विजयकुमार बाबर, प्रतिनिधी, सोलापूर
ADVERTISEMENT
सोलापूरमध्ये गावठी पिस्तूल आणि गुप्तीचा धाक दाखवून लोकांना जीवे ठार मारण्याची धमकी देत, त्यांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या डीबी पथकाने ही कारवाई केली आहे. 2 लाख 20 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सागर अरुण कांबळे (वय 22 रा. न्यू बुधवार पेठ भीम विजय चौक सोलापूर), बुद्धभूषण नागसेन नागटिळक (वय 26 रा. न्यू बुधवार पेठ आंबेडकर उद्यान समोर, आनंद चौक) सतीश उर्फ बाबूलाल अर्जुन गायकवाड (वय 25 रा. १२६, बुधवार पेठ मिलिंदनगर सोलापूर) अक्षय प्रकाश थोरात (वय 26 रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवार पेठ विश्वदीप चौक सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
डीबी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक केतन मांजरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की , काही तरुण जुना तुळजापूर नाका ते रुपाभवानी मंदिर दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जवळील पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण आणि लुटमार करत आहेत. मिळालेल्या माहितीवरून डीबी पथकाच्या पोलिसांनी रुपाभवानी मंदिराकडून जुना तुळजापूर नाकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सापळा रचला होता.
चौघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, धारदार गुप्ती, चार मोबाईल, दोन मोटारसायकली आढळून आल्या. मोबाईलमध्ये मिळालेल्या व्हिडिओची दोन पंचांसमक