"तुमच्यासारखे असे 56 पायाला बांधून फिरते" विधानपरिषदेत कडाडणाऱ्या चित्रा वाघ आहेत तरी कोण?
विधानपरिषदेतील आपल्या भाषणात अत्यंत आक्रमकपणे टीका करणाऱ्या भाजप आमदार चित्रा वाघ यांच्याबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे. जाणून घ्या त्यांच्याविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्या आणि महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ या नुकतेच एका विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. विधान परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांनी, "तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते ही चित्रा वाघ," असं विधान केलं. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चित्रा वाघ या नेहमीच आक्रमक शैलीत विरोधकांन उत्तर देतात. पण चित्रा वाघ यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा आहे हे आपण जाणून घेऊया.
कोण आहेत चित्रा वाघ?
चित्रा किशोर वाघ या महाराष्ट्रातील एक प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा जन्म मुंबईत झाला असून, त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली. त्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या होत्या आणि पक्षात सक्रियपणे कार्यरत होत्या. मात्र, 2019 विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर महिला नेत्यांनी त्यांच्यावर बरीच टीकाही केली होती.
हे ही वाचा>> Disha Salian च्या मृत्यूचं रहस्य 5 वर्षांनंतरही कायम, आदित्य ठाकरेंवर 'ते' आरोप अन्...
चित्रा वाघ या भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी अनेकदा आपल्या आक्रमक वक्तव्यांनी आणि मुद्देसूद भूमिकांनी लक्ष वेधलं आहे. त्या सध्या विधान परिषदेच्या आमदार असून, राज्यातील विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर परखडपणे बोलतात.
विशेषतः दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत आणि पूजा चव्हाण यांसारख्या प्रकरणांमध्ये त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. याशिवाय, उर्फी जावेदच्या कपड्यांवरून झालेल्या वादातही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
"तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते ही चित्रा वाघ..."
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या चर्चेदरम्यान चित्रा वाघ यांनी दिशा सालियन प्रकरणावरून अनिल परब आणि उद्धव ठाकरे गटावर टीका केली. यावेळी अनिल परब यांनी संजय राठोड प्रकरणाचा उल्लेख केल्यावर चित्रा वाघ संतापल्या आणि त्यांनी हे विधान केलं.
हे ही वाचा>> दिशा सालियनच्या वडिलांचे आदित्य ठाकरेंवर नेमके कोणते आरोप?
"तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते ही चित्रा वाघ..." असं म्हणत चित्रा वाघ यांनी या वाक्प्रचारातून आपली ताकद आणि प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. या विधानावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही टीका केली असून, "ही भाषा कोणत्या शाळेत शिकवली जाते?" असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.
विवाद आणि टीका
चित्रा वाघ यांचा हा आक्रमकपणा आणि त्यांची वक्तव्यं यापूर्वीही वादात सापडली आहेत. त्यांच्या पती किशोर वाघ यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप झाला होता, ज्यामध्ये 2023 साली त्यांना कोर्टाने पुराव्याअभावी निर्दोष ठरवलं. पण त्या प्रकरणामुळे त्यांच्या निःपक्षपणावर विरोधक कायम प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्यांचा पक्ष बदल आणि पतीवरील आरोपांमुळे विरोधक त्यांच्यावर सातत्याने टीका करतात.
चित्रा वाघ या आपल्या धाडसी आणि परखड शैलीसाठी ओळखल्या जातात. "मी असे 56 पायाला बांधून फिरते" हे विधान त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि राजकीय दृष्टिकोनाचं एक उदाहरण आहे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फोडलं असून, यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे.