पुण्यात रात्रभर तुफान पाऊस सुरु आहे. या पावसामुळे सगळीकडे पाणी साठलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय. काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतय. या मुसळधार पावसामुळं सिंहगड रस्त्याच्या सोसायटींमध्ये पाणी घुसलं आहे. या ठिकाणी मदतीसाठी कोणतीही यंत्रणा आली असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. या जोरदार पावसामुळे पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळं या भागातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केलं आहे.