Mahim Vidhansabha: राज ठाकरेंच्या घरी काय घडलं, सदा सरवणकरांनी सगळंच सांगून टाकलं?

मुंबई तक

• 10:22 PM • 04 Nov 2024

शिवसेना नेते सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली. याबाबत सदा सरवणकर नेमकं काय म्हणाले ते पाहा.

सदा सरवणकरांनी सगळंच सांगून टाकलं?

सदा सरवणकरांनी सगळंच सांगून टाकलं?

follow google news

बातम्या हायलाइट

point

सदा सरवणकरांच्या घरापर्यंत गेले पण राज ठाकरे भेटलेच नाही

point

राज ठाकरेंनी सदा सरवणकरांना भेट नाकारली

point

सदा सरवणकरांनी नेमकं काय सांगितलं..

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ हा माहीमचा आहे. जिथून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. जेव्हापासून अमित ठाकरे यांच्या नावाची माहीम मतदारसंघासाठी घोषणा झाली तेव्हापासूनच या मतदारसंघातून सदा सरवणकरांवर सातत्याने दबाव वाढत होता. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत मागे हटायचं नाही असं ठरवलेल्या सरवणकरांनी आपला अर्ज कायम ठेवला. पण त्याआधी काही तोडगा निघावा यासाठी सदा सरवणकरांनी राज ठाकरेंची त्यांच्या घरी भेट मागितली होती. मात्र, ही भेट नाकारण्यात आली. (maharashtra assembly election 2024 mahim vidhan sabha what happened at raj thackerays house sada saravankar told everything)

हे वाचलं का?

दरम्यान, फॉर्म मागे घ्यायच्या दिवशी माहीम मतदारसंघात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांच्यावर बराच दबाव होता. अर्ज घेण्यासाठी काही तास उरलेले असतानाच सदा सरवणकर हे थेट 'वर्षा'वर पोहचले. जिथे त्यांनी 1 तास मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली.

हे ही वाचा>> Raj Thackeray Dombivali : हिंदुहृदयसम्राट काढलं, जनाब लावलं.... पहिल्याच सभेत उद्धव ठाकरेंवर वार, शिंदे-अजितदादांनाही टोले

यानंतर बाहेर येत त्यांनी माध्यमांना सांगितलं की, 'मी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अमितजी निवडून आलेच पाहिजे अशी आमची भावना आहे. तिथलं जे समीकरण आहे हे समीकरण अमितजी निवडून येतील अशी काही खात्री नाही. म्हणून राजसाहेबांना आम्ही जाऊन भेटणार आहोत. त्यांना विनंती करणार आहोत. तसंच जे समीकरण आहे ते समजवून सांगणार आहोत.'

सदा सरवणकरांना राज ठाकरे भेटले नाही... 

दरम्यान, काही वेळातच सदा सरवणकर हे 'शिवतीर्थ' येथे पोहचले. पण राज ठाकरेंची भेट मिळावी यासाठी त्यांनी आपला मुलगा समाधान सरवणकर आणि काही पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंच्या घरी पाठवलं आणि ते स्वत: शिवतीर्थ जवळच थांबले. 

पण समाधान सरवणकर आणि राज ठाकरे यांच्यात नेमकं काय घडलं हे सदा सरवणकर यांनी तात्काळ मीडियाला सांगितलं.

सरवणकर म्हणाले, 'राज साहेबांना भेटायला माझा मुलगा आणि माझे 4 पदाधिकारी हे गेले होते. त्यांनी वेळ मागितली होती की, बाजूलाच पप्पा आहेत. ते आपल्याला भेटू इच्छितात आणि निवडणुकीच्या बाबतीत बोलू इच्छितात. तर राज साहेबांनी सांगितलं की, मला काही बोलायचं नाही. तुम्हाला उमेदवारी मागे घ्यायची असेल तर घ्या नाहीतर लढा.'

हे ही वाचा>> Kolhapur: '%# मारायला... मला तोंडघशी पाडलं, दम नव्हता तर...', सतेज पाटलांचा पारा एवढा का चढला?

'त्यामुळे पुढे काहीही बोलणं झालं नाही. त्यांनी भेट सुद्धा नाकारली. मला असं वाटतं की, त्यामुळे आता निवडणूक लढवणं.. मला कुठेतरी जाऊन विनंती करायची होती. पण त्यांनी भेटच नाकारली. त्यानंतर माझ्यासारख्यांनी काय करायला पाहिजे? मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझी अशी इच्छा होती की, त्यांच्याशी बोलून त्यांना काही समीकरणं समजवावी. पण ते म्हणाले मला काही भेटायचं नाही.. तुम्हाला जे काही करायचंय.. उभं राहायचंय तर उभं राहा..'

'राज ठाकरेंची आम्ही खूप इज्जत करतो. माझ्या मुलाने आणि पदाधिकाऱ्यांनी राज साहेबांना सांगितलं की, मुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी चर्चा करायला सांगितली. तुम्ही जे काही म्हणाल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. पण त्यांनी सांगितलं की, मला भेटायचंच नाही.' 

'मला वाटतं विषय संपलेला आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे. कारण भेटच मिळणार नसेल तर मला असं वाटतं की, उमेदवार म्हणून मला निर्णय घ्यावा लागेल.' 

'मी महायुतीचा उमेदवार म्हणून रिंगणात आहे. आम्ही एक हात नाही.. दोन्ही हात पुढे केले होते. राज साहेब जे सांगणार ते ऐकायच्या मनस्थितीत आम्ही होतो. ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे वागायचं ठरवलं होतं. पण त्यांनी भेटच नाकारली. ही भेट आम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेण्यास सांगितली होती.' 

'मुख्यमंत्र्यांच्या मनात सुद्धा तसंच होतं की, कुठे तरी तडजोड करून हे संपायला हवं. पण राज साहेबांनी भेट नाकारली. मला कोणाशी बोलायचं नाही..' 

'त्यांनी मला सकारात्मक भेट दिली असती किंवा काही बोलले असते.. राज साहेब हे आमचे आदरणीय नेते आहेत. आम्ही त्यांचा मान-सन्मान निश्चित केला असता. पण भेटच नाकारली, बोलायचंच नाही असं म्हटल्यावर मी काय करू शकतो सामान्य माणूस?' असं सदा सरवणकर यावेळी म्हणाले.

    follow whatsapp