सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनवडी गावात उसतोडणीसाठी आलेल्या मुजरांच्या टोळीतील ११ महिन्याच्या मुलीचा भाजून मृत्यू झाला आहे. उसाच्या फडात पाचोळ्याला लागलेल्या आगीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. नंदिनी सोमय्या वरवी असं या दुर्दैवी बालिकेचं नाव आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातून ही उसतोड मजुरांची टोळी बनवडी गावात उस तोडणीला आली होती. गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातला उस तोडण्याचं काम सुरु असताना त्या मजुरांपैकी सोमय्या वरवी यांच्यासोबत त्यांची ११ महिन्यांनी मुलगी नंदिनी देखील होती. सोमय्या यांच्या पत्नीने ऊसतोडणी सुरू असताना नंदिनीला एका झोळीमध्ये बांधून झोपवलं.
यानंतर संध्याकाळी सहा वाजल्याच्या दरम्यान काम सुरु असताना ज्या ठिकाणी नंदिनीला झोळीत ठेवलं होतं त्याखाली पालापाचोळ्याला आग लागल्याचं मजुरांच्या लक्षात आलं. यानंतर मजुरांनी तिकडे तात्काळ धाव घेत ही आग विझवली. परंतू तोपर्यंत नंदिनी या आगीत गंभीररित्या भाजून जखमी झाली होती.
मजुरांनी तिला तातडीने कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कराड शहर पोलिसांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला. तसेच तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अकरा महिन्यांच्या मुलीचा भाजुन दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. याबाबतची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे. हवालदार देशमुख तपास करीत आहेत.
ADVERTISEMENT