द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायच्या ऐवजी मी विरोध करायला पाहिजे, पण…; उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना कुणाच्या बाजूने मतदान करणार याची उत्सुकता अखेर संपली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर शिवसेनेची भूमिका जाहीर केली. आदिवासी समुदायातील एक महिला राष्ट्रपती होणार आहे आणि त्यामुळे शिवसेना द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दलची भूमिका जाहीर केली. उद्धव ठाकरे म्हणाले,”सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर आली आहे. मुद्दामहून सर्वांच्यासमोर इतक्यासाठीच बोलतोय कारण काही बातम्या विचित्रपणे आपल्यापर्यंत (माध्यमांपर्यंत) आल्या आणि आपल्या (माध्यमे) मार्फत जनतेसमोर गेल्या आहेत.”

“एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की, काल जी खासदारांची बैठक झाली, त्या खासदारांच्या बैठकीमध्ये कुणीही कोणताही दबाव माझ्यावर आणलेला नाही. सर्वांनी सांगितलं की, हा आपला विषय आहे आणि आपण द्याल तो आदेश. कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणाला द्यायचा नाही, हे तुम्ही सांगाल तसं.”

“आजही मी भूमिका स्पष्ट करतोय, कारण इकडेही गर्दी आहे आणि मातोश्रीबाहेरही रीघ लागलेली आहे. मी आज गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही बोलावलं होतं. त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. जिल्हाप्रमुखांशी बोललो. खासदारांशीही बोलतोय. आताही काही कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांच्याशीही चर्चा करतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे वाचलं का?

“आदिवासी आणि आदिवासी समाजात काम करणाऱ्या जनतेनं, माझ्या शिवसैनिकांनी विनंती केलीये. एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे आहेत. त्यांनी विनंती केली. काल आमशा पाडवी आले होते. निर्मलाताई गावित आल्या होत्या. पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्षाही आल्या होत्या. बऱ्याच लोकांनी विनंती केली. पहिल्या प्रथम एका आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळतेय. आमच्या समाजाला वेगळी ओळख मिळते आहे. त्यामुळे आपण पाठिंबा दिला, तर आम्हाला आनंद होईल, असं त्या सगळ्यांची विनंती होती,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“या सगळ्या गोष्टींचा, विनंत्या आणि मला प्रेमाने केलेल्या आग्रहाचा मान ठेवून शिवसेना राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो की, हा पाठिंबा देण्यासाठी कोणताही दबाब नाहीये. नाहीतर आता जे राजकारण सुरूये, ते राजकारण पाहून मी पाठिंबा द्यायच्या ऐवजी विरोध करायला पाहिजे, पण शिवसेनेनं कधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोत्या मनाने विचार केलेला नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“ज्यावेळी प्रतिभाताई पाटील यांचं राष्ट्रपतीपदासाठी नावं आलं, तेव्हा सुद्धा शिवसेनाप्रमुखांनी पक्षाच्या पलिकडे जाऊन देशाचा विचार केला आणि प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जींच्या वेळीही योग्य व्यक्ती त्या पदावर विराजमान होतेय म्हणून पाठिंबा दिला होता. त्याच परंपरेमध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांनी केलेल्या आग्रहाचा मान ठेवून शिवसेना मुर्मू यांना पाठिंबा देत आहे,” असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT