'सैफच्या पाठीत चाकू घुसलेला तरी एवढा फिट कसा?' संजय निरुपमांना नेमकं म्हणायचं तरी काय?
अभिनेता सैफ अली खान याला आज (21 जानेवारी) रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. पण यानंतर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी सर्वांच्या भुवया उंचावणारं एक ट्वीट केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सैफ अली खानला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं

सैफ अली खान एवढा फिट कसा? संजय निरुपमांनी व्यक्त केला संशय

सैफ अली खानवर 16 जानेवारीला झालेला जीवघेणा हल्ला
मुंबई: अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वीच त्याच्या घरात घुसून चोराने चाकू हल्ला केला होता. ज्यामध्ये सैफ अली खान हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पाठीत चाकूचा तुकडा घुसला होता. जो डॉक्टरांनी तब्बल 6 तास शस्त्रक्रिया करून बाहेर काढला होता. दरम्यान, आज (21 जानेवारी) सैफ अली खानला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. पण याच सगळ्याबाबत आता शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी थेट संशयच व्यक्त केला आहे. (how is saif ali khan so fit even though a knife was stuck in his back sanjay nirupam expressed doubts about the attack)
सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत संजय निरुपमांनी व्यक्त केला संशय?
सैफ अली खानला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. जेव्हा तो रुग्णालयातून त्याच्या घरी आला तेव्हा तो चालत-चालत त्याच्या बिल्डिंगमध्ये शिरला.

दरम्यान, याच गोष्टीवरून संजय निरुपम यांनी मात्र सवाल उपस्थित करत या हल्ल्याबाबतच संशय व्यक्त केला आहे.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये थेट म्हटलं आहे की, 'डॉक्टरांचं म्हणणं आहे की, सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच आतपर्यंत चाकू घुसला होता. त्यामुळे चाकूचा तुकडा हा आतच अडकला होता. सलग 6 तास शस्त्रक्रिया सुरू होती. ही संपूर्ण गोष्ट 16 जानेवारीची आहे. आज 21 जानेवारी आहे. रुग्णालयातून निघाल्यानंतर लागलीच एवढा फिट? फक्त 5 दिवसात? कमाल आहे!'
अशा स्वरूपाचं ट्विट हे संजय निरुपम यांनी केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या सगळ्या ट्विटचा रोखा हल्ल्याबाबतच असल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, रुग्णालयातून बाहेर आल्यावर सैफने कोणत्याही प्रकारे माध्यमांशी संवाद साधला नाही. तो थेट आपल्या घरी निघून गेला.
मध्यरात्री सैफवर झाला होता हल्ला
सैफ अली खान त्याच्या कुटुंबासह वांद्रे येथील सतगुरु शरण बिल्डिंगच्या 11 व्या आणि 12 व्या मजल्यावर एका डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहतो. 15 आणि 16 जानेवारीच्या मध्यरात्री (पहाटे 2.30 वाजता) चोराने त्याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने अनेक वेळा हल्ला केला. त्याला सहा जखमा झाल्या, त्यापैकी एक पाठीच्या कण्याजवळ होती.
या हल्ल्यानंतर सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागली. त्याच्या पाठीतून सुमारे 3 इंच लांबीचा चाकूचा तुकडा काढण्यात आला होता.