रोहिदास हातागळे, बीड
ADVERTISEMENT
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व करुणा शर्मा प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पत्रकार परिषद घेऊन आपण धनंजय मुंडेंविरोधात अनेक पुरावे देणार असल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलं होतं. दरम्यान, परळीत गेल्यानंतर काही महिलांनी करुणा शर्मा यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी जवळजवळ 100 हून अधिक महिला तिथे होत्या.
आता याच प्रकरणी करुणा शर्मा यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात संबंधित महिलांविरोधात तक्रार नोंदवली आहे. ज्यानंतर 80 ते 100 महिलांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे करुणा शर्मा या स्वत: न्यायालयीन कोठडीत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
करुणा शर्मा (मुंडे) यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत परळीत पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत आपण आपले पती व इतरांच्या विरोधात अनेक पुरावे सादर करून काही गोष्टींचा व षडयंत्राचा खुलासा करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, परळी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती.
दरम्यान, वैद्यनाथ मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रविवारी (5 सप्टेंबर) परळीत आल्यावर करुणा यांना वैद्यनाथ मंदिरासमोर जमावाने रोखले. ‘तेव्हा काही महिलांनी आम्ही वेगवेगळ्या जाती-समूहाच्या असून धनंजय मुंडे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर तुम्ही बेछूट आरोप करू नका’, असे म्हटले.
‘यावेळी करुणा यांनी जातीवाचक शिवीगाळ केली तर याच वेळी त्यांच्या सोबत असलेल्या अरुण मोरे याने बेबी तांबोळी या महिलेवर चाकूहल्ला केला.’ अशी फिर्याद विशाखा घाडगे यांनी पोलिसात दिली. याच फिर्यादीवरून करुणा शर्मा व अरुण मोरे यांच्याविरोधात अट्रोसिटी, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच चालकालाही 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
karuna sharma : मला दबाव टाकून पैसे उकळायचेत; करुणा शर्मांची कथित ‘कॉल रेकॉर्डिंग’ व्हायरल
दुसरीकडे आता याच प्रकरणी करुणा धनंजय मुंडे यांनी देखील पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. करुणा यांच्या तक्रारीवरून 80 ते 100 जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 143/2021 कलम 188,143,504, 506 भादवि नुसार कोव्हिड नियमांचे उल्लंघन केल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणात करुणा धनंजय मुंडे या सध्या तुरुंगात असल्या तरीही त्याचवेळी त्यांनी 100 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT