नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं आज (सोमवारी) महाराष्ट्रात आगमन झालं. नांदेडमधील देगलूर इथे हजारो तळपत्या मशालींनी राहुल गांधींचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन गांधी यांनी काँग्रेसच्या उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित केलं. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
ADVERTISEMENT
यावेळी राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणांनी भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, ही यात्रा दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारीमधून सुरुवात केली होती. आता या यात्रेला कोणीही रोखू शकतं नाही. आता ही यात्रा कितीही वादळ आली, तुफान आलं तरी थेट जम्मू – काश्मीरमधील श्रीनगरमध्येच जाऊन थांबेल.
याकाळात छोटे व्यापारी असतील, मजूर असतील, शेतकरी असतील किंवा नागरिक, या सर्वांचं दुःख ऐकणार आहे. ज्यांना बोलायचं आहे, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत, आमचं ह्रदय त्यांच्यासाठी खुलं आहे. आता पुढचे दिवस महाराष्ट्राचा आवाज, महाराष्ट्राचे दुःख, समजून घ्यायाचं आहे, असं म्हणतं राहुल गांधी यांनी यात्रेचा उद्देश सांगितला.
मोदी सरकारवर टीका :
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, देशात बेरोजगारी वाढतं आहे. छोटे व्यवसाय, शेतकरी अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा होता. पण मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांनी हा कणा मोडून टाकला आहे. नोटबंदी, चुकीचा जीएसटी यामुळे हा कणा मोडून पडला आहे. मोदी आता पेट्रोल, गॅसच्या दरांवर बोलत नाहीत. केवळ दोन ते तीन व्यक्तींच्या फायद्याचं बोलतात.
असा असणार राहुल गांधींचा दौरा :
भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात 14 ठिकाणी मुक्काम, 10 कॉर्नर सभा आणि 2 भव्य सभा होणार आहेत. यातील एक सभा 10 नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये आणि एक सभा 18 नोव्हेंबर रोजी शेगावमध्ये होणार आहे. १० नोव्हेंबर रोजीच्या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सहभागी होणार आहेत. शरद पवार हेही दहा तारखेला सभेत सहभागी होण्याची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
ADVERTISEMENT