PM Modi Ram Mandir Speech : अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भावना व्यक्त केल्या. यावेळी मोदींनी नामोल्लेख टाळत विरोधकांवर टीकेचे बाण डागले.
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्यासाठी हा क्षण फक्त विजयाचा नाही, तर नम्रतेचाही आहे. जगाचा इतिहास साक्षी आहे की, अनेक राष्ट्र आपल्याच इतिहासात गुरफटून जातात. अशा देशांनी जेव्हा इतिहासातील गाठी सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना यश मिळवताना खडतर अडचणी आल्या. अनेकदा तर पहिल्यापेक्षा जास्त कठीण स्थिती तयार झाली. पण, आपल्या देशाने इतिहासातील ही गाठ ज्या गंभीरतेने आणि भावूकतेने सोडली, ते हेच सांगतेय की आपलं भविष्य आपल्या इतिहासापेक्षा खूप सुंदर होणार आहे.”
मोदींचे नाव न घेता विरोधकांवर शरसंधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. मोदी म्हणाले, “तो पण एक काळ होता, जेव्हा काही लोक म्हणत होते की, राम मंदिर बनलं तर आग लागेल. असे लोक भारताच्या सामाजिक भावनेच्या पवित्रतेला समजू शकले नाही. रामलल्लाच्या मंदिराचं निर्माण भारतीय समाजाच्या शांती, संयम, परस्पर सौहार्दता आणि समन्वयाचंही प्रतीक आहे”, असे बोल मोदींनी विरोधकांना सुनावले.
हेही वाचा >> लालकृष्ण अडवाणी आमंत्रण मिळूनही गेले नाही अयोध्येला, कारण…
“आपण बघतोय की निर्माण कुठल्या आगीला नाही, तर ऊर्जेला जन्म देत आहे. राम मंदिर समाजातील प्रत्येक घटकाला उज्ज्वल भविष्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रेरणा घेऊन आला आहे.”
राम आग नाहीये -मोदी
मोदी पुढे म्हणाले की, “मी त्या लोकांना (विरोधकांना) आवाहन करतो की, या. तुम्ही अनुभव घ्या. तुमच्या विचारांचा पुन्हा विचार करा. राम आग नाहीये. राम ऊर्जा आहे. राम विवाद नाही, राम समाधान आहे. राम फक्त आपले नाहीत, राम सगळ्यांचे आहेत. राम फक्त वर्तमान नाही, तर अनंतकाळ आहे.”
हेही वाचा >> “…तर भाजपसोबत आम्ही तुम्हालाही गाडू”, आंबेडकर ‘मविआ’वर कडाडले
“आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या समारंभाशी सर्व विश्व जोडले गेले आहे. जसा उत्सव भारतात होतोय, तसाच अनेक देशात होतोय. अयोध्येतील हा उत्सव रामायणातील वैश्विक परंपरांचाही उत्सव आहे. रामलल्लाची प्रतिष्ठा वसुधैव कुटुंबमचीही प्रतिष्ठा आहे. आज अयोध्येत फक्त रामांची प्राणप्रतिष्ठा झालेली नाहीये, तर त्या रुपात साक्षात भारतीय संस्कृतीप्रतीची अतूट विश्वासाची प्राणप्रतिष्ठा आहे. ही मानवीय मूल्ये आणि सर्वोच्च आदर्शांची प्राणप्रतिष्ठा आहे. या मूल्यांची, आदर्शांची गरज संपूर्ण विश्वाला आहे”, अशा भावना पंतप्रधाम मोदी यांनी व्यक्त केल्या.
ADVERTISEMENT