मुंबईसह महाराष्ट्र आणि देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर लोकांना होतो आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन हा जास्त वेगाने पसरतो आहे. अशात आता मुंबईच्या बाबतीत एक नवी माहिती समोर आली आहे. मुंबईत 89 टक्के कोरोना बाधित रूग्णांना ओमिक्रॉनने ग्रासलं आहे अशी माहिती आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार किती झाला? याची पडताळणी करण्यासाठी करण्यात आलेल्या आठव्या चाचणीचे निष्कर्ष पालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केले आहेत. यामधील चाचण्यांसाठी 373 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 280 नमुने हे मुंबई महापालिका क्षेत्रातले होते. तर बाकीचे नमुने हे मुंबई महापालिकेच्या बाहेरचे होते. मुंबईतल्या 280 नमुन्यांपैकी 248 नमुने म्हणजेच 89 टक्के नमुने हे ओमिक्रॉनचे असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईतल्या गल्ली बोळात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट पोहचला असल्याचं स्पष्ट झालं आहे.
चिंतेची बाब ! अमरावतीत आढळले Omicron चे दोन सब-व्हेरिएंट
8 टक्के नमुने हे डेल्टा या उपप्रकाराचे आहेत, बाकीचे 3 टक्के नमुने हे इतर उपप्रकाराचे आहेत. कोरोनाच्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग हे ऑगस्ट 2021 पासून करण्यात येतं आहे. त्या अंतर्गत आठव्या फेरीचे जे निष्कर्ष समोर आले आहेत त्यामध्ये 89 टक्के मुंबईकरांना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने ग्रासलं असल्याचं समोर आलं आहे.
280 रुग्णांपैकी 34 टक्के अर्थात 96 रुग्ण हे 21 ते 40 या वयोगटांतील आहेत. या खालोखाल 28 टक्के म्हणजेच 79 रुग्ण हे 41 ते 60 या वयोगटातील आहेत. 25 टक्के म्हणजेच 69 रुग्ण हे 61 ते 80 या वयोगटांतील आहेत. 8 टक्के म्हणजेच 22 रुग्ण हे 0 ते 20 या वयोगटांतील; तर पाच टक्के म्हणजे 14 रुग्ण हे 81 ते 100 या वयोगटांतील आहेत. चाचण्या करण्यात आलेल्या 280 नमुन्यांमध्ये 0 ते 18 या वयोगटांतील 13 नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, 2 नमुने 0 ते 5 वर्षे या वयोगटांतील, 4 नमुने 6 ते 12 वर्षे या वयोगटांतील; तर 7 नमुने 13 ते 18 वर्षे या वयोगटांतील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या कोरोना विषाणूंच्या उपप्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. मात्र या रुग्णांना कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.
लहान मुलांसाठी डेल्टापेक्षा जास्त घातक ठरू शकतो ओमिक्रॉन, काय म्हणत आहेत तज्ज्ञ?
मुंबईत तिसरी लाट ओसरायला लागली असून गेल्या तीन दिवसांत रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली. मुंबईत सोमवारी 1857 नवे करोना रुग्ण आढळले, तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 503 रुग्ण करोनामुक्त झाले. शहरात सध्या 21,142 रुग्ण उपचाराधीन आहेत. शहरातील सोमवारी 11 करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील नऊ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. .
ADVERTISEMENT