शरद पवारांनी दिल्लीतील 'तालकटोरा'मध्ये मराठा योध्यांचे पुतळे बसवण्याची मागणी का केली? इतिहास काय?
Talkatora and Peshwa History : यंदाचं 98 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीतील याच तालकटोरामध्ये पार पडलं. या तालकटोराचा, पेशव्यांचा आणि पर्यायाने मराठा साम्राज्याचा नेमका कसा संबंध आहे हे समजून घेऊ.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुघल सैन्याच्या मधून 25 हजार घोडेस्वार मराठा सैन्य तालकटोरामध्ये कसं पोहोचलं?

संभाजी महाराजांच्या महाराणी येसूबाई यांना मुघलांच्या कैदेतून कसं सोडवलं?

1741 साली महम्मदशाहाने माळव्याची सनद मराठ्यांना कशी दिली?

दिल्लीतील 'तालकटोरा' या ठिकाणाचं वैशिष्ट्य नेमकं काय? वाचा सविस्तर...
मराठी माणूस आणि दिल्ली यांचं थेट संबंध हा इतिहासात अनेकदा आला. प्राचीन भारतापासून असेलली ही राजधानी काबीज करणं ही इतिहासतल्या सर्वांचीच इच्छा राहिली आहे. मात्र, मराठा साम्राज्याने अनेकदा दिल्लीवर यशस्वीरित्या स्वारी केली. जेव्हा जेव्हा दिल्ली आणि मराठी माणसाच्या इतिहासाची चर्चा होते. तेव्हा सर्वात प्रकर्षानं उल्लेख होतो, तो 'तालकटोरा'चा.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधानांच्या सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसंच या पत्रात त्यांनी तालकटोरा स्टेडियममध्ये मराठा योद्ध्यांचे पुतळे बसवण्याची मागणीही केली आहे.
हे ही वाचा >> रत्नागिरी: होळीदरम्यान मशिदीचा गेट तोडला? काय खरं-काय खोटं.. नेमकं प्रकरण काय?
तालकटोरामध्ये मराठी माणसानं पहिल्यांदा पाय ठेवला ती इतिहासातली महत्वाची घटना म्हणून पाहिली गेली. यंदाचं 98 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीतील याच तालकटोरामध्ये पार पडलं. या तालकटोराचा, पेशव्यांचा आणि पर्यायाने मराठा साम्राज्याचा नेमका कसा संबंध आहे हे समजून घेऊ.
दिल्ली जिंकणं शिवरायांची सुरुवातीपासूनचीच इच्छा...
दिल्लीचा आणि मराठी माणसाचा संबंध तसा हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो. कारण, छत्रपती शिवाजी महाराजांचं दिल्ली जिंकणं हे पहिल्यापासूनच ध्येय होतं असं इतिहास अभ्यासक डॉ. उदय कुलकर्णी यांनी सांगितलं. दिल्लीत पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या 'नाते दिल्लीशी मराठीचे' या परिसंवाद पार पडला. प्राचीन हिंदुस्तानाची राजधानी असलेल्या दिल्लीवर आपली सत्ता असावी, ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती. राजाराम महाराजंचं एक पत्र आहे, जेव्हा ते जिंजीला होते तेव्हाचं. मी आता सहा लाख होण बाजूला ठेवलेत. जेव्हा दौलताबाद जिंकू तेव्हा 2 लाख होन, रायगड जिंकू तेव्हा 2 लाख होन आणि दिल्ली जिंकू तेव्हा 2 लाख होन अशी तरतूद करुन ठेवली होती असं उदय कुलकर्णी म्हणाले.
मुघलांच्या कैदेतील शंभूराजेंच्या पत्नीला सोडवलं...
अठराव्या शतकामध्ये मराठे 1719 ला पहिल्यांदा दिल्लीत आले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 12 वर्षात मुघलांची शक्ती कमी झाली होती. हुसैन अली नावाच्या एका दक्षिणेतल्या सुभेदारासोबत मराठा सैन्य दिल्लीत आलं. करोगशाह बादशाहला मराठ्यांनी गादीवरुन हटवलं आणि दुसरा राजा गादीवर बसवलं. त्याच वेळी संभाजी महाराजांच्या महाराणी येसूबाई, शिवाजी महाराजांच्या एक पत्नी आणि त्यांचं इतर कुटुंब 30 वर्ष मुघलांच्या कैदेत होतं. त्या सर्वांची सुटका करुन त्यांना शाहू महाराजांकडे साताऱ्याला घेऊन गेले. त्यामुळे 1719 ची पहिली मोहीम महत्वाची होती असं उदय कुलकर्णी यांनी सांगितलं.
