Raj Thackeray : राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर काल मनसैनिकांना संबोधित केलं. राज्यात मागच्या काळात घडलेल्या अनेक घटनांवर त्यांनी यावेळी त्यांनी भाष्य केलं. "आम्हाला पाण्याचे स्त्रोत आणि झाडांची चिंता नाही. आम्हाला औरंगजेबाच्या कबरीची काळजी वाटते. चित्रपटांच्या माध्यमातून जे हिंदू जागृत होत आहेत त्यांचा काही उपयोग नाही" असं स्पष्ट मत त्यांनी नोंदवलं.
ADVERTISEMENT
राज ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना कुंभ मेळ्याचा उल्लेख करत तिथल्या दूषित पाण्याचे व्हिडीओ दाखवले. मुंबईतील लुप्त होत गेलेल्या नद्या, राज्यातील प्रदुषित नद्या, नॅशनल पार्क अशा अनेक विषयांवर परखडपणे भाष्य केलं. तसंच छावा चित्रपट, औरंगजेबाची कबर, अफजल खानाची कबर या सर्व मुद्यांवर राज ठाकरेंनी थेटपणे आपलं मत व्यक्त केलं. मागच्या काळात मंत्री नितेश राणे, भाजप-शिवसेनेचे नेते, हिंदूत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी केली होती. या सगळ्या गोष्टींवर कुणाचंही नाव न घेता स्पष्टपणेे राज ठाकरे यांनी भूमिका मांडली.
सजावट काढा, कबर राहूद्या...
छावा सिनेमा आल्यानंतर चित्रपटात दाखवलेली औरंगजेबाची क्रूरता पाहून, संताप व्यक्त केला जात होता. अनेक ठिकाणी औरंगजेबाची प्रतिमा जाळण्यात आली, कबर काढण्याची मागणी करण्यात आली. याचदरम्यान, नागपूरममध्ये तणाव आणि हिंसाचार झाला. राज्यातील या संपूर्ण वातावरणावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. "औरंगजेबाला मराठ्यांनी इथंच गाडलं, हे दाखवण्यासाठी समाधी राहूद्या, फक्त सजावट काढा" असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
अनेक हिंदू मुघलांसाठीही लढले
राज ठाकरे असंही म्हणाले की, आम्हाला पाण्याचे स्त्रोत आणि झाडांची चिंता नाही. आम्हाला औरंगजेबाच्या कबरीची काळजी वाटते. औरंगजेबाच्या कबरीजवळ फलक लावावा की, याला आम्ही मारलंय. शिवाजी महाराजांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व जादुई होतं. शिवराय जन्माला आले, तेव्हा इथे काहीच नव्हतं, हा परिसर वेगळा होता. शिवाजी महाराजांचे वडील निजामासोबत काम करत होते. शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट झाली तेव्हा अफझलखानाचे दूत ब्राह्मण होते, तर शिवाजी महाराजांचेही ब्राम्हण होते. दोन्हीकडे सगळ्याच जातीधर्माचे लोक होते. त्यावेळी वेगळी परिस्थिती होती. आग्रा येथे संभाजी महाराजांनी 5000 रुपयांची भेट स्वीकारली होती. तो राजकारणाचा भाग होता. अनेक हिंदू नेते मुघलांसाठी आमच्यासोबत लढले असं त्यांनी सांगितलं.
'चित्रपटांनी जागृत झालेल्या हिंदूंचा काही उपयोग नाही'
देशातील तरुणांनी व्हॉट्सॲपवर इतिहास वाचू नये, हा फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. इतिहासातील गोष्टींनी आमचं लक्ष विचलित केलं. लोकांनी इतिहास पुस्तकातून वाचावा, इतिहासाच्या नावावर लोकांना भांडायला लावलं जातंय. राजकारणी त्याचा वापर करून लोकांना भांडवतात. विकी कौशल मेल्यावर संभाजी महाराजांचं योगदान कळलं आणि अक्षय खन्नामुळे औरंगजेब कळला असा टोलाही लगावला. चित्रपटांच्या माध्यमातून ज्या हिंदू जागे झाले, त्याचा काहीही उपयोग नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
एकूणच राज ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात मांडलेल्या मुद्द्यांमध्ये काही गोष्टी अधोरेखित झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरूद्धच्या लढाईत औरंगजेबाच्यासोबत फक्त मुस्लिमच नव्हते तर हिंदूही होते. त्यामुळे सध्या औरंगजेबाची कबर काढण्यावरुन सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचं काम त्यांनी केल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे त्यांनी चित्रपट पाहून जागे झालेले हिंदू कामाचे नाही म्हणत छावा सिनेमानंतर निर्माण झालेल्या वातावरणालाही शांत केल्याचं दिसतंय. तसंच मुख्य प्रवाहातील राजकारणात पर्यावरण, नदी, जंगल, पाणी या गोष्टींवर चर्चा होत नाही, त्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही हे सुद्धा त्यांनी अधोरेखित केलं.
ADVERTISEMENT
