आठ महिन्यांपूर्वी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला होता. मात्र, हा पुतळा कोसळल्यामुळे राज्य सरकारच्या कारभारावर कडाडून टीका होत आहे. शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्ष देखील सरकारवर टीका करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. संभाजीराजे यांनी या घटनेवर पोस्ट आणि पत्राद्वारे आपले मत व्यक्त केले. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला यासंदर्भात पत्र पाठवले आहे. सोशल मीडियावर त्यांनी या पत्राचा फोटो देखील शेअर केला आहे. कोणत्या अधिकाराने महाराजांच्या किल्ल्यांवर बोलणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.