Jitendra Awhad Rohit Pawar : ‘देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे’, असा सल्ला देणाऱ्या आमदार रोहित पवारांना आमदार जितेंद्र आव्हाडांनी खरमरीत उत्तर दिले. राम मांसाहारी होता, या विधानावरून सुरू झालेल्या वादावर आव्हाडांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात रोहित पवार लहान आहेत म्हणत सुनावलं.
ADVERTISEMENT
राम मांसाहारी होता, या विधानावरून जितेंद्र आव्हाड विरोधकांच्याच टीकेचे धनी झाले नाहीत, तर स्वपक्षातील आमदारानेही त्यांना सुनावलं. जेव्हा पत्रकार परिषदेत त्यांना याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी रोहित पवार लहान आहेत, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. अबुधाबीतून ट्विट करणं सोप्पं आहे, असे म्हणत समाचार घेतला.
जितेंद्र आव्हाडांनी रोहित पवारांना काय दिलं उत्तर?
“आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे”, असा सल्ला रोहित पवारांनी जितेंद्र आव्हाडांना दिला होता.
त्याला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “रोहित पवार काय बोलतात, याकडे मी फार महत्त्व देत नाही. मला काही फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही. ते अजून लहान आहेत. त्यांची पहिली टर्म आहे. राहिली गोष्ट पक्षाची. असं आहे की, शरद पवारांचं मला नेहमी सांगणं असतं की, सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही.”
हेही वाचा >> ठाकरेंना 18, पवारांना 6 जागा; काँग्रेसने ठरवला ‘मविआ’चा फॉर्म्युला
“याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं की, तू जाऊन पुरंदरेंची माफी माग. मी जरा घाबरलो होतो म्हणून पवार साहेबांना फोन केला. पवार साहेब मला म्हणाले, तुझा इतिहासाचा अभ्यास आहे. तुला जे योग्य वाटतं ते बोल. त्याच्याशी पक्षाचं काही देणंघेणं नाही. कारण पक्ष कुणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही”, अशी भूमिका जितेंद्र आव्हाडांनी मांडली.
हेही वाचा >> राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेला फक्त 5 लोकं, महाराष्ट्रातून एकाच व्यक्तीला संधी!
रोहित पवारांनी केलेल्या ट्विटचा उल्लेख करत रोहित पवारांनी तुमच्यावरच हल्लाबोल केला आहे, असा आव्हाडांना विचारण्यात आलं. त्याला उत्तर देताना आमदार आव्हाड म्हणाले, “ठीक आहे ना. अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोप्पं आहे.”
तुम्ही पक्षात एकटे पडले आहात? आव्हाड म्हणाले…
पक्षात एकटं पडल्याची चर्चा होतेय, असा प्रश्न विचारताच आव्हाड म्हणाले, “पक्षात मी एकटा पडलो असतो, तर एवढी लोकं माझ्या मागे उभी राहिली असती का? मी स्वतः जिवंत आहे. मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो. मी पुरदरेंच प्रकरण लावून धरलं. शेवटी शनिवार वाड्यावर होणारा सोहळा शेवटी बंद खोलीत राज्यपाल भवनावर घ्यावा लागला. लढाई करताना माझ्याबरोबर किती आहेत, याचा विचार करून लढाईला उतरलात तर आयुष्यभर लढाई करता येत नाही.”
ADVERTISEMENT