Uddhav Thackeray On Rahul Narvekar Eknath shinde meeting before Mla Disqualification Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर १० जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देणार आहेत. पण, या निकालापूर्वी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरून उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना संतप्त सवाल केला आहे. त्याचबरोबर या भेटीची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येण्याआधीच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीकडे सुप्रीम कोर्टाचे लक्ष वेधले आहे.
नार्वेकर आणि शिंदे भेटीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, एका लवादाचे न्यायमूर्ती एका पक्षकाराची निकाला आधी भेट कशी घेऊ शकतात, असा मुद्दा उपस्थित केला आहे, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. त्यांनी या भेटीचा मुद्दा उपस्थित करत नार्वेकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाले, “दसऱ्याच्या माझ्या भाषणातही म्हटलं होतं की, हे प्रकरण आमच्या पुरतं मर्यादित नाहीये. देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, हे ठरवणारा हा निकाल असणार आहे. आपण पाहत आहात की, गेले दीड-दोन वर्ष सुनावण्या सुरू आहेत. गेल्या एप्रिल-मे मध्ये सुप्रीम कोर्टाने एका विशिष्ट कालमर्यादेत याचा निर्णय द्यावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्षांना दिली होती,”
हेही वाचा >> “नार्वेकरांचा निर्णय हाच भूकंप असेल”, चव्हाणांचं मोठं विधान
“वाजवी वेळ देताना सुप्रीम कोर्टाने मर्यादा टाकली नव्हती. त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत वेळ दिला होता. ज्या पद्धतीने ही सुनावणी चालली होती, तेव्हाच आमच्या लक्षात आलं की हा वेळकाढूपणा चालला आहे. ३१ डिसेंबर जवळ आल्यानंतर लवादाने सांगितलं की, आम्हाला वेळ वाढवून पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने ही १० जानेवारीपर्यंत दिली”, असा मुद्दा ठाकरेंनी यावेळी मांडला.
राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करताहेत -उद्धव ठाकरे
राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर आक्षेप घेत ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. निकाल देण्यापूर्वी लवादाच्या अध्यक्षांनी घेतल्या भेटीवर ठाकरे गटाने शंका घेतली आहे. याबद्दल ठाकरे म्हणाले, “माझी अशी अपेक्षा आहे की, १० जानेवारी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ते वेळ खेचतील आणि त्यानंतरही वेळकाढूपणा करण्याचा ते प्रयत्न करतील. हे अपेक्षित असलं, तरी एक गंभीर गोष्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केली आहे”, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
हेही वाचा >> “ठाकरे गटाचे 16 आमदार अपात्र होतील”, निकालाआधी शिंदेंच्या आमदाराचा दावा
“आजपर्यंत असं कधी झाल्याचं आजपर्यंत माझ्या ऐकिवात नाहीये. हे उघड उघड महाराष्ट्रात घडलं आहे. लवाद म्हणून विधानसभा अध्यक्ष तिकडे बसलेले आहेत. त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्र्यांना (एकनाथ शिंदे) घरी जाऊन भेटले. एक तर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं भेटू शकतात का, हा भाग वेगळा. आता ते ज्या भूमिकेत आहेत, त्याचा अर्थ असा आहे की, न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटले आहेत आणि एकदा नव्हे तर दोनदा. न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील, तर आम्ही यांच्याकडून कोणत्या न्यायाची आणि निकालाची अपेक्षा करावी, हा प्रश्न आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT