'मनोज कुमार' हे नाव कसं पडलं? पाकिस्तानातून भारतात आलेल्या 'भारत कुमार'ची प्रचंड इंटरेस्टिंग स्टोरी

अजय परचुरे

Manoj Kumar: ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं आज (4 एप्रिल) निधन झालं. बॉलिवूडमध्ये आपला खास ठसा उमटवणाऱ्या या दिग्गज अभिनेत्याची काही रंजक गोष्टी नेहमीच आपल्या स्मरणात राहतील.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं आज (4 एप्रिल) वयाच्या 87 व्या वर्षी मुंबईत निधन झालं. मनोज कुमार यांनी आपल्या अभिनयाने दोन दशकाहून अधिकचा काळ गाजवला होता. अवघ्या जगाला मनोज कुमार म्हणून प्रचलित असलेल्या या अभिनेत्याची खरी कहाणी मात्र फारच वेगळी आहे. फाळणीचं दु:ख, भारतात येऊन चित्रपट सृष्टीत मिळवलेलं स्थान या सगळ्या गोष्टी मनोज कुमार यांच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं दर्शन घडवतात. याचबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. 

हरिकिशन गोस्वामी असलेले 'मनोज कुमार' कसे झाले?

मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असे होते. चित्रपटसृष्टीच्या प्रेमासाठी त्यांनी आपल्या नावात बदल केला होता. पण त्यांना खरी ओळख ‘भारत कुमार’ या नावाने मिळाली. मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी एबटाबाद (आता पाकिस्तानमध्ये) या ठिकाणी झाला. हरिकिशन गिरी गोस्वामी यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात आले आणि दिल्लीत स्थायिक झाले. मनोज कुमार यांनी फाळणीचे दुःख जवळून अनुभवले होते.

हे ही वाचा>> Manoj Kumar Death: बॉलिवूडचे ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन

लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांच्या चित्रपटांमुळे ते खूप प्रभावित झाले. यामुळे त्यांनी आपले हरिकिशन हे नाव बदलत मनोज कुमार असे केले.

फाइल फोटो

चित्रपट विश्वात आल्यानंतर मनोज कुमार यांनी आपले नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामीवरून बदलून मनोज कुमार केले. याचे कारण होते अभिनेते दिलीप कुमार. लहानपणी दिलीप कुमार यांच्या चित्रपटांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला होता. ते दिलीप कुमार यांचे चाहते बनले होते. ‘शबनम’ या चित्रपटात दिलीप कुमार यांचे नाव मनोज कुमार होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला होता की, जर चित्रपटात काम केले तर, स्वतःचे नाव मनोज कुमाराच ठेवू.

मनोज कुमारांना का म्हटलं जायचं 'भारत कुमार'?

मनोज कुमार यांनी कॉलेजच्या काळात अनेक नाटकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर ते मुंबईत आले. 1957 मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 1960 मध्ये ‘कांच की गुड़िया’ या चित्रपटात ते पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘संन्यासी’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या अनेक चित्रपटात ते झळकले. त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव ‘भारत’ असे असायचे. याच कारणामुळे चाहत्यांमध्ये ते ‘भारत कुमार’ म्हणून लोकप्रिय झाले.

फाइल फोटो

हे ही वाचा>> Viral News: लिंग बदलून आधी सरिताचा झाला शरद.. आता स्वत: बनला बाप, बायकोने दिला बाळाला जन्म

1965मध्ये प्रदर्शित झालेला ‘शहीद’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये गणला जातो. या देशभक्तीपर चित्रपटात त्यांनी भगत सिंह यांची भूमिका साकारली होती. यानंतर आलेल्या ‘उपकार’ या चित्रपटात ते एका शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसले होते. 1970मध्ये त्यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेला ‘पूरब और पश्चिम’ हा चित्रपटदेखील सुपरहिट ठरला. या चित्रपटातलं ‘भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ’ हे गाणं प्रचंड गाजलं.

बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव भारत होते. त्यामुळे लोक त्यांना ‘भारत कुमार’ म्हणू लागले. एवढेच नाही, तर पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे देखील मनोज कुमार यांच्या चाहत्यांपैकी एक होते. 1965च्या भारत-पाक युद्धानंतर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी मनोज यांना 'जय जवान, जय किसान'वर चित्रपट बनवण्याची कल्पना दिली आणि त्यानंतर मनोज कुमार यांनी 'उपकार' चित्रपट बनवला.

मनोज कुमार यांची बॉलिवूडमधील कारकीर्द

मुंबईत आल्यावर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी लेखनाचे काम केले, त्यातून त्यांना पैसे मिळायचे. 1960 मध्ये आलेल्या 'कांच की गुडिया' या चित्रपटात त्यांनी अभिनेता म्हणून भूमिका साकारली होती. यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिकांमधून दिसले. 

1962मध्ये ते ‘हरियाली और रास्ता’मध्ये झळकले. या चित्रपटात त्यांच्यासोबत माला सिन्हा मुख्य भूमिकेत होती. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. 1964मध्ये त्यांचा आणखी एक सुपरहिट चित्रपट ‘वो कौन थी’ प्रदर्शित झाला. 

1974च्या ‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटानंतर मनोज कुमार त्यांच्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर पोहोचले. यानंतर त्यांच्याकडे चित्रपटाच्या रांगा लागू लागल्या. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता आणि सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले.

'वो कौन थी', 'शहीद', 'हरियाली और रास्ता', 'हिमालय की गोद में', 'गुमनाम', 'पत्थर के सनम', 'उपकार', 'क्रांति', 'रोटी कपडा और मकान', 'पूरब और पश्चिम' यांसारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या मनोज कुमार यांनी अनेक मानाच्या पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. मनोज कुमार यांना 1972मध्ये ‘बेईमान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 1975मध्ये ‘रोटी कपडा और मकान’साठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. 

1992 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. मनोज कुमार यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबदल दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp