Shiv Sena UBT: 'हेच निष्ठेचं फळ?', ठाकरेंना मोठा धक्का.. कट्टर शिवसेना नेत्याचा थेट राजीनामा!

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

कट्टर शिवसेना नेत्याचा थेट राजीनामा!
कट्टर शिवसेना नेत्याचा थेट राजीनामा!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर होताच नाराजी नाट्य

point

सदानंद थरवळ यांनी दिला जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

point

दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने थरवळ नाराज

Shiv Sena UBT 1st Candidate list Sadanand Tharwal resigned: डोंबिवली: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काही दिवसांपूर्वीच पक्षात दाखल झालेल्या दिपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. त्यावरून नाराज झालेल्या जुन्या शिवसैनिक आणि विद्यमान जिल्हाप्रमुखाने एका पत्राद्वारे थेट उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागत आमच्या एकनिष्ठतेचे हेच का फळ? असा सवाल उपस्थित करत आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेना (UBT) पक्षाकडून पहिली 65 उमेदवारांची यादी जाहीर झाली. ज्यामध्ये डोंबिवलीतून दिपेश म्हात्रे यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यावरून जुने शिवसैनिक अशी ओळख असलेल्या आणि पक्षामध्ये सध्या कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख असे महत्त्वाचे पद भूषवणाऱ्या सदानंद थरवळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर एका पत्राद्वारे त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले आहे.

हे ही वाचा >>Shivadi Vidhan Sabha : शिवडीच्या जागेचा मुद्दा शिगेला? अजय चौधरी की सुधीर साळवी? 'या' नेत्याचं पारडं जड

'आपल्यावर, आदित्य साहेबांवर अगदी खालच्या पातळीत बोलणारा पूर्वाश्रमीचा शिवसैनिक पक्षात परत आल्यावर त्याला लगेचच डोंबिवलीतून उमेदवारी मिळणार असेल आणि संघर्ष काळामध्ये सदैव एकनिष्ठ राहणारा शिवसैनिक दुर्लक्षितच राहणार असेल तर साहेब, या निष्ठेचे फळ काय?' असा खडा सवाल सदानंद थरवळ यांनी उपस्थित केला आहे. तसेच आपण अत्यंत कठोर मनाने जिल्हाप्रमुख पद तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सांगत भविष्यात आमच्या निष्ठा आणि इमानावर हसतील अशा शब्दांत थरवळ यांनी आपली कैफियत मांडली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सदानंद थरवळ यांचे पत्र जसेच्या तसे...

प्रति, श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!!!

महोदय,

ADVERTISEMENT

आपण जाणताच की मी सदानंद थरवळ, सन्माननीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९८० सालापासून डोंबिवलीत शिवसेना परिवारामार्फत समाजहिताची कामे करत आहे. आयुष्याच्या ४४ वर्षांच्या या प्रवासात एक सामान्य शिवसैनिक, कार्यालय प्रमुख, शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख अशा असंख्य संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत मी या शहरामध्ये पक्षवाढी साठी प्रयत्न केले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Shiv Sena UBT 1st List: ठाकरेंच्या पहिल्याच यादीत 65 नावं, तुमच्या मतदारसंघात Shiv Sena UBT चा कोण उमेदवार?

स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपे साहेबांच्या संस्कारात वाढलेले आम्ही जुने शिवसैनिक. आम्ही प्रशासनातील पदांपेक्षा समाजकार्यातून संघटना वाढीच्या प्रयत्नांतच आमचे आयुष्य वेचले. महागाईच्या काळात स्वस्त दरात धान्य विक्री, फटाके विक्री, वह्या वाटप अशा लोकोपयोगी उपक्रमांमार्फत आम्ही आपली संघटना डोंबिवलीतील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली. याशिवाय शिवशक्ती बलसंवर्धन शिबीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघसोबतचा दिवाळीतील दीपोत्सव, युवा महोत्सव, शिवजयंती उत्सव, आनंद व्याख्यानमाला अशा असंख्य उपक्रमांमार्फत तरुणाईला आम्ही शिवसेना परिवारासोबत जोडले. 

स्थानीय लोकाधिकार समिती मार्फत घेण्यात येणाऱ्या बँकिंग संबंधित परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरे असे कार्यक्रमसुद्धा पूर्ण तत्परतेने राबवले. आम्ही केलेल्या असंख्य आंदोलनांपैकी डोंबिवलीतील भारनियमन विरोधी आंदोलनामुळे व तत्कालीन महावितरण समोर मांडलेल्या अभ्यासू विवेचनामुळे शहरातील भारनियमन बंद झाले. लहान मुलांसाठी डोंबिवलीत असलेल्या "आनंद बालभवन" या वस्तूच्या उभारणीतसुद्धा मी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. 

नगरसेवक असताना मी प्रभागातील रस्त्यांचे काँक्रिटिकरण, नाना-नानी उद्यान सुशोभीकरण, स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी प्रकाश परांजपे स्पर्धा परीक्षा केंद्र अशी अनेक लोकहिताची कामे केली. कोरोना काळातसुद्धा आम्ही जनसामान्यांसाठी केलेली कामे डोंबिवलीतील जनता जाणतेच.

दरम्यानच्या काळात अनेक राजकीय स्थित्यंतरे आली. माजी मुख्यमंत्री श्री. नारायण राणे, मा. श्री. राजसाहेब ठाकरे, मा. श्री. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर आपली संघटना भंगली. तरीसुद्धा हा सदा नेहमीच उध्दवसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून न डगमगता या सर्व संघर्षात संघटना वाढीसाठी प्रयत्नशील राहिला. आमच्यावर प्रचंड दबाव आला, प्रलोभनेही आली पण आपल्या निष्ठेला दागिन्यांसारखे मिरवणारे आम्ही सामान्य शिवसैनिक पाय रोवून आपल्या सोबतच उभे राहिलो. मागील २ वर्षे सुद्धा असेच तुमच्यावर आणि शिवसेनेवर गलिच्छ टीका करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही कार्यरत राहिलो.

आयुष्याची ४४ वर्षे संघटनेला दिल्यावर आणि इतकी वर्षे जनहिताची कामे केल्यावर पक्षाकडून लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूक लढण्याची संधी मिळण्याची अपेक्षा असणे हे तर अगदीच रास्त वाटते. आपणांस आठवत असेल की २०१४ साली, शेवटच्या क्षणी माझी विधानसभा लढवण्याची संधी हिरावून, इतर पक्षातून आलेल्या एका तरुणाला तिकिट देण्यात आले. त्याच्या पराभवानंतर आपण मला प्रत्यक्ष बोलवून म्हटला होतात "सदा, पक्षप्रमुख म्हणून माझी चूक झाली. तुझा हक्क होता डोंबिवलीच्या उमेदवारी वर". असो. 

दहा वर्षांत अनेक बदल झाले, तो तरुण शिवसेना सोडून इतर पक्षात गेला, आपल्यावर आणि आदित्य साहेबांवर अगदी खालच्या पातळीवर बोलला आणि नुकताच परत आपल्या पक्षात परतला. त्याच्या पक्षात परत येण्यास आम्हां शिवसैनिकांचा अजिबात विरोध नाही. पक्षवाढीसाठी असे निर्णय घ्यावेच लागतात. पण जर अशा माणसाला परतल्यावर लगेचच डोंबिवलीतून उमेदवारी देण्यात येणार असेल आणि संघर्ष काळात सदैव एकनिष्ठ राहणारा शिवसैनिक दुर्लक्षितच राहणार असेल, तर साहेब या निष्ठेचे फळ काय? या मंडळींनी जिथे सत्ता तिथे उडी मारायची आणि सामान्य शिवसैनिकांनी यांना डोक्यावर घेऊन यांचा जयघोषच करत रहायचे असे कसे चालणार?

साहेब, म्हणून जर पुन्हा एकदा या व्यक्तीस उमेदवारी देण्यात येणार असेल, तर अत्यंत कठोर मनाने मी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आज आम्ही विरोध केला नाही तर भविष्यात निष्ठा, ईमान यासारख्या शब्दांवर लोक हसतील. इतकी वर्षे आपण दिलेल्या स्नेहाबद्दल धन्यवाद. आयुष्यात ही वेळ येईल असं या शिवसैनिकाला कधी वाटलं नव्हतं. साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र !!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT