NCP Mla Disqualification : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आला. शिवसेनेप्रमाणेच निकाल देत निवडणूक आयोगाने अजित पवार गट हाच मूळ पक्ष असल्याचे स्पष्ट केले. आयोगाच्या निकालानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काय येईल? या केसच्या निकालाबद्दल शरद पवार गटाच्या नेत्याने एक विधान केलंय. त्यामुळेच नार्वेकरांचा निकाल शरद पवारांसाठी दुसरा धक्का असेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
विधानसभा अध्यक्षांचा निकाल असणार महत्त्वाचा
अजित पवारांसह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या ९ जणांना पक्षविरोधी कारवाई केली म्हणून अपात्र ठरवण्याची याचिका शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे केलेली आहे.
या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. 15 फेब्रुवारी रोजी राहुल नार्वेकर निकाल देणार आहे. हा निकाल येण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आल्याने वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. यातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक विधान केले. ज्यामुळे नार्वेकरांनी निकाला देण्यापूर्वीच चर्चा सुरू झाली आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
"महिनाभराच्या आत या देशाची निवडणूक जाहीर होणार आहे. दोन महिने आमची सुनावणी निवडणूक आयोगासमोर झाली. दोन महिने वेळ मिळाला नाही, आजच दिला. का? तर १५ फेब्रुवारीच्या आत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांना आमचा निर्णय घ्यायचा आहे, अपात्रतेचा. त्यांना मदत करावी या भावनेने... विधानसभा अध्यक्षांना पक्ष कुणाचा हे ठरवायचं असेल, तर आता निवडणूक आयोगाने ठरवलं आहे. त्यामुळे निर्णय काय लागणार याबद्दल मी भाष्य करण्याची आवश्यकता नाही", असे जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देण्यापूर्वीच त्यांवर शंका उपस्थित केली आहे. निकाल काय लागेल, याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही, असे म्हणताना पाटलांनी अप्रत्यक्षपणे विधानसभा अध्यक्षही अजित पवारांच्या बाजूने निकाल देतील, असे म्हटले आहे.
शिवसेनेचा निकाल शिंदेंच्या बाजूने
१० जानेवारी रोजी राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली. बहुमताच्या आधारावर राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला. तोच निकष राष्ट्रवादीच्या प्रकरणात तर अजित पवारांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरेल.
न्यायालयीन लढाई
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात सध्या राजकीय लढाई सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाला ठाकरेंनी आव्हान दिलेलं आहे. त्यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यात न्यायालयीन लढा तीव्र होताना दिसत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाला शरद पवार गट सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांचा निकाल विरोधात गेल्यास त्या निकालालाही ठाकरेप्रमाणेच शरद पवारांचा गट आव्हान देऊ शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीबरोबरच पक्ष संघर्षामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघणार असंच सध्या दिसत आहे.
ADVERTISEMENT