कोल्हापूर : बेळगावमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केली तसंच कार्यकर्त्यावर लाठीचार्ज केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. दरम्यान, मुश्रीफ यांच्या या आरोपांमुळे सीमेवर तणावग्रस्त वातावरण झालं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
बेळगावमध्ये आजपासून कर्नाटक विधीमंडळाचे अधिवेशन होत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीनं बेळगावमध्ये महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या महामेळाव्यासाठी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांसह, लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलं होतं.
याच मेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या दिशेने जाणार याचा निर्धार केला होता. सकाळी 11 वाजता कागल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या दौऱ्याला सुरुवात झाली.
सीमेजवळ गेल्यानंतर दीड किलोमीटर अंतरावरुन महाविकास आघाडीचे नेते कर्नाटकच्या दिशेने पायी चालत निघाले. यावेळी कोगनोळी टोल नाका इथे दूधगंगा नदीच्या पुलावर आज सकाळपासूनच कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
तिथं पोहोचल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याच ठिकाणी मुश्रीफांनी कर्नाटक सरकार, महाराष्ट्र सरकार, भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध नोंदवत ठिय्या आंदोलन केलं.
त्यानंतर हसन मुश्रीफ यांना महाराष्ट्र पोलिसांनी बाजूला करत पोलीस व्हॅनमध्ये बसवलं. मात्र काही वेळातच सोडूनही दिलं. बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा मोर्चा काढला आणि कर्नाटक पोलिसांचा निषेध करत आपल्यावर लाठीचार्ज झाला असा आरोप केला. तसंच महाराष्ट्र सरकावर गंभीर आरोप केले. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे पळपुटे मंत्री आहेत, असाही आरोप केला.
ADVERTISEMENT