पैसा-पाणी: बॉन्ड बाजाराच्या दबावामुळे माघार, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणून घेतला यू-टर्न?

Donald Trump Tariff: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या टॅरिफच्या निर्णयावर एकदम युटर्न का घेतला? आता पुढे काय होऊ शकतं. जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

बॉन्ड बाजाराच्या दबावामुळे ट्रम्प यांची माघार
बॉन्ड बाजाराच्या दबावामुळे ट्रम्प यांची माघार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अमेरिकेला टॅरिफ धोरणाला का द्यावी लागली स्थगिती?

point

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नेमका कोणाचा दबाव?

point

ट्रम्प यांना अचानक माघार का घ्यावी लागली?

नवी दिल्ली: बुधवारी सकाळी 9 वाजता डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं – “It’s time to buy the dip.” म्हणजेच शेअर मार्केट पडलेलं असतानाही शेअर्स खरेदी करण्याची संधी आहे. मात्र दुपारी 2 वाजता त्यांनी आपली भूमिका बदलली. चीन वगळता इतर देशांवर लावण्यात आलेल्या अतिरिक्त टॅरिफवर 90 दिवसांची स्थगिती जाहीर केली.

चला समजून घेऊया, ट्रम्प यांना अचानक माघार का घ्यावी लागली?

बॉन्ड म्हणजे काय?

सरकारचं उत्पन्न अनेकदा खर्चाच्या तुलनेत कमी असतं. ही तफावत भरून काढण्यासाठी सरकार बाजारातून कर्ज घेतं. हे कर्ज उचलण्यासाठी सरकार बॉन्ड्स जारी करतं. हे बॉन्ड दीर्घकालीन असतात. सहसा 10 वर्षं किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी. या बॉन्डवर सरकार ठराविक व्याज दराने पैसे परत करतं.

अमेरिकेचे सरकारी बॉन्ड जगातले सर्वात सुरक्षित मानले जातात. भारत, चीन, जपानसारख्या देशांचं सरकारही यामध्ये गुंतवणूक करतं.

शेअर आणि बॉन्ड बाजाराचं नातं

सामान्यतः जेव्हा शेअर बाजार खाली जातो, तेव्हा गुंतवणूकदार बॉन्डमध्ये पैसे गुंतवतात. बॉन्डमध्ये स्थिर आणि कमी जोखमीचा परतावा मिळतो. सध्या सुमारे 4% दराने परतावा मिळत आहे.

पण या वेळी वेगळंच घडलं. शेअर बाजार तर खाली गेलाच, पण त्यासोबतच बॉन्ड बाजारातसुद्धा विक्री झाली. गुंतवणूकदारांना वाटू लागलं की टॅरिफमुळे महागाई वाढेल, आणि त्यामुळे व्याजदर वाढेल. याचा थेट फटका अमेरिकन सरकारला बसणार होता. कारण जास्त व्याज सरकारलाच द्यावं लागेल.

अमेरिकेचं आर्थिक गणित कसं बिघडलं?

चला समजून घेऊया, किती मोठा आर्थिक फटका बसू शकतो?

1. अमेरिकेचं एकूण सरकारी कर्ज: सुमारे 30 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच 30 लाख कोटी डॉलर्स.

2. वर्षभरात फक्त व्याजावरचा खर्च: 875 अब्ज डॉलर्स (2023 मध्ये)

आता कल्पना करा, जर बाजारात व्याजदरात 0.5% म्हणजेच अर्धा टक्का वाढ झाली, तर सरकारला दरवर्षी 150 अब्ज डॉलर्स जास्त व्याज द्यावं लागेल. म्हणजे एकटं व्याजाचं बिल वाढून जातं १२ लाख कोटी रुपयांहून अधिक!

हेच पाहून ट्रम्प यांनी पवित्रा बदलला. New York Times च्या म्हणण्यानुसार, बॉन्ड बाजाराच्या दबावामुळे आणि मंदीची भीती यामुळे त्यांनी टॅरिफवर 90 दिवसांची स्थगिती जाहीर केली आहे.

या निर्णयामागे आणखी एक कारण होतं. ते म्हणजे ट्रम्प समर्थकांचाही दबाव. टॅरिफमुळे स्थानिक उद्योगांवर परिणाम होणार होता, हे Republican गटाच्या लक्षात आलं. त्यामुळेच त्यांचाही वाढता दबाव लक्षात घेऊन ट्रम्प यांना आपल्या निर्णयाला 90 दिवसांची स्थगिती द्यावी लागली.

आता पुढे काय?

ट्रम्प यांचा इतिहास पाहता, ही 90 दिवसांची स्थगिती पुढेही वाढवली जाऊ शकते. त्यांनी जाहीर केलंय की 75 देशांशी अमेरिका चर्चा करत आहे. भारत यामध्ये आधीपासूनच आहे, त्यामुळे आपल्याला फारसा धोका नाही.

आपल्या पैसा-पाणीच्या मागच्या बॉल्गमध्ये आपण पाहिलं होतं की भारतावर या टॅरिफचा फारसा परिणाम होणार नाही. मात्रस जर अमेरिका मंदीत गेलं, तर भारतीय आयटी, निर्यात आणि गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो.

चीनबरोबरचं युद्ध: अजूनही टोकावर

सध्या अमेरिका आणि चीन यांच्यात परस्परांवर 150% पेक्षा जास्त टॅरिफ लावला आहे. ट्रम्प म्हणतात – “चीनने बदला घेतलाय, म्हणून त्यांना सूट देणार नाही.”

पण ही लढाई फार काळ चालेल असं वाटत नाही. कारण, एकीकडे आहे जगाचं सगळ्यात मोठं उत्पादन केंद्र आहे चीन. तर दुसरीकडे आहे त्या वस्तू विकण्याची सर्वात मोठी बाजारपेठ अमेरिका.

दोन्ही देशांना माहिती आहे की, या लढाईत नुकसान दोघांचंच आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूंनी बोलणी सुरू केली आहेत. त्यामुळे आता वाट पाहूया या आर्थिक नाटकाचा पुढचा अंक नेमका कसा असेल त्याचा.

पैसा-पाणी या विशेष सदरातील इतर महत्त्वाचे ब्लॉग वाचा 

1. पैसा-पाणी : संकटात संधी! ट्रंप यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतासाठी नवे दरवाजे उघडण्याची शक्यता

2. पैसा-पाणी: भारतीयांना सोन्याचं व्यसन, सरकारने मानली हार.. 3 मोठ्या योजना अपयशी!

हे वाचलं का?

    follow whatsapp