Majhi Ladaki Bahin Yojana: मुंबई: विधानसभेच्या निवडणूकीसाठी काही दिवस बाकी असतानाच महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये देण्यात येतात. मात्र, महिलांना दिलासा देणाऱ्या या योजनेत आता बदल करण्यात आला असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे ही योजना चर्चेचा विषय ठरली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र 7 लाख महिलांना 500 रुपयेच मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
खरंतर, दिनांक 28 जून 2024 आणि दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.
हे ही वाचा: काय सांगता! 8 लाख लाडक्या बहिणींना 1500 नव्हे, 500 रुपये मिळणार, यादीत तुमचं नाव आहे का?
कोणत्या महिलांना मिळणार 500 रुपये?
तसेच, इतर शासकीय योजनांचा 1500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. दरम्यान, 7 लाख लाडक्या बहिणींना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळत असल्याचं छाननीतून समोर आले आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेतून 1000 रुपये मिळत असल्याने लाडकी बहिणी योजनेच्या हफ्त्यात कपात होणार आहे.
त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 774148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.
हे ही वाचा: ग्राहकांची मज्जाच मज्जा! आज सोन्याच्या दरात झाली 'इतक्या' रूपयांनी घसरण, तुमच्या शहरात आजचे दर काय?
आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
याबद्दल आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, "एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे." तसेच, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक सातत्याने अपप्रचार करत असल्यामुळे त्यांचे प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे, असे देखील त्या म्हणाल्या. यानंतर, विरोधकांच्या अप्रचाराला लाडक्या बहीणी म्हणजेच महाराष्ट्रातील तमाम महिला बळी पडणार नाहीत, अशी खात्रीसुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