माळवा प्रांतावर मराठ्यांचं प्रस्थ...
1737 च्या मोहिमेकडे प्रख्यात मोहीम म्हणून पाहिलं जातं. त्यामागे अशी भूमिका होती की, माळवा प्रांतावर 1700 पासूनच शिंदे, होळकरांनी हल्ले केले होते. हळूहळू तो प्रांत आपण आपला करुन घेतला होता, मात्र त्यावर कायदेशीर मोहोर लागायची बाकी होती. त्यामुळे सत्ता सनदशीर मार्गाने हस्तांतरीत करायची होती. या प्रक्रियेसाठी दिल्लीच्या दरबारात महम्मदशाह बादशाहाच्या दोन गट पडले. एक गट मराठ्यांशी मैत्री करायला तयार होता, दुसरा तयार नव्हता.
हे ही वाचा >> Sharad Pawar : शरद पवारांनी PM नरेंद्र मोदींचे मानले आभार, पत्रात केली 'ही' मोठी मागणी!
बाजीराव पेशवा यांनी तेव्हा जयपूरहून अनेक वकील पाठवले आणि महम्मदशाह बादशाहला सांगितलं की, माळव्याची सनद आम्हाला द्या. माळव्यावर आमचंच राज्य आहे. जयपूर जवळ असल्यानं ती मान्य करत गेला, मात्र बाजीराव पेशवे जेव्हा परत पुण्यात गेले. तेव्हा काही माळव्याची सनद त्यांनी दिली नाही.
मराठे दिल्लीत तालकटोरामध्ये धडकले...
सनद न दिल्यानं 1737 ला शिंदे, होळकर, बाजीराव, पिलाजी जाधवराव हे सगळे उत्तरेकडे गेले. तेव्हा दिल्लीच्या दक्षिणेला एक लाख मुघल सैन्य होतं. त्यावेळी मुघल सैन्याच्या मधून 25 हजार घोडेस्वार मराठा सैन्य तालकटोरामध्ये आले. दिल्लीतील याच तालकटोरामध्ये बाजीराव, रानोजी शिंदे, मल्हारराव होळकर, जाधवराव यांनी छावणी टाकली होती.
तालकटोरामध्ये कालकाजीच्या मंदिरात मराठे गेले. त्यानंतर घोडे, ऊंट घेतले तेव्हा मुघलांना कळलं की मराठे दिल्लीत आले. मात्र, त्यांना विश्वास बसत नव्हता, की एवढं मुघल सैन्य असताना मराठे दिल्लीत कसे आले. तेव्हा मुघलांनी हेर पाठवले, भिकाऱ्याच्या वेशात ते मराठ्यांच्या सैन्यात घुसले. त्यांनी भीक मागितली आणि भिकेमध्ये जे चने आणि भाकरी मिळाली त्यावरुन मुघलांना कळलं, हे साधं जेवण मराठ्यांच्या सैन्याचंच आहे. मराठे दिल्लीत आलेले आहेत. मग इथे सैनिक आले, इथे लढाई झाली.
1741 ला माळव्याची सनद मिळाली...
त्यानंतर बाजीराव यांच्या पत्रात आपण झीलला गेलो असा उल्लेख आहे. यादरम्यानच एक लाख सैन्य दिल्लीकडे यायला लागलं. तिथून बाजीराव पालमला गेले, राजस्थानात गेले. कारण त्यांचं म्हणणं होतं की, दिल्ली हे एक महास्थळ आहे. आणि मला माहिती आहे की, बादशाहच्या मनात आहे तह करायचा. फक्त दरबारातल्या काही लोकांचा विरोध होता. त्यामुळे मला राजकारणाचा दोरा तोडायचा नव्हता असं बाजीवांची भूमिका होती. त्याप्रमाणेच मग नंतर 1741 साली महम्मदशाहाने माळव्याची सनद मराठ्यांना दिली. तेव्हापासून माळव्यावर रितसरपणे शिंदे, होळकर, पवार यांचं इथे प्रस्थ होतं असं उदय कुलकर्णी यांनी सांगितलं. अशा अर्थानं मराठा साम्राज्याच्या इतिहासात तालकटोराची ही मोहीम अत्यंच महत्वाची होती.
यामुळेच तालकटोरा ही जागा मराठा साम्राज्याच्या इतिहासात अत्यंत महत्वाची असून, याठिकाणी पेशव्यांचा, मराठा योध्यांचे पुतळे बसवण्यात यावे अशी मागणी केली आहे.