Jitendra Awhad News : ‘मेलेला माणूस पाच तास आयसीयूमध्ये कसा ठेवू शकता तुम्ही? लाजही वाटत नाही यार… पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असता ना कानशिल लाल केलं असतं’, हे विधान आहे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज महापालिका रुग्णालयात गेल्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या संतापाचा कडेलोट झाला. या रुग्णालयात एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयात पाहणीसाठी गेलेल्या आव्हाडांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. (Jitendra awhad gets angry after 5 patients died in chhatrapati shivaji maharaj hospital in a day.)
ADVERTISEMENT
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड ठाणे महापालिकेच्या या रुग्णालयात गेले. रुग्णालयातील अव्यवस्था बघून आमदार आव्हाडांचा पारा चढला. त्यानंतर त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. रुग्णालयातील प्रकाराबद्दल आव्हाडांनी एक पोस्टही केली आहे.
‘तळपायाची आग मस्तकात गेली’, आव्हाडांनी काय सांगितलं?
5 मृत्यूनंतर आव्हाडांनी भेट दिली आणि त्यानंतर एक पोस्ट केलीये. ते म्हणतात, “गेली अनेक दिवस झाले ठाण्यातील शिवाजी रुग्णालया बाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या. आज एका महिलेचा फोन आला की, तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत,परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये. काय प्रकार आहे, हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता, रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो. तळपायाची आग मस्तकात गेली.”
वाचा >> Thane : एका दिवसांत रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितले कारण
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “त्या महिलेचा पती हा जनरल वॉर्ड मध्ये उपचार घेत होता. तिथे पोहचलो असता, संबंधित रुग्णाला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले. तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे तरी तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर 5 तास उपचार करत होते. थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता परंतु रुग्णालय प्रशासनाने याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती. उलट 5 तास त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ते सांगत होते. याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता, त्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर लोकांची बोलती बंद झाली.”
मृत्यू झालेल्या रुग्णांवर उपचार
“मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते.तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात.या गंभीर रुग्णांना,दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो.आज दिवसभरात या रुग्णालयात 5 रुग्ण दगावले आहे”, असे आव्हाड म्हणाले.
वाचा >> No-Confidence Motion: लोकसभेत ‘INDIA’आघाडीचा पराभव, मोदींनी नेमका कसा मिळवला विजय?
“या रुग्णालयात अक्षरशः गरिबांची फसवणूक आणि लूट सुरू आहे. बिल वाढवून लावली जात आहेत, डॉक्टर वेळेवर कामाला येत नाहीत. इतकंच काय तर मेलेल्या रुग्णांवर देखील उपचार सुरू असल्याचं दाखवून ही मंडळी पैसे कमवत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू आहे. यात काही कारवाई होईल ही आशा नाहीच, पण गोर गरिबांच्या सोबत हा जितेंद्र आव्हाड स्वतः उभा राहील हा शब्द मी देतो”, असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT