संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. देशभरात चर्चेत असलेल्या मुद्द्यांबरोबरच सरकारकडून आणल्या जाणाऱ्या विधेयकांवरून हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचं आधीच बोललं जात होतं. मात्र, पहिल्याच दिवशी पावसाळी अधिवेशनातील गदारोळाचे पडसाद उमटले. पावसाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे, विमा विधेयक आणि पेगासस प्रकरणावरून गोंधळ घालणाऱ्या 12 खासदारांना सभापतींनी निलंबित केलं. या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदींसह काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय खासदारांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
पावसाळी अधिवेशनात तीन कृषी कायद्यांसह विमा विधेयक, पेगासस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. विशेषतः राज्यसभेत यांचे तीव्र पडसाद उमटले होते. विरोधकांनी राज्यसभेत सरकारला लक्ष्य करत प्रचंड गदारोळ घातला होता.
सभागृहातील बाकांवर चढून जोरजोरात घोषणाबाजीही केली होती. विधेयकाच्या प्रती भिरकावून लावत सदस्यांनी प्रचंड गदारोळ घातला होता. त्यामुळे सभापतींना काही वेळा कामकाज तहकूब करावं लागलंं. त्याचबरोबर दोन दिवस आधीच अधिवेशन गुंडाळण्यात आलं होतं.
या प्रकरणी 12 खासदारांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा ठपका ठेवत राज्यसभा सभापतींनी निलंबित केलं. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई यांच्यासह 12 खासदारांना हिवाळी अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यात शिवसेनेसह काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीआयच्या खासदारांचा समावेश आहे.
निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची नावं
१)एलामरम करीम (सीपीएम)
२)फुलोदेवी नेताम (काँग्रेस)
३)छाया वर्मा (काँग्रेस)
४)रिपुन बोरा (काँग्रेस)
५) विनय विश्वम (सीपीआय)
६) राजामणी पटेल (काँग्रेस)
७) डोला सेन (तृणमूल काँग्रेस)
८) शांता छेत्री (तृणमूल काँग्रेस)
९) सय्यद नासीर हुसैन (काँग्रेस)
१०) प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना)
११) अनिल देसाई (शिवसेना)
१२) अखिलेश प्रसाद सिंह (काँग्रेस)
पावसाळी अधिवेशनाच्या अखेरीस झालेल्या गोंधळाच्या मुद्द्यावरून आज विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झालेले दिसले. पावसाळी अधिवेशनादरम्यान विमा विधेयक आणि तीन कृषी कायद्यांवरुन विरोधकांनी सभागृह दणाणून सोडलं होतं.
सभापतींच्या समोरील टेबलावर चढत आणि विधेयकाच्या प्रती भिरकावत खासदारांनी सरकार विरोधी संताप व्यक्त केला होता. यावेळी बाहेरुन बोलावलेल्या मार्शलनी गैरवर्तन केल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. त्यावेळी झालेल्या गदारोळाचा मुद्द्यावरून विरोधक आजही आक्रमक झाल्याचं दिसलं. विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातल्यानंतर सभापतींनी 12 खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबित केलं. तसेच कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं.
ADVERTISEMENT