Sambhaji Bhide : “भिडे हिंदुत्वाकरिता काम करतात”,देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं उत्तर?

भागवत हिरेकर

02 Aug 2023 (अपडेटेड: 02 Aug 2023, 02:30 PM)

संभाजी भिडेंविरुद्ध कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. त्याचबरोबर शिदोरी मासिकाविरुद्धही गुन्हा दाखल करणार असे सांगितले.

Devendra fadnavis statement in legislative assembly on sambhaji bhide controversy

Devendra fadnavis statement in legislative assembly on sambhaji bhide controversy

follow google news

Sambhaji Bhide Controversy : अमरावती येथे झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी महात्मा गांधी, महात्मा फुले, लोकहितवादी, राजाराम मोहन रॉय, साईबाबा यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत विधानं केली. त्यांच्याविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षातील आमदार आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी होत असून, आज विधानसभेत यावरून प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यावर निवेदन केलं. (Devendra fadnavis on Sambhaji Bhide controversy)

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणावर विधानसभेत निवेदन केले. ते म्हणाले, “संभाजी भिडे यांनी अमरावती येथे एक भाषण केले. त्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावले. त्यातील आशयावरून काही कमेंट्स केल्या आहेत. ती दोन पुस्तके डॉ. एस. के. नारायणाचार्य आणि घोष यांची आहेत. ते काँग्रेसचे नेते आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.”

वाचा >> Sambhaji Bhide: गांधी, फुले ते साईबाबा, भिडेंनी कुणालाच सोडलेलं नाही, तरीही…

फडणवीसांनी पुढे सांगितलं की, “त्यांच्या पुस्तकातील मजकूर संभाजी भिडे गुरूजी यांनी त्यांच्या सहकाऱ्यामार्फत उद्धृत केला. त्यातील एका पुस्तकाचे नाव द कुराण अॅण्ड द फकीर… या 192 पानाच्या पुस्तकाबद्दल व्हिडीओत दिसते. अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय दंड विधान कलम 153 अ, 500, 505 (2), 34 तसेच मपोका सह कलम 135 अन्वये 29 जुलै 2023 रोजी संभाजी भिडे गुरूजी व अन्य दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.”

भिडेंच्या सभेचे व्हिडीओ नाहीत -फडणवीस

“यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी गुरुजी उल्लेखांवर फडणवीसांना टोकले. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आम्हाला गुरुजी वाटतात. काय अडचण आहे? त्यांचं नाव भिडे गुरूजी आहे. असं आहे की संभाजी भिडे यांना सीआरपीसी 41 अ ची नोटीस पाठवली आहे. अमरावती पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि नोटीस बजावली. ती त्यांनी स्वीकारली आहे. त्यानुसार चौकशी होईल. अमरावती येथील या सभेचे व्हिडीओ उपलब्ध नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे”, अशी माहिती फडणवीसांनी विधानसभेत दिली.

वाचा >> Sambhaji Bhide : महात्मा फुलेंना शिव्या, साईबाबांना म्हणाले ‘भड@#’, भिडे बरळले

“माध्यमांमध्ये जे व्हिडीओ फिरत आहेत, ते निरनिराळ्या ठिकाणांचे व्हिडीओ आहेत. त्यामुळे त्याचे व्हाईस सॅम्पल घेण्यात येईल, असे अमरावती पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे यासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी देखील एक तक्रार केली आहे. ठाणे पोलिसांनी तक्रार दाखल करून ती अमरावती पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केली आहे. त्या तक्रारीसोबत जे संदर्भ आव्हाड यांनी दिले आहेत. त्याचा सुद्धा पोलीस तपास करत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

‘संभाजी भिडे हे हिंदुत्वाकरिता काम करतात, पण…’

या प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, “मी या सभागृहात पुन्हा एकदा सांगतो की, कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही जर अवमानजनक वक्तव्य केलं, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल. संभाजी भिडे गुरुजी, हे हिंदुत्वा करिता काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या किल्ल्यांशी बहुजन समाजाला जोडतात. हे कार्य चांगलं आहे, तरी देखील त्यांना महापुरुषांवर अशा प्रकारे वक्तव्ये करण्याचा कुणीही अधिकार दिलेला नाही. त्यांनाच काय कुणालाही अशा प्रकारचा अधिकार नाही.”

‘काँग्रेसच्या शिदोरी मुखपत्रावर गुन्हा दाखल करणार’

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महापुरुषांवर कुणीही अशा प्रकारे वक्तव्ये केले, तर त्याच्यावर कारवाई होईल. त्याचबरोबर वीर सावरकरांवर देखील आक्षेपार्ह लिखाण करण्यात येतंय. काँग्रेसचं मुखपत्र शिदोरी हे लिहितं की, वीर सावरकर हे माफीवीर होते. वीर सावरकर समलैंगिक होते. वीर सावरकर स्वातंत्र्य लढ्यात सामील नव्हते. ज्याप्रमाणे संभाजी भिडे गुरुजी यांच्या वक्तव्यावर कारवाई करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे वीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिदोरीवर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल.”

‘तुमचा दाभोळकर करू’, यशोमती ठाकुरांनी काय सांगितलं?

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, “ज्यावेळी मनोहर कुलकर्णी अमरावतीमध्ये आले, त्यावेळी काही आक्षेपार्ह महात्मा गांधींवर, महात्मा फुलेंवर हे सगळं बोलले. मी तिथे विरोध केला. त्यानंतर मला ट्विटरवर धमकी आलेली आहे. ‘दाभोळकर असाच ओरडत होता. एक दिवस जन्नतमध्ये पाठवला. आम्ही धारकरी कोथळे बाहेर काढतो, लक्षात असू द्या. दाभोळकर असाच ओरडत होता, टराटरा फाडून टाकला. हमारखोर कोण आहे बाई, हे स्पष्ट करा’, अशी धमकी दिलीये. कैलास सूर्यवंशी नावाचा हा माणूस आहे आणि तो धारकरी असल्याचे सांगतोय. आम्ही दाभोळकरांना मारलं, याची कबुली ते देत आहेत. उद्या जर माझ्या जीवाला काही झालं, तर त्याला जबाबदार कोण राहील?”, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘यशोमती ठाकूरांना पूर्ण सुरक्षा दिली जाईल. ज्याने धमकी दिलीये, त्याला शोधून काढून तुरुंगात टाकलं जाईल.’

    follow whatsapp