सहजासहजी नाही झाला धनंजय मुंडेंचा राजीनामा, ही आहे Inside स्टोरी.. क्रोनोलॉजी पाहा!
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. पण हा राजीनामा सहजासहजी झालेला नाही. जाणून घ्या काय आहे याची क्रोनोलॉजी.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंचा 3 महिन्यांनी राजीनामा

मुंडेंच्या राजीनाम्याआधी नेमकं काय-काय घडलं?

राजीनाम्याआधीची क्रोनोलॉजी समजून घ्या
Dhananjay Munde Resignation: बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आले अन् संपूर्ण महाराष्ट्र हा हादरून गेला. ज्यानंतर आज (4 मार्च) मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. पण हा राजी काही तडकाफडकी घेण्यात आला नाही किंवा हा राजीनामा सहजासहजी झालेला नाही. कारण या सगळ्या प्रकरणाला 3 महिने उलटून गेल्यानंतर राज्यातील जनतेचा रोष वाढल्याने हा राजीनामा घण्यात आल्याचं आता बोललं जात आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांचा राजीनामा कसा झाला आणि त्याची नेमकी क्रोनोलॉजी काय आहे हे आपण सविस्तर समजून घेऊया.
समजून घ्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची क्रोनोलॉजी!
27 फेब्रुवारी - अधिवेशन सुरू होण्याआधी चार्जशीट दाखल केली जाते.
1 मार्च – चार्जशीटमधील 56 पाने माध्यमांमध्ये येतात. दोन दिवस त्यावरून विविध पद्धतीच्या बातम्या येतात.
3 मार्च – अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून मुंडे, कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होते.
हे ही वाचा>> Santosh Deshmukh यांची हत्या ते धनंजय मुंडेंचा राजीनामा, महाराष्ट्राला हादरवणारं नेमकं प्रकरण काय?
3 मार्च – आजारपणामुळे गायब असलेले धनंजय मुंडे अधिवेशनासाठी पहिल्याचदिवशी विधानभवनात येतात.
3 मार्च – पहिला दिवस असल्याने राज्यपालांचं भाषण आणि शोक संदेश घेतले जातात. प्रथेप्रमाणे इतर कुठल्याही कामकाजाला नकार दिला जातो. कामकाज संपते.
3 मार्च – सभागृहाचं कामकाज संपलेले असतं. सभागृहाबाहेर अबू आझमी 'औरंगजेब चांगला माणूस होता..' असं विधान करतात. याआधीही त्यांनी अधिवेशनकाळात सरकारला पूरक अशी विधाने केलेली असतात.
3 मार्च – संतोष देशमुखांच्या हत्येच्याववेळी आरोपींनी रेकॉर्ड केलेले व्हीडिओ आणि फोटो रात्री समोर येतात. चार्जशीटमध्या या व्हीडिओ आणि फोटोचा समावेश केलेला आहे.
3 मार्च – कौर्याच्या सगळ्या सीमा पार करणाऱ्या आरोपींविरोधात सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त व्हायला लागतो. महाराष्ट्रात संतापाची लाट उसळते. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सरकारवर दबाव येतो.
3 मार्च – रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री फडणवीस, अजितदादा, प्रफुल पटेल, बावनकुळे आणि धनंजय मुंडेंची बैठक पार पडते.
हे ही वाचा>> धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा दिला नाही, म्हणाले 'मी तर...' 'या' प्रतिक्रियेचा अर्थ काय?
4 मार्च – धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिवस सुरू होतो. अधिवेशनात यावरून गोंधळ होणार असं चिन्ह असते.
4 मार्च – अधिवेशनाचा कामकाज सुरू होण्याआधीच धनंजय मुंडेंचे पीए सागर बंगल्यावर राजीनाम्याचं पत्र घेऊन पोचलेले असतात.
4 मार्च – विधानभवनाच्या पायऱ्यांवर तत्पूर्वीच विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आलेले असतात. संतोष देशमुखांची हत्या आणि मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी यावरून विरोधकांच्या घोषणा सुरू असतात. त्याचवेळी सत्ताधारीही पायऱ्यांवर मोठ्या संख्येने एकत्र येत अबू आझमीच्याविरोधात घोषणा देत असतात.
4 मार्च – सभागृह सुरू झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीस हे मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती देतील असं अपेक्षित असताना फडणवीस विधानभवनात पोहचतात आणि थेट माध्यमांकडे मोर्चा वळवतात. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असून राज्यपालांकडे पाठवल्याची घोषणा ते पोडियमवर करतात.
4 मार्च – 11 वाजता सभागृहाचं कामकाज सुरू होतं ते मुळातच अबू आझमीवर कारवाई करण्याच्या मागणीवरून. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सभागृहात दिसत नाही. सत्ताधारीच घोषणा देत असतात. सभागृह काहीकाळासाठी तहकूब केले जाते.
4 मार्च – सभागृहाचं कामकाज सुरू होतं. सत्ताधारी गोंधळ करत असतात. याच गोंधळात विरोधकांकडून भास्कर जाधवांना बोलायची संधी दिली जाते. त्यांचा आवाज पोहोचेपर्यंत पुन्हा अर्धा तासाठी सभागृह तहकूब केलं जातं.
4 मार्च – दरम्यान, धनंजय मुंडे त्यांच्या राजीनाम्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट करतात. एक दिवस आधी अधिवेशनाला येताना ठणठणीत असलेले मुंडे, आपण आजारपणामुळे राजीनामा देत असल्याचं सांगतात.
4 मार्च – 11.50 वाजता एकनाथ शिंदे विधानसभा सभागृहात अबू आझमीवरून भाषण ठोकतात. सत्ताधारी आझमींच्या निलंबनावरून गोंधळ घालत असतात. विरोधकांचा आवाज कुठेच उमटत नसतो की उमटू दिला जात नसतो? सभागृह तहकूब होते.
4 मार्च – दहा मिनिटांनी सभागृह सुरू होते ते गोंधळातच. अध्यक्ष नार्वेकर संपूर्ण दिवसासाठी सभागृह तहकूब करतात.
4 मार्च – 12 वाजता वरच्या सभागृहात प्रवीण दरेकर तोच विषय मांडतात. सभागृह तहकूब केले जाते.
4 मार्च – दुसऱ्या वेळेस सभागृह सुरू होते, तेव्हा अंबादास दानवेंना बोलण्याची संधी दिली जाते. सत्ताधाऱ्यांच्या गोँधळात ते आझमीसह कोरटकर आणि सोलापूरकरांवर कारवाईची मागणी करत असतात. त्याचवेळेस दुसऱ्याबाजूने एकनाथ शिंदे भाषण करायला उभे राहतात. विधानसभेत दिलेलं भाषणच ते इथे देतात. भाई जगतापांना बोलायचं असतं. सत्ताधाऱ्यांचा गोंधळ सुरूच असतो. सभागृह तहकूब केले जाते.
4 मार्च – सभागृह सुरू झाल्यावर भाई जगताप बोलायला उभे राहतात. तेही आझमी, कोरटकर, सोलापूरकरांवर कारवाईची मागणी करत असतात. सत्ताधाऱ्यांच्या गोंधळात सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले जाते.
4 मार्च – संतोष देशमुखांच्या हत्येवेळीचे भयानक फोटो, त्यावरून उसळलेला जनक्षोभ, बीड - धाराशीव बंद, मुंडेंचा राजीनामा या विषयांना समांतर अबू आझमीचा विषय उभा राहिलेला असतो.