Allu Arjun Released : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनने आज माध्यमांशी संवाद साधला. काळजी करण्यासारखं काहीही नाही. मी ठीक आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. हे प्रकरण कोर्टात सुरू आहे त्यामुळे मी त्यामध्ये भाष्य करणार नाही. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. पोलिसांना सहकार्य करेन असं म्हणत अल्लु अर्जून यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. रात्रभर तुरुंगात राहिल्यानंतर अल्लू अर्जुनची आज (14 डिसेंबर) सकाळी 6.40 च्या सुमारास सुटका झाली. अल्लू अर्जुनचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता अल्लू अरविंद आणि अभिनेत्याचे सासरे कंचरला चंद्रशेखर अल्लू अर्जुनला घेण्यासाठी हैदराबादच्या चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये पोहोचले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maharashtra News Live Updates : राजा उत्सवात मग्न आणि रस्त्यावर खून पडतातय, हे कसं राज्य?
पीडितेच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करताना अल्लू अर्जुन म्हणाला, ज्या महिलेनं आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या सहवेदना आहेत. ती दुर्दैवी घटना होती. या कठीण काळात या कुटुंबाला शक्य तितक्या सर्व प्रकारे पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना शक्य ते सर्व सहकार्य करण्यासाठी मी त्यांच्या सोबत असणार आहे.
हे ही वाचा >> D Gukesh : गर्लफ्रेंड आहे का? प्रश्न विचारताच गालात हसला, उत्तर देताना गुकेश काय म्हणाले?
पुढे बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला, हे अनावधानाने घडलं आहे. मी चित्रपट पाहायला गेलो, तेव्हा अचानक ही घटना घडली. हे जाणूनबुजून केलेलं नाही. गेली 20 वर्षे मी सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात जात आहे. हा नेहमीच एक सुखद अनुभव राहिला आहे, पण यावेळी परिस्थितीने वेगळे वळण घेतलं.
दरम्यान, अल्लू अर्जुनला कालच या प्रकरणात जामीन मिळाला होता, मात्र त्यानंतरही त्याला तुरुंगातच रात्र काढावी लागली. अल्लू अर्जुन तुरुंगातून सुटल्यानंतर आता त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय. अल्लू अर्जुनची सुटका झाल्यानंतर त्याचे वकील अशोक रेड्डी म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार अल्लू अर्जुनची कालच (13 डिसेंबर) सुटका व्हायला हवी होती. त्यांनी जे केलं ते योग्य नाही. आम्ही कायदेशीर मार्गाने पुढे जाऊ.
ADVERTISEMENT