शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊतांनी यांनी एक पोस्ट शेअर केली. कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत ते म्हणाले, "महाराष्ट्रात गुंडा राज. गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तृत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे, मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने?", असं ट्विट संजय राऊतांनी केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सुद्धा नीलेश घायवळचा मंत्रालयातला व्हिडीओ शेअर करत शिंदे सरकारवर घेरलं. ज्यामुळे शिंदे विरोधकांच्या रडारवर आलेत, तो निलेश घायवळ कोण?
ADVERTISEMENT
नीलेश बन्सीलाल घायवळ हा पुण्यात गँगस्टर म्हणून ओळखा जातो. नीलेश घायवळच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत होती. त्याच्याविरूद्ध खून, खूनाचा प्रयत्न, मारामारी, दुखापत करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणीसाठी अपहरण, असे एकूण १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
नीलेश घायवळ आणि गजानन मारणे याच्या टोळीच्या वर्चस्ववादातून शहर आणि जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या दोघांच्या दुश्मनीमध्ये पुण्यात कितीतर गँगस्टर्सची हत्या झाली.
नीलेश घायवळ एकेकाळी गजानन मारणे याचा जवळचा मित्र आणि विश्वासू साथीदार म्हणून ओळखला जायचा. मारणे टोळीची दहशत कोथरुडसह पुणे शहर, मुळशी तालुक्यात वाढली. मारणे आणि घायवळने अनेक तरुणांना टोळीत सामील करून घेतले.
मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारात मारणे टोळीने शिरकाव केला. जमीन व्यवहारातून करोडो रुपयांची दलाली, तसेच खंडणी मिळाल्याने टोळीचा वाढली. घायवळ आणि मारणेला मानणारे तरुण टोळीत होते.
वर्चस्व, आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू होता. अखेर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. नंतर मारणे टोळीत उभी फूट पडली आणि घायवळने स्वत:ची टोळी सुरू केली.
गजानन मारणे आणि घायवळ टोळीयुद्धांमध्ये २०१० मध्ये दत्तवाडी परिसरात नीलेश घायवळ व त्याच्या टोळीने गोळीबार करीत सचिन कुडले याचा खून केला होता़.
२०२० मध्ये नीलेश घायवळ कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर पुन्हा कोथरुड पोलिसांनी त्याच्यावर दोन वर्षे हद्दपारीची कारवाई केली. त्यामुळे घायवळ शहरातून बाहेर गेला होता. आता याच निलेश घायवळचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो संजय राऊत यांच्याकडून ट्वीट करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.
ADVERTISEMENT