राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यात पावसाचा हाहाकार झाला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवव्यात, आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. तर, दुसरीकडे मुंबईतही पावसाने चांगलाच जोर धरला असून मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. परिणामी कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.