गणित विधानसभेचं: कोकण कोणाचं?, राणेंना ठाकरेंचं तगडं आव्हान

मुंबई तक

• 10:10 PM • 01 Jul 2024

Vidhan Sabha Election 2024 Sindhudurg: महाराष्ट्रातील तळकोकणातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 8 तालुके आणि सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली असे ३ विधानसभा मतदारसंघ आहेत. जाणून घेऊन नेमकं येथील राजकीय गणित कसं आहे.

गणित विधानसभेचं: कोकण कोणाचं?, राणेंना ठाकरेंचं तगडं आव्हान

गणित विधानसभेचं: कोकण कोणाचं?, राणेंना ठाकरेंचं तगडं आव्हान

follow google news

Vidhan Sabha Election 2024: माधवी देसाई, मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांना आता अवघे काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मुंबई Tak आपल्यासाठी खास 'गणित विधानसभेचं' ही विशेष सीरिज घेऊन आलोय. आजच्या या भागात आपण कोकणाचा आढावा घेणार आहोत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील तळकोकणातला गोवा सीमेलगतचा शेवटचा जिल्हा. या जिल्ह्यात ८ तालुके आणि सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली असे ३ विधानसभा मतदारसंघ आहेत. सिंधुदुर्गाचं राजकारण सध्या एकाच बड्या नेत्याभोवती फिरतं. ते म्हणजे माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजप खासदार नारायण राणे. 

हे वाचलं का?

लोकसभेला त्यांची ताकद सिद्ध केलीय. मात्र, विधानसभेला ही लढाई थेट नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे अशीच होणार. जिल्ह्यातील या तिन्ही विधानसभा मतदारसंघात ताकद कुणाची, विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक कोण आहेत? महाविकास आघाडी की महायुती कोणाचं पारडं जड आहे याच गोष्टींची उत्तरं जाणून घेऊयात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभेचं गणित 

मालवण, वेंगुर्ल्यातील निळेशार अद्भुत समुद्रकिनारे ते आंबोलीसारखं नयनरम्य थंड हवेचं ठिकाण ते सावंतवाडी, दोडामार्गचा आंबे- काजू- फणस- नारळ सुपारीच्या बागांनी बहरलेला पट्टा अशी विविधता या मतदारसंघांत दिसते. बागायतदारांचे, मच्छिमारांचे प्रश्न, अनेक दुर्गम गावातील रस्त्यांची दुर्दशा, दळणवळणाची अपुरी साधनं, पाणी- वीज अशा महत्वाच्या गोष्टींची वाणवा हे इथल्या मतदारांसाठी महत्वाचे मुद्दे आहेत.

हे ही वाचा>> Vidhan Parishad Election : भाजपने उमेदवारी दिलेले अमित गोरखे कोण?

सुरवातीला पाहूयात सावंतवाडी मतदारसंघाचं गणित. सावंतवाडीत महायुतीकडून विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. केसरकर यंदा चौथ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरतील. राष्ट्रवादी ते शिवसेना आणि बंडानंतर शिंदेंची साथ असा केसरकरांचा प्रवास राहिलाय. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचा राणेंच्या विजयात मोलाचा वाटा होता. सावंतवाडीत राणेंना 85,312 मतं पडली. तर, विनायक राऊतांना 53,593 मतं पडली. इथून राणेंना ३१ हजारांहून अधिक मताधिक्य मिळालंय. केसरकरांनी जुनं वैर विसरुन केलेल्या या मदतीची राणेंना विधानसभेला परतफेड करावी लागेल. त्यामुळे, यावेळी राणेंची ताकद ही केसरकरांसाठी जमेची बाजू असेल. 

आता विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीचं गणित कसं होतं ते पाहूयात. त्यावेळी, युतीकडून शिवसेनेतून केसरकर आणि भाजपकडून राणेंचे समर्थक राजन तेली उत्सुक होते. मात्र, केसरकरांना उमेदवारी मिळाली आणि पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यानं तेलींनी अपक्ष निवडणूक लडवली. राणेंनी त्यांची पूर्ण ताकद तेलींच्या पाठीशी उभी केली. ग्राफिक्स इन- त्यावेळी दिपक केसरकरांना 69,784 मतं पडली होती. तर, राजन तेलींना 56556 मतं पडली. राष्ट्रवादीच्या बबन साळगांवकरांना फक्त 5396 मतांवर समाधान मानावं लागलं. 

