मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी सहाव्यांदा आमरण उपोषणाला आजपासून सुरूवात केली आहे. यावर सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे- पाटलांना रात्री उपोषणाला बसू नका म्हणून फोन केला होता. याबाबत मंत्री शंभूराज देसाई कराड तालुक्यातील तांबवे येथे बोलत होते ते म्हणाले, मला दोन दिवसापूर्वी समजलं मनोजदादा उपोषणाला बसणार आहेत. तेव्हा काल त्याच्याशी बोललो, त्यांना विनंती केली उपोषणाला बसू नका. कारण त्याच्या ज्या काही मागण्या आहेत, हैद्राबाद गॅजेट संदर्भात त्यावर कार्यवाही सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री सतत आढावा घेत आहेत. गुन्हे मागे घेण्यासंदर्भात विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय लवकर घेण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. याच आठवड्यात मंत्रीमंडळ बैठकीच्या एकदिवस अगोदर किंवा नंतर उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मनोजदादांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी शासन सर्व प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे.