Santosh Deshmukh यांची हत्या ते धनंजय मुंडेंचा राजीनामा, महाराष्ट्राला हादरवणारं नेमकं प्रकरण काय?
Dhananjay Munde Resignation: बीडमधील संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि त्यानंतर तीन महिन्याने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला. या तीन महिन्यात नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर आल्यानंतर मोठा गदारोळ

धनंजय मुंडेंचा घेण्यात आला राजीनामा

नेमकं काय आहे प्रकरण समजून घ्या
बीड: महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित गुन्हेगार हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचं समोर आलं आहे. या हत्या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजला जातो. त्यामुळे आता मुंडेंनी राजीनामा द्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ज्यानंतर आज (4 मार्च) त्यांचा राजीनामा घेण्यात आला.
राजीनाम्यासाठी मुंडेंवर कसा वाढला दबाव?
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे, जो राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.'
हे ही वाचा>> धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा दिला नाही, म्हणाले 'मी तर...' 'या' प्रतिक्रियेचा अर्थ काय?
दरम्यान, धनंजय मुंडेंनी कुठेही नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देत असल्याचं म्हटलं नाही. त्यांनी जे ट्वीट केलं त्यामध्ये त्यांनी राजीनाम्याचे कारण आरोग्य समस्या असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अशीही माहिती समजते आहे की, मुख्यमंत्री फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना धनंजय मुंडेंना मंत्रिपद सोडावे लागेल असे स्पष्ट शब्दात सांगितलं होतं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान, आरोपपत्राचा एक भाग आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये वाल्मिक कराडचे सहकारी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना दाखवण्यात आले होते. हेच फोटो धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याच्या दबावाचे मुख्य कारण बनले.
संपूर्ण प्रकरण काय?
हत्येची ही घटना 9 डिसेंबर 2024 ची आहे. कराड यांनी बीडमधील अवादा या अक्षय ऊर्जा कंपनीच्या भूसंपादन अधिकाऱ्यांकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख खंडणीचा प्रयत्न थांबवत होते. जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांनी वाल्मिक कराड आणि त्यांच्या गुंडांना कंपनीकडून पैसे उकळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी संतोष देशमुखांना मारण्याचा कट रचला. यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले आणि अनन्वित अत्याचार करून अत्यंत निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली.
हे ही वाचा>> तीन महिन्यातील सर्वात मोठी बातमी, CM फडणवीसांनी कॅमेऱ्यासमोर येऊन केली घोषणा.. सरकारला हादरा
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयात 1400 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपपत्रात वाल्मिक कराड यांचे नाव आरोपी क्रमांक एक म्हणून देण्यात आले आहे. आरोपपत्रात अनेक धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
ज्यामध्ये आरोपी संतोष देशमुख यांना लोखंडी रॉड, काठ्या आणि लोखंडी साखळदंडांनी मारहाण करताना दिसत आहेत. आरोपींनी देशमुख यांना गाडीला बांधले आणि ओढत नेले. जेव्हा ते मरण्याच्या उंबरठ्यावर होते तेव्हा त्यांनी पाणी मागितले, परंतु आरोपींनी पाणी देण्याऐवजी त्यांच्या तोंडावर लघुशंका केली. ज्याचे किळसवाणे फोटो हे आता समोर आले आहेत.
एसआयटीने (SIT) न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील सूत्रधार वाल्मिकी कराड होता. एसआयटीने आरोपींकडून जप्त केलेले फोन कॉल रेकॉर्डिंग आणि फॉरेन्सिक लॅबने प्रमाणित केलेले सीसीटीव्ही फुटेज पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले आहेत.
ते फोटो समोर आले अन्...
यापूर्वी, आरोपपत्राचा एक भाग 3 मार्च रोजी माध्यमांमध्ये व्हायरल झाला, ज्यामध्ये वाल्मिकी कराडच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे फोटो दाखवण्यात आले होते. हे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली. बीड जिल्ह्यात मराठा संघटनांनी बंदची हाक दिली. जनतेचा रोष वाढत असताना, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली.
त्यानंतर, जनतेच्या उद्वेग लक्षात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रमुख सुनील तटकरे, धनजय मुंडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.
सरपंचाची हत्या, अवादा कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न आणि फर्मच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला अशा तीन प्रकरणांमध्ये आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (MCOCA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अजूनही फरार आहे.
कोण आहेत धनंजय मुंडे?
धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आहेत. ते बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. राजीनामा देण्यापूर्वी ते महाराष्ट्र सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते. ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीही राहिले आहेत.
मुंडे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे मानले जातात. ते माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत आणि त्यांच्या राजकीय सक्रियतेमुळे ते अनेकदा चर्चेत असतात. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे नाव आल्याने आणि वाढत्या दबावामुळे त्यांना अखेर राजीनामा द्यावा लागला.
पहिल्या पत्नीचा दावा - राजीनामा आधीच घेतला होता
धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा यांनी आधीच दावा केला होता की ते अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राजीनामा देतील. ती म्हणाली होती, 'मी 5 मार्चपासून त्यांच्या विरोधात उपोषण करणार होते, पण मला कळले की अजित पवारांनी त्यांच्याकडून जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतला आहे.' करुणा शर्माने तिच्या फेसबुक अकाउंटवर लिहिले होते की, 'राजीनामा 3 मार्च 2025 रोजी होईल.' पण त्याआधीच, धनंजय मुंडे यांनी 4 मार्च रोजी राजीनामा दिला.