केसरकरांचा केवळ १३ हजार मतांनी विजय झाला होता. ग्राफिक्स आऊट. महायुतीकडून केसरकरांचं नाव जवळपास निश्चित असल्यामुळे तेली ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. तसं न झाल्यास ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतीलच. भाजपमधील दुसरे इच्छुक विशाल परब हेही बंडखोरी करण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाकडून कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा अर्चना घारे यांचं नाव चर्चेत आहे. महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंनाच मिळण्याची दाट शक्यता आहे. तसं झाल्यास या मतदारसंघात शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेत काँटे की टक्कर पाहायला मिळेल.

हे ही वाचा>> 'भ@ माझ्याकडे हात...', दानवेंची BJP आमदारला भर सभागृहात शिवीगाळ

आता पाहूयात कुडाळ मतदारसंघाचं चित्र. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे कट्टर शिलेदार वैभव नाईक कुडाळचे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात राणेंचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी खासदार निलेश राणेंच्या नावाची जोरदार चर्चा आहे. 2009 ला नारायण राणे कुडाळमधून विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ ला राणेंना पराभूत करत वैभव नाईक जायंट किलर ठरले होते. पुढे २०१९ ला वैभव नाईक दुसऱ्यांदा आमदार झाले. आता वैभव नाईक हॅटट्रीक करणार की त्यांचा विजयरथ रोखला जाणार हे पाहावं लागेल. नुकत्याच झालेल्या लोकसभेला वैभव नाईकांना त्यांच्याच पक्षाच्या विनायक राऊतांना मताधिक्य देता आलं नाही. 

कुडाळमध्ये नारायण राणेंना 79,513 मतं पडली. तर, विनायक राऊतांना 53,277 मतं पडली. राणेंना कुडाळमधून २६ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळालंय. आता २०१९ च्या विधानसभेला काय निकाल लागला होता पाहूयात. 

वैभव नाईकांना त्यावेळी 69168 मतं पडली होती. तर, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाईंना 54819 मतं पडली. त्यावेळी वैभव नाईकांचं मताधिक्य होतं १४ हजारांचं. दर १० वर्षांनी या मतदारसंघाचा आमदार बदलतो हा इतिहास आहे. यंदा या इतिहासाची पुनरावृत्ती होणार की वैभव नाईक नवा इतिहास घडवणार ते पाहावं लागेल. 

आता पाहूयात राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवली मतदारसंघाचं गणित. राणेंचा हा बालेकिल्ला २०१४ आणि १९ ला नितेश राणेंनीच राखलाय. फक्त फरक हा आहे की २०१४ ला ते काँग्रेसमध्ये होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून सतिश सावंत यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात लोकसभेला काय घडलं पाहूयात. 

या मतदारसंघात नारायण राणेंना पडलेली मतं आहेत 92,419. तर, विनायक राऊतांना 50,424 मतं पडली. राणेंना इथून सुमारे ४२ हजारांचं मताधिक्य मिळालंय. त्यामुळे, इथली राणेंची मक्तेदारी सिद्ध होतेय. आता २०१९ च्या विधानसभेचं बलाबल पाहूयात. त्यावेळी नितेश राणेंना 84504 मतं पडली. तर, सतीश सावंतांना 56388 मतं पडली होती. नितेश राणेंचं मताधिक्य होतं २८ हजारांचं. 

सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली हे तिन्ही मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरेंकडेच राहणार अशी दाट शक्यता आहे. आता बंडानंतर ठाकरेंबाबतचा सहानुभूतीचा फॅक्टर जरी असला तरी लोकसभेला ठाकरेंची शिवसेना कोकणातून हद्दपार झालीय. विधानसभेला हा गड ठाकरे राखणार का हे येणारा काळच ठरवेल.

    follow whatsapp