Shiv Sena UBT Balasaheb Thackeray Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाली. राम मंदिराच्या मुद्दा देशाच्या राजकारणात कायम फिरत राहिला. प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हा विषय पुन्हा चर्चेत आहे. भाजप राम मंदिराचा मुद्दा राजकीय लाभासाठी वापर असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आता शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान मोदींना काही सवाल केले आहेत.
ADVERTISEMENT
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सामनात अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. ‘बाळासाहेब असते तर जंगलराज पेटवले असते!’, या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर बाण डागण्यात आले आहेत.
मोदी-शाहांवर टीकास्त्र; अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
– “संपूर्ण देश राममय झाला असताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आज साजरा होत आहे. हा मंगल योग आहे. प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अयोध्येत पार पडला. श्रीरामांचा जन्म अयोध्येतच झाला व अयोध्या रामाचीच हे ठासून सांगणाऱ्या व त्यासाठी उसळलेल्या आंदोलनात संघर्षाच्या समिधा टाकणाऱ्या नेत्यांत शिवसेनाप्रमुखांचे नाव सर्वोच्च आहे. भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वास याची कृतज्ञता नसली तरी भगवान श्रीरामाने मंदिर प्रवेशासाठी संकल्प योजला तो 22 जानेवारीस म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येस. हा योगायोगाचा अपूर्व संगम आहे.”
हेही वाचा >> “आपल्याला आज ‘श्रीमंत योगी’ मिळालाय..” महाराष्ट्रातील ‘या’ महाराजांकडून मोदींची शिवरायांसोबत तुलना!
– “अयोध्येतील श्रीरामावर स्वर्गस्थ शिवसेनाप्रमुखांनी फुले उधळली असतील. देश आज राममय झाला तो एका राजकीय रचनेचादेखील भाग आहे. पण देशात रामराज्य आले आहे काय? श्रीरामांना घर मिळाले, पण देशातील लाखो लोक बेघर आणि उपाशी आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत जाऊन श्रीरामांसाठी उपवास धरला, पण देशातील कोट्यवधी जनतेची उपासमार दूर व्हावी यासाठी ते उपवास करणार आहेत काय?”
“भाजपच्या मुखवटा उतरवण्यासाठी शिवसेनाप्रमुख हवे होते”
– “रामाचे नाव घेऊन देशाला फक्त ‘मोदी मोदी’ करायला लावणे हाच अयोध्या उत्सवाचा भाजपाई उद्देश असावा व या ढोंगबाजीचा मुखवटा उतरवण्यासाठी आज शिवसेनाप्रमुख हवेच होते. शिवसेनाप्रमुखांचे अस्तित्व हे सत्य व नैतिकतेच्या राजकारणाचे बलस्थान होते. आज आपल्या देशातून सत्य आणि नैतिकतेचे उच्चाटन झाले आहे व राष्ट्रभक्तीचा गोवर्धन करंगळीवर पेलून धरायला शिवसेनाप्रमुख नाहीत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतरही महाराष्ट्र मोगलांशी लढत राहिला व शेवटी औरंगजेबाला याच मातीत गाडले.”
हेही वाचा >> छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास सांगणारे गोविंदगिरी महाराज कोण?
“शिवसेनाप्रमुखांच्या महानिर्वाणानंतरही महाराष्ट्र लढतच आहे व महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्या नव्या मोगलांना तो याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनाप्रमुख ही पदवी किंवा उपाधी नव्हती, तर ते एक तेजोवलय होते.”
– “सत्तेपेक्षा संघटनेचे बळ किती मोलाचे व संघटनेत काम करणाऱ्या शिवसैनिकांच्या निष्ठा व त्याग किती महत्त्वाचा, हे त्यांनी देशाला दाखविले. लाखो निष्ठावंतांचा सागर त्यांच्या एका इशाऱ्यावर उसळून बाहेर पडत असे व देशाच्या राजकारणाची दिशा त्यामुळे बदलत असे. हा इतिहास कधीच पुसला जाणार नाही.”
‘आईचा सौदा…’, ठाकरे गटाचे शिंदेंवर शरसंधान
– “शिवसेनाप्रमुख या पदातील शिवसेना मोदी-शाहांच्या भारतीय जनता पक्षाने सध्या महाराष्ट्रद्रोही गुलामांच्या हाती सोपवली आहे. सत्तेच्या क्षणिक तुकड्यांसाठी ‘आई’चा सौदा करावा तसा शिवसेनेचा सौदा ज्यांनी केला त्यांच्या हस्ते अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. हे बरे नाही.”
