांना मारण्यात आलं. आता या प्रकरणात आणखी बरेच जबाब नोंदवलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय समोर येणार ते पाहणं महत्वाचं असेल.