Kalyan Lok Sabha Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच महायुतीत संघर्ष सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सुप्त संघर्षाचे भयंकर स्वरूप गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर दिसलं. हा संघर्ष कायम असल्याचे दिसत आहे. त्यातच आमदार गणपत गायकवाड यांच्या विकासकामांच्या बॅनरवरून मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो नसल्याने पुन्हा या चर्चेने डोकं वर काढलं आहे.
ADVERTISEMENT
राज्यात ठिकठिकाणी महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातही असंच चित्र आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून उफाळून येताना दिसत आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर हे अधिक गंभीर झालं. आता पुन्हा एकदा याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर या प्रकणातील आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शिंदेंबद्दल नाराजी, बॅनर ठरलेत चर्चेचा विषय
गेल्या आठवड्यापासून आमदारांच्या निधीतून विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदारांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते केले जात आहे. पण, या कार्यक्रमाच्या बॅनर बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
भाजपाच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो लावले गेले, मात्र एकनाथ शिंदे यांच्या फोटोला स्थान दिले गेले नाही.
हेही वाचा >> गडकरींऐवजी दुसरा उमेदवार? निरीक्षकांच्या प्रश्नाने चर्चांना उधाण
आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसून येतेय. याबाबत सुलभा गायकवाड यांनी बोलताना पक्षाने जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करतेय, असे सांगितलं.
जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सुलभा गायकवाड या आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबतच कार्यरत आहेत. विकास कामांच्या भूमिपूजनाच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो का नाही, असे आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना विचारले. त्यावेळी त्या म्हणाल्या, "भाजपचा कार्यक्रम आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत. त्यामुळे हेतू पुरस्सर काही केल्याचा विषय नाही. भाजपच्या प्रोटोकॉलप्रमाणे हे फोटो लावलेत. हा भाजपाचा बॅनर आहे."
हेही वाचा >> पहिल्या यादीने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचं वाढवलं टेन्शन, कारण...
जेव्हा अजित पवारांच्या फोटोबद्दल त्यांना विचारले, तेव्हा त्यांनी बोलणे टाळले. मात्र, यामुळे एक प्रश्न असाही उपस्थित केला जात आहे की, भाजपचा कार्यक्रम आहे, तर अजित पवारांचा फोटो कसा? त्यामुळे कल्याण पूर्व मत विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप मधील धुसफूस कायम असल्याचे दिसून येत आहे.
शिंदेंचा फोटो न वापरण्याची भूमिका
गोळीबाराची घटना घडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो बॅनरवर लावणार नसल्याची भूमिका घेतल्याची चर्चा होती. त्यानंतर आज भाजपकडून लावण्यात आलेल्या विकास कामांच्या भूमिपूजनाच्या बॅनर मध्ये मुख्यमंत्र्याचा फोटो वगळण्यात आल्याने चर्चेला उधाण आले.
ADVERTISEMENT