Raj Thackeray Vs Eknath Shinde : शिंदे मुलाखतीत बोलले, आता राज ठाकरे भर सभेत बरसले; माहिममुळे अंतर वाढलं? वाचा सविस्तर

मुंबई तक

05 Nov 2024 (अपडेटेड: 05 Nov 2024, 09:09 AM)

अमित ठाकरे यांना महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांचा सामना करावा लागणार हे अटळ आहे. मात्र एकूणच या सर्व लढतीमुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. 

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरे डोंबिवलीच्या सभेत शिंदेंवर बरसले

point

एकनाथ शिंदे-राज ठाकरेंमध्ये बेबनाव?

point

राज ठाकरेंनी सरवणकरांना भेट का नाकारली

राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे मुंबईतला दादर-माहिम विधानसभा मतदारसंघ. महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सदा सरवणकर यांना इथून उमेदवारी आहे, तर मनसेकडून खुद्द राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मैदानात आहेत. त्यानंतर आता या मतदारसंघावरुन वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. आधी एकनाथ  शिंदे यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्याबद्दल एक खुलासा केला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी  डोंबिवलीतील सभेतून थेट शिंदेंवर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून राज ठाकरे यांनी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही वेगवेगळ्या कारणांवरुन राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आल्याचं दिसलं. त्यावरुन विधानसभेला एकत्र येण्याची शक्यताही वर्तवली जात होती. मात्र तसं घडलं नाही. अमित ठाकरे यांना महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांचा सामना करावा लागणार हे अटळ आहे. मात्र एकूणच या सर्व लढतीमुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. 

राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते शिंदे? 

एएनआयच्या मुलाखतीत एकनाथ शिंदेंनी माहिमच्या जागेवरुन बोलताना, राज ठाकरे यांनी कसे चर्चा न करता उमेदवार दिलेत याबद्दल बोलून दाखवलं होतं. "लोकसभेला राज ठाकरे आमच्यासोबत होते, माझी आणि त्यांची चर्चाही झाली होती, तुमची काय रणनीती आहे असं मी त्यांना विचारलंही होतं, तेव्हा ते म्हणाले होते की, तुमचं शिवसेना-राष्ट्रवादी-भाजपचा निर्णय होऊ द्या, पण त्यांनी नंतर थेट उमेदवार उभे केले" असं शिंदेंनी दादर माहिम मतदारसंघाबद्दल बोलताना सांगितलं. दादर माहिमध्ये उभे असलेले आमचे उमेदवार हे तिथले दोन वेळा आमदार राहिले आहेत, ते आमचे जुने कार्यकर्ते आहेत. मी त्यांच्यासोबतही बोललो, पण त्यांचे समर्थक खूप आक्रमक झाले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल तुटू नये याची काळजी एक नेता म्हणून मी घेतोय असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. त्यामुळे आम्ही महायुती म्हणून तिथून निवडणूक लढणार असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.

सदा सरवणकर यांना भेट नाकारली 

सदा सरवणकर हे काल अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी धावपळ करताना दिसले. ते सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले. त्यानंतर ते चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे जाणार होते. त्यांनी आपला मुलगा समाधान सरवणकर यांच्याकडे तसा निरोपही पाठवला. राज ठाकरेंचं बोलावणं येईल म्हणून सदा सरवणकर वाट पाहत होते. मात्र राज ठाकरेंनी 'तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल तो घ्या' असा निरोप समाधान सरवणकर यांच्याकडे पाठवला आणि सदा सरवणकर यांना भेट नाकारली असं स्वत: सदा सरवणकर यांनी सांगितलं. तसंच हे सगळं करावं ही शिंदेंची इच्छा होती असंही सदा सरवणकर म्हणाले होते. 


डोंबिवलीतील सभेत राज ठाकरेही बरसले

राज ठाकरे यांनी काल डोंबिवलीमध्ये पहिली प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी चौफेर टीका केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. "सुरुवातीला अजित पवार नको म्हणून मविआतून बाहेर पडलेल्या शिंदेंना अजित पवार महायुतीत आले तेव्हा कसं चाललं?" असा एक खोचक सवाल राज ठाकरेंनी केला. तसंच एकनाथ शिंदे यांच्या एका सभेत, ते येण्यापूर्वी भोजपुरी गाण्यावर डान्स केला जात होता. ही युपी, बिहारची संस्कृती आहे... हीच का लाडकी बहीण म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.त्यानंतर  शिवसेना आणि धनुष्यबाण ही ना उद्धव ठाकरेंची, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे ती बाळासाहेबांची संपत्ती आहे असं म्हणत पुन्हा एकदा निशाणा साधला.

एकूणच या सर्व घडामोडी पाहता, राज ठाकरे जरी माहिमवरुन शिंदेंना किंवा सदा सरवणकर यांना काही बोलत नसले, तरी दोन्ही नेत्यांमध्ये अंतर वाढलेलं दिसतंय. तसंच अनेक ठिकाणी राज ठाकरे यांनी महायुतीविरोधातही उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडणार हे विधानसभेच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

    follow whatsapp