अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चोरीचं सोनं खरेदी केल्याप्रकरणी सराफ व्यवसायिकाला कोठडीत मारहाण आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचं समजतंय.
ADVERTISEMENT
काय होतं हे प्रकरण, जाणून घ्या…
९ जानेवारीच्या रात्री अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने पीडित सराफ व्यवसायिकाला चोरीचं सोनं खरेदी केल्याप्रकरणी अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी नितीन चव्हाण आणि शक्ती कांबळे हे सराफ व्यवसायिकाच्या घरात शिरले आणि त्याच्या कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करत सराफाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
पोलीस कोठडीत गेल्यानंतर नितीन चव्हाण आणि शक्ती कांबळे या दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्यावर अमानुष अत्याचार करायला सुरुवात केल्याचा आरोप या पीडित सराफ व्यवसायिकाने केला होता. गाडीतून पोलीस ठाण्यात नेत असतानाही आपल्याला मारहाण करत तोंडावर थुंकल्याचा आरोप या सराफाने केला आहे. तसेच कोठडीत चौकशीदरम्यान सोनं चोरी प्रकरणातील इतर दोन आरोपींकडून सराफ व्यवसायिकावर लैंगिक अत्याचार करायला लावल्याचाही धक्कादायक गौप्यस्फोट पीडित सराफाने केला होता.
पीडित सराफ व्यवसायिक हा शेगावचा असल्यामुळे अकोला आणि बुलढाणा पोलिसांच्या अतिरीक्त पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात दोन समिती बसवण्यात आल्या. या दोन्ही समित्यांचा अहवाल उद्यापर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचं कळतंय. परंतू प्राथमिक चौकशीच सराफ व्यवसायिकावर कारवाईसाठी गेलेली पोलीस टीम दोषी आढळल्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस शिपाई शक्ती कांबळे, विरेंद्र लाड, मोंटी यादव, काटकर आणि चालक पवार यांना निलंबीत करण्यात आलं आहे. या प्रकरणात मुंबई तक ने पीडित सराफ व्यवसायिकाची बाजू लावून धरली होती.
ADVERTISEMENT