Sharad Pawar : "मंत्री म्हणतोय, पंतप्रधान मोदींना देशाची घटना बदलायचीय"

मुंबई तक

24 Mar 2024 (अपडेटेड: 24 Mar 2024, 10:56 AM)

Sharad Pawar Narandra Modi : देशाची घटना बदलण्याचे विधान भाजपचे मंत्री हेगडे यांनी केले. शरद पवारांनी हा मुद्दा अधोरेखित केला.

शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल.

शरद पवार यांनी बारामती येथील कार्यक्रमात मोदी सरकारवरला घटना बदलण्याच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले.

follow google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवार यांची पंतप्रधान मोदींवर टीका

point

अनंतकुमार हेगडे यांच्या विधानावर पवारांनी ठेवले बोट

point

बारामतीत पवारांचा व्यापाऱ्यांशी संवाद

Sharad Pawar Lok Sabha elections 2024 : (वसंत मोरे, बारामती) बारामतीमध्ये 'व्यापारी महासंघ मेळाव्या' पार पडला. या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर भाष्य करताना हुकुमशाही आणि संविधान या मुद्द्यांवरही बोट ठेवले. शेजारील राष्ट्रामधील परिस्थितीकडे लक्ष वेधत पवारांनी भारतातील घटना बदलाबद्दल भीती व्यक्त केली. (Sharad pawar lashed out Modi Government over policy issues)

हे वाचलं का?

बारामतीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, "आज सबंध देश निवडणुकीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आपण तसं भाग्यवान आहोत, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहली, त्या घटनेनं या देशामध्ये स्थैर्य आणलं, आणि व्यवसाय करण्याच्या संबंधीचे अडथळे दूर केले. जिथे घटना भक्कम नाही, त्या देशामध्ये काही ना काही वेगळं घडलं."

पवारांनी दिलं पाकिस्तान, श्रीलंकेचं उदाहरण

"बांग्लादेश हा शेजारचा देश आहे. तिथे मुजीबूर रहेमान नावाचे देशाचे प्रधानमंत्री होते. एक दिवशी त्यांची हत्या केली गेली आणि लष्कराच्या हातात सत्ता गेली. पाकिस्तान हा शेजारचा देश, तिथे लोकशाही होती, आणि अयूब खान नावाचा एक लष्कराचा अधिकारी आला, त्याने लोकशाही उध्वस्त केली. देशामध्ये हुकूमशाही सैन्याच्या हाताखाली आली. असंच श्रीलंकेमध्ये सुध्दा झालं. आजूबाजूला जिथे लोकशाही दुर्मीळ झाली, त्याठिकाणी हुकूमशाही अस्तित्वात आली, हे चित्र आपण पाहिलं", असेही पवार म्हणाले. 

हेही वाचा >> ''झ@$ला बोलतो, इकडे...'', अजित पवारांवर टीका करताना शिवतारेंची शिवराळ भाषा

"आज हिंदुस्थानामध्ये लोकशाहीचं संरक्षण करणं याची अत्यंत गरज आहे. संविधानाचं रक्षण करण्याची गरज आहे. मी गेल्या आठवड्यामध्ये कर्नाटकातल्या एका भाजप नेत्याचा जो पार्लमेंटमध्ये सभासद आहे. त्याचं भाषण ऐकत होतो. त्यांनी भाषणात काय सांगितलं की, आम्ही तुम्हाला मत मागतोय आणि या देशाची घटना नरेंद्र मोदींना बदलायची आहे. घटना बदलण्यासाठी तुम्ही आम्हाला विजयी करा. आणि अशी भूमिका मांडली, जो केंद्र सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचा मंत्री होता, आणि मोदींना यासाठी मतदान करा, हे जे सांगत आहेत हे अत्यंत धोक्याची परिस्थिती आहे. म्हणून या निवडणुकीकडे नेहमीपेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज आहे", असे आवाहन पवारांनी यावेळी केले.

"अनेक धोरणं आखली गेली. या धोरणांमध्ये सातत्य नाही. बारामतीमध्ये शेती हा महत्त्वाचा उद्योग आहे. शेतीमध्ये ऊसाचा धंदा हा मोठा धंदा आहे. आज काय चित्र दिसतंय, जगातील दोन नंबरचं साखर उत्पादन हे भारतामध्ये होतं आणि भारतात दोन नंबरचं उत्पादन हे महाराष्ट्रात होतं. काय धोरणं आखली? ऊसाची किंमत वाढली आनंद आहे. पण साखरेचं काय? साखर ही दुनियामध्ये पाठवली पाहिजे. निर्यातीचं धोरणं आखलं आणि एका दिवशी सांगून टाकलं की,  उद्यापासून निर्यातीवर बंदी. आज निर्यातीवर बंदी आहे. उत्पादन वाढवायचं, शेतकऱ्याला दोन पैसे देण्याची खात्री द्यायची. आणि जो माल तयार करतो त्याच्यावर विक्रीवर बंधनं आणायची. आज हे काम त्या ठिकाणी केलेलं आहे", असेही पवार म्हणाले. 

इथेनॉल निर्मितीच्या धोरणावरून पवारांची टीका

पवार यावेळी म्हणाले की, "आपण बारामतीमध्ये नुसती साखर केली नाही. आपण साखर केली, आपण वीज तयार केली, आपण इथेनॉल तयार केलं. नवीननवीन पदार्थ आपण याठिकाणी तयार करतोय. आणि त्याचं मार्केट कसं मिळेल याची काळजी घेतोय. मार्केट मिळालं म्हणजे उत्पादकाला २ पैसे आणि उत्पादकाच्या हातात दोन पैसे आले तर व्यापार वाढेल. आणि म्हणून हा निकाल घेतला."

हेही वाचा >> 'मविआ'ला आंबेडकरांचा अल्टिमेटम! महाराष्ट्रात गणित बदलणार

"सरकारने इथेनॉलचे कारखाने उभे करायला परवानगी दिली. लोकांनी बँकांचं कर्ज काढलं, कारखाने उभे केले. आणि ऑर्डर काढून टाकलं की, साखरेपासून इथेनॉल तयार करणं आजपासून बंद. म्हणजे तुम्ही सांगता, प्रधानमंत्री भाषण करताहेत, इथेनॉल करा, त्यासाठी कारखानदारी काढा. प्रधानमंत्र्यांवर लोकांनी विश्वास ठेवला. कर्ज काढलं, कारखानदारी उभी केली, आणि आता म्हणत आहेत, त्याच्यावर बंदी. हा व्यवसाय कसा करायचा? आज ऊसाची किंमत कमी आहे, याचा अर्थ शेतकऱ्यांचं पेमेंट कमी आणि शेतकऱ्यांचं पेमेंट कमी याचा अर्थ, अर्थव्यवस्था दुबळी व्हायची प्रक्रिया ही सुरु झालेली आहे", असा इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला.

    follow whatsapp