Raj Thackeray Maratha Reservation : (दीपेश त्रिपाठी, मुंबई) मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण देण्यासंदर्भातील हा निर्णय टिकणार नाही, असे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले. यावेळी त्यांनी शिंदे सरकारला काही सवालही केले.
ADVERTISEMENT
मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाले. या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "मला वाटतं की, मराठा समाजाने जागृत रहावं. हे तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे. मी चुकत नसेल, तर एक केस तामिळनाडूमध्ये झाली होती. राज्य सरकारने अशा प्रकारे आरक्षण दिलं होतं आणि ती केस अजूनही सुप्रीम कोर्टात सुरू आहे."
राज्य सरकारला अधिकार आहेत का? -राज ठाकरे
राज ठाकरेंनी काही मुद्दे यासंदर्भात उपस्थित केले. ते म्हणाले, "मूळात राज्य सरकारला या गोष्टीचे अधिकार आहेत का? ती गोष्ट आहे केंद्राची. ती गोष्ट आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची. मी मागेही सांगितलं होतं की, हा खूप टेक्निकल विषय आहे. नुसतंच सरकारने काहीतरी जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखं नाहीये."
"हे नक्की काय आहे, हे मराठा समाजाने एकदा त्यांना विचारावं. दहा टक्के दिलं म्हणजे काय केलं तुम्ही? कशामध्ये दहा टक्के दिले? तुम्हाला अधिकार कुणी दिले? तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का? परत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार, मग राज्य सरकार सांगणार की आम्ही आता काही करू शकत नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या याला काही अर्थ आहे का?", असा प्रश्नांचा भडीमार राज यांनी केला.
"फडणवीस सरकारच्या काळात लागू करण्यात आलेल्या कायद्याचं काय झालं? तेच या दहा टक्क्यांचं होणार ना? या देशांमध्ये इतकी राज्ये आहेत. अनेक जाती आहेत. समाजाने लक्ष देणे गरजेचे आहे", असे आवाहन राज ठाकरेंनी मराठा समाजाला केले.
मूळ विषयांकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे विषय -ठाकरे
"हे काय सुरू आहे, मला कळत नाहीये. मूळात राज्यासमोर इतके भीषण प्रश्न उभे आहेत. आपण फेब्रुवारीमध्ये आहोत आणि आज दुष्काळाचा, पाण्याचा विषय महाराष्ट्रामध्ये आहे. त्याकडे कुणाचं लक्ष नाही. निवडणुका, जातीपातीचं राजकारण, आरक्षणं याच गोष्टींकडे लक्ष वळवून मूळ विषयांकडे दुर्लक्ष करायचं. लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर या देशात किंवा राज्यात काही चालू आहे का? काही नाही", असे राज ठाकरेंनी यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT