Sharad Pawar on Ram Mandir Pran Pratishtha : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुखांना आणि इतर नेत्यांनाही आमंत्रणं देण्यात आली आहेत. काँग्रेसने सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही, याबद्दल शरद पवारांनी भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT
शरद पवारांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात शरद पवार यांनी अयोध्येला येण्याच्या दौऱ्याबद्दल माहिती दिली असून, सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेसची भाषा शरद पवारांनी टाळली
राम मंदिरातील सोहळ्याला जाण्याबद्दल शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. पवारांनी या मुद्द्यावर भूमिका मांडतांना काँग्रेसची भाषा टाळली. काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर भाजपने टीका केली. त्याचबरोबर काँग्रेसमधील नेत्यांनीही पक्षश्रेष्ठीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसने सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार देताना म्हटले होते की, “भगवान रामांची पूजा कोट्यवधी भारतीय करतात. धर्म हा माणसाचा व्यक्तिगत विषय आहे. पण, भाजप आणि आरएसएसने वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा राजकीय बनवला आहे. त्यामुळे स्पष्ट आहे की अर्धवट काम झालेल्या मंदिराचं उद्घाटन केवळ निवडणुकीत लाभ घेण्यासाठीच केले जात आहे.”
हेही वाचा >> “ज्या माणसामुळे बाहेर पडावे लागले…”, शर्मिला ठाकरेंचे उद्धव ठाकरेंना खडेबोल
“२०१९ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना आणि लोकांच्या श्रद्धेचा सन्मा करत मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी भाजप आणि आरएसएसने आयोजित केलेल्या या आमंत्रण सन्मानाने नाकारत आहोत”, अशी भूमिका काँग्रेसने घेतली. पण, शरद पवार यांनी सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार देताना वेगळ्या मार्गाने भूमिका मांडली आहे.
शरद पवार यांचं पत्र जसंच्या तसं
प्रिय श्री राम नमस्ते
दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होत असलेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण मिळालं, त्याबद्दल मी आभारी आहे.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम भारताचेच नाही, तर जगभरात असलेल्या कोट्यवधी भक्तांचे श्रद्धा आणि आस्थेचे प्रतिक आहे. अयोध्येतील सोहळ्याबद्दल राम भक्तांमध्ये उत्सुकता आणि आतुरता आहे. ते मोठ्या संख्येने तिथे येत आहेत. त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचेल.
हेही वाचा >> उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंना प्रस्ताव; म्हणाले ‘आम्ही पाठिंबा देऊ’
२२ जानेवारीचा सोहळा संपल्यानंतर श्री रामलल्लाचे दर्शन सहज आणि आरामात घेता येईल. माझा अयोध्येला येण्याचा कार्यक्रम आहे. त्यावेळी श्रद्धेने रामलल्लाचे दर्शन घेईन. तोपर्यंत राम मंदिराची उभारणीही पूर्ण झालेली असेल.
आपण दिलेल्या निमंत्रणासाठी मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. हा सोहळ्या यशस्वी होण्यासाठी माझ्या शुभेच्छांचा स्वीकार करावा.
ADVERTISEMENT