Ramdas Kadam vs Gajanan Kirtikar : खासदार गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जुने राजकीय घटनांचे दाखले देत उत्तर दिले. त्यांनी राष्ट्रवादी जाण्यासाठी शरद पवारांशी चर्चाही केली होती आणि अनंत गीते पाडण्यासाठी प्रयत्न केले, असे कीर्तिकरांनी म्हटले. त्याला उत्तर देताना कदमांनी गीतेंना मदत न करण्याचं कारण उघड केलं. इतकंच नाही, तर उद्धव ठाकरेंबद्दल एक मोठा दावा करत नवा राजकीय बॉम्ब फोडला.
रामदास कदम यांचा गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे, असं म्हणत गजानन कीर्तिकरांनी माजी खासदार अनंत गीतेंबद्दलच्या एका गोष्टीचा उल्लेख केला. प्रेसनोटमध्ये कीर्तिकरांनी म्हटलं होतं की, “अनंत गीते यांना देखील २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पाडण्यासाठी रामदास कदम यांनी भरपूर मेहनत घेतली. परंतु कोकणातील निष्ठावान शिवसैनिक गीतेंच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे प्रचंड मताधिक्याने ते विजयी झाले.”
हे ही वाचा >> ‘तुमचं पितळ उघड…’, कदमांचा घणाघात, कीर्तिकरांच्या फंडाबद्दल मोठा गौप्यस्फोट
कीर्तिकरांचा खळबळजनक दावे, कदमांनी केला वेगळाच गौप्यस्फोट
याच आरोपाला उत्तर देताना रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. कदम म्हणाले, “गजाभाऊ, तुम्ही म्हणालात की गीतेंशी बेईमानी केली. हा तुम्ही जावई शोध लावलाय गजाभाऊ. २००९ मध्ये अनंत गीतेंच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी मला गुहागरमध्ये पाडलं. हे वास्तव आहे आणि जबाबदारीने बोलतोय. मग उद्धव ठाकरेंना सांगितलं की, मी आता गीतेंचं काम करणार नाही. उद्धवजींनी पुष्कळ प्रयत्न केले मला समजवायचे. मी नाही म्हणालो”, असा नवा राजकीय बॉम्ब कदमांनी फोडला.
हे ही वाचा >> Uddhav Thackery : सरन्यायाधीशांबद्दल बोलणं भोवणार, ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
“गजाभाऊ, मी मराठा आहे. समोरून चालून येणारा माणूस आहे. पाठीत खंजीर खुपसणारा माणूस नाहीये. शरद पवारांचा कुठे संबंधच येत नाही. त्यांना भेटायचा कधी संबंधच नाही. तुम्ही कहाणी बनवली. लोकांचं मनोरंजन केलं. यातून फक्त लोकांना तमाशा बघायला मिळतोय. दिवाळीला पक्षात फटाके फुटताहेत हे शोभणारं नाही”, अशा शब्दात कदमांनी कीर्तिकरांना सुनावलं आहे.
राष्ट्रवादी प्रवेश करण्यासाठी शरद पवारांशी चर्चा
गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांबद्दल असाही दावा केला की, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासंदर्भात शरद पवारांशी चर्चा केली. पवारांसोबत त्यांच्या गाडीत कदमांनी चर्चा केली, असं कीर्तिकर म्हणालेत. त्यावर रामदास कदम म्हणाले, “हे त्यांच्या स्वप्नामध्ये आलं असेल. खेडपासून भोरपर्यंत मी शरद पवारांसोबत त्यांच्या गाडीने गेलो, हे त्यांच्या स्वप्नामध्ये आलं असेल. म्हणून म्हणतोय की, प्रेसनोट निखालस खोटी, चुकीची महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारी आणि माझी बदनामी करणारी आहे”, असं सांगत कदमांनी कीर्तिकरांचे दावे फेटाळून लावले.