'मुलांना जन्म.. करुणासोबत लग्नासारखे संबंध, पोटगी द्यायची!' धनंजय मुंडेंना दणका, कोर्टाचा निकाल जसाच्या तसा..

न्यायालयाचा लेखी आदेश बुधवारी समोर आला. यामध्ये करूणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखे आहेत असं म्हटलंय.  करूणा यांनी दोन मुलांना जन्म दिला आहे आणि एकत्र घरात राहिल्याशिवाय ते शक्य नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. 

Mumbai Tak

मुंबई तक

10 Apr 2025 (अपडेटेड: 10 Apr 2025, 03:32 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली

point

याचिका फेटाळताना न्यायालयाने काय म्हटलं?

point

करूणा मुंडे, मुलांना किती रुपये मिळणार?

Karuna Sharma : एकीकडे बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे धनंजय मुंडे यांच्याकडे संशयाची सुई आहे. तर दुसरीकडे करूणा मुंडे यांच्यासोबतच्या वादामुळेही धनंजय मुंडे अडचणीत आहे. हा वाद आता न्यायालयात असून, सध्या हा खटला चांगलाच चर्चेत आहे. 5 एप्रिलला पार पडलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने अनेक महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मात्र चांगलीच वाढ झालेली आहे. 

हे वाचलं का?

माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई कोर्टाकडून मोठा दणका बसला आहे. त्यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा मुंडे यांच्याशी असलेले संबंध "विवाह स्वरूपाचे" असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं, असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे करूणा यांना घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत त्यांना सवलत मिळण्याचा अधिकार आहे.

हे ही वाचा >> "माझ्या भावाला सोडा, काही करू नका...", धनंजय देशमुखांनी कुणाला फोन केले? जबाबात समोर आलं

अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी शनिवारी झालेल्या सुनावणीत हे निरीक्षणं नोंदवले. करुणा मुंडे नावाच्या महिलेला अंतरिम देखभाल खर्च देण्याच्या पदाधिकार्‍यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या धनंजय मुंडेंची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

काय आहे धनंजय मुंडेंचा दावा?

- धनंजय मुंडे यांनी दावा केला होता की, करुणा मुंडेंशी माझं लग्न झालं नव्हत. त्यावर न्यायालयाने म्हटले की, ती कायदेशीररित्या विवाहित पत्नी आहे की नाही हे योग्य व्यवस्थेनं ठरवावं.

- न्यायालयाचा लेखी आदेश बुधवारी समोर आला. यामध्ये करूणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखे आहेत असं म्हटलंय.  करूणा यांनी दोन मुलांना जन्म दिला आहे आणि एकत्र घरात राहिल्याशिवाय ते शक्य नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. 

- न्यायालयाने म्हटलं आहे की, "एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन, दंडाधिकाऱ्यांनी करुणा मुंडे यांना अंतरिम देखभालीचा आदेश देणं योग्य आहे." म्हणजेच पोटगीचा निर्णय कायम आहे. 

करूणा मुंडेंना दरमहा 1,25,000 रुपये पोटगी


- न्यायालयाने म्हटलं आहे की, करुणा आणि तिच्या मुलांनाही तीच जीवनशैली मिळाली पाहिजे जी धनंजय मुंडे उपभोग आहेत. 4 फेब्रुवारी रोजी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने करुणा मुंडे यांची याचिका अंशतः मान्य केली होती. करूणा यांना दरमहा 1,25,000 रुपये आणि त्यांच्या मुलीला 75,000  रुपये असे एकूण 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते.

- करूणा मुंडेंनी 2020 मध्ये धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. या मुख्य याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही.

हे ही वाचा >> लातूर हादरलं! डोंगराच्या पायथ्याशी ड्रग्ज फॅक्ट्रीवर DRI चा छापा, आरोपींमध्ये पोलीस?

- वांद्रे कोर्टाने दिलेल्या या निकालाच्या विरोधात धनंजय मुंडेंनी याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने म्हटलं की, "ज्या महिलेवर घरगुती हिंसाचार झालाय, लग्नासारख्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे, ज्याला समाजाने मान्यता दिलीये आहे, त्या महिलेला घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत तक्रारीचा अधिकार आहे."

ती माझी बायको नाही - धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांच्या बाजूने न्यायालयात सांगण्यात आलं की, "ती महिला माझी पत्नी नाही. आम्ही कधीही तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिलो नाही. त्यामुळे करूणा मुंडेंना कोणत्याही प्रकारची सवलत मिळण्यास पात्र नाही."

हा युक्तिवाद फेटाळून लावताना न्यायालयाने म्हटलं की, रेकॉर्डवर ठेवलेलं मृत्युपत्र आणि 'स्वीकृतीपत्र' हे दोन कागदपत्रे दर्शवितात की महिलेसोबतचे संबंध लग्नासारखे होते.

कोर्टाने स्पष्ट केलं की, घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत अर्जावर निर्णय देताना, दोन्ही पक्षांनी लग्नाबाबत त्यांची स्थिती जाहीर करणं आवश्यक नाही.

आर्थिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही - न्यायालय

न्यायालयाने म्हटलंय की, आम्ही असं मानतो की, प्रथमदर्शनी प्रतिवादी क्रमांक एक (करूणा मुंडे) आणि याचिकाकर्ते (धनंजय मुंडे) यांच्यात विवाहाचा संबंध होता आणि त्या महिलेनं त्यातून दोन मुलांना जन्म दिला आहे, जे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही." 

न्यायालयाने म्हटलं की, "धनंजय मुंडे हे एक राजकीय नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या आर्थिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही. जरी प्रतिवादी क्रमांक 1 (करूणा मुंडे) कमावणाऱ्या असल्या  तरीही, याचिकाकर्त्यासारखीच जीवनशैली राखण्यासाठी तिला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे."

न्यायालयाने म्हटलंय की, सर्व तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेऊन, दंडाधिकाऱ्यांनी योग्य अंतरिम देखभालीची रक्कम (पोटगी) निश्चित केली आहे.  त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे न्यायाधीशांनी त्यांच्या आदेशात म्हटलं आहे की, याचिका फेटाळण्यास पात्र आहे.

    follow whatsapp