“शिवसेना हा महाराष्ट्राचा, हिंदुत्वाचा पंचप्राण. त्या प्राणांच्या प्राणप्रतिष्ठेस ज्यांनी धक्का पोहोचवला त्यांचे भविष्य हे अंधःकारमयच आहे. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मराठी अस्मितेसाठी शिवसेनेची निर्मिती बाळासाहेब ठाकरे यांनी केली. पण महाराष्ट्राची लूट विनासायास करता यावी यासाठी बाळासाहेबांची शिवसेना ‘गुजरात लॉबी’ने फोडली, पण शिवसेना संपली काय? ती महाराष्ट्राच्या कणाकणांत आहे, मनामनात आहे.”
हेही वाचा >> Pran Pratishtha : काय असते प्राणप्रतिष्ठा ज्यामुळे दगडाच्या मूर्तीत प्रकटतो देव!
“श्रीरामाच्या हाती आज धनुष्यबाण आहे. उद्या रामाच्याच हाती मशाल येईल. त्या मशालीच्या प्रखर प्रकाशात भगवान राम शिवसेनेचे भवितव्य आणि मार्ग अधिक प्रकाशमान करतील. बाळासाहेब ठाकरे हे या भूतलावर जन्मलेले असामान्य व्यक्तिमत्त्व होते.”
“बाळासाहेब विरोधकांच्या टीकेचे सदैव धनी होते. तीच त्यांची श्रीमंती होती. लाखो लोकांचा जनसागर त्यांचा जयजयकार करीत असे. हेच त्यांचे भांडवल होते. त्यांनी कारखाने, उद्योग, निर्माण केले नाहीत; पण मुंबई, महाराष्ट्रातील उद्योगांना संरक्षण देऊन लाखो, कोट्यवधी मराठी तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून दिला. मराठी माणसाची चूल त्यांनी सतत पेटत ठेवली. म्हणूनच गांधींप्रमाणेच हाडामांसाचा असा मनुष्य बाळ केशव ठाकरे नावाने या महाराष्ट्रात वावरत होता, यावर येणाऱ्या पिढ्यांना विश्वास ठेवावा लागेल.”
मराठी माणूस गुलाम झाला असता -शिवसेना (UBT)
“छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हिंदूंची सुंता झाली असती. काशी-मथुरेच्या मशिदी झाल्या असत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर मराठी माणूस कायमचा गुलाम झाला असता. मुंबईचा महाराष्ट्रापासून तुकडा पडला असता. महाराष्ट्राचा स्वाभिमान मातीमोल झाला असता. महाराष्ट्र आजही दिल्लीतील नव्या मोगलशाहीविरुद्ध लढत आहे तो फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेमुळेच!”
“आज सर्व राष्ट्रीय संस्था, न्यायालये, संविधानाचे चौकीदार, निवडणूक आयोग, राजभवन सरकारच्या हातातील बाहुले बनून कठपुतळ्यांप्रमाणे नाचत आहेत. देश इराणच्या खोमेनीप्रमाणे धर्मांधता आणि उन्मादाच्या दिशेने निघाला आहे. राष्ट्रवादाच्या व्याख्या बदलल्या आहेत. पाकिस्तानबरोबर चीनही दुष्मन बनून छातीवर बसला आहे. हिंदुत्व म्हणजे खोमेनी छाप धर्मांधता नाही, असा विचार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला होता. पण देश ‘राममय’ करताना त्या हिंदुत्वात धर्मांधतेची अफू मिसळली जात असेल तर हा महान भारत देश पुन्हा जंगलयुगात जाईल.”
हेही वाचा >> PM Modi Speech : “काही लोकं म्हणत होते, राम मंदिर बनलं तर आग लागेल”
“देशाचे जंगल होताना पाहणे दुर्दैव आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ते जंगलच पेटवले असते. तरीही बाळासाहेबांच्या विचारांच्या ठिणग्या जंगलराज्यात उडत आहेत. या ठिणग्याच जंगलराजला चूड लावतील! बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या ठिणग्या म्हणजे निखाराच आहे. त्या कशा विझतील?”
ADVERTISEMENT