जेलमध्ये असलेल्या लोकांकडून पत्र लिहून घेण्याची नवी फॅशन महाराष्ट्रात आली आहे असं म्हणत सचिन वाझे यांच्या कथित पत्राबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. ही पत्र प्रकाशात आणून सरकारविरोधा गदारोळ माजवला जातो आहे. असं जर करायचं असेल तर तुरुंगात आणखी लोकही बसले आहेत त्यांच्याकडूनही अनेक गोष्टी लिहून घेता येतील हे कुणी विसरू नये असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
Hemant Nagrale Report : ‘सचिन वाझे परमबीर सिंगाचा माणूस’
सचिन वाझेंनी अनिल परब, अनिल देशमुख आणि अजित पवार यांची नावं घेतली आहेत. त्यांचे बोलविते धनी वेगळे आहेत. हे घाणेरडं राजकारण आहे. अनिल परब यांना मी ओळखतो ते असं कधीच करणार नाहीत. बुधवारी त्यांनी अनिल परब यांनी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली आहे, एकही शिवसैनिक बाळासाहेबांची खोटी शपथ घेऊ शकत नाही त्यामुळे माझा अनिल परब यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न काही लोक पहिल्या दिवसापासून करत आहेत. सरकार अस्थिर करू पाहणाऱ्यांचा चेहरा आता समोर आला आहे.
सचिन वाझे ते परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत का?
सचिन वाझे यांनी लिहिलेलं पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागलं आहे. या कथित पत्रात त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब आणि दर्शन घोडावत यांच्यासह अजित पवारांची नावं घेतली आहेत. अजित पवारांचं नाव घेऊन दर्शन घोडावत यांनी आपल्याला कोट्यवधींची वसुली करण्यास सांगितल्याचं या पत्रात सचिन वाझेंनी म्हटलं आहे. तसंच अनिल देशमुख आणि अनिल परब या दोन्ही मंत्र्यांनीही आपल्याला कोट्यवधींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचंही सचिन वाझे यांनी आपल्या कथित पत्रात म्हटलं आहे. हे पत्र एनआयए कोर्टाने स्वीकारलं नाही. कन्फेशन द्यायचं असेल तर त्याची एक पद्धत असते. त्या अनुषंगाने हे पत्र तुम्ही लिहिलेलं नाही असं कोर्टाने सचिन वाझेंना सांगितलं आहे आणि हे पत्र स्वीकारण्यास नकार दिला आहे.
बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो वाझेने केलेले आरोप धादांत खोटे: अनिल परब
हे पत्र समोर आल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत असं म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या दोन मुलींची शपथही घेतली. आता या प्रकरणी संजय राऊत यांना विचारलं असता मी अनिल परब यांना ओळखतो ते असं कृत्य कधीही करणार नाहीत आणि कुठलाही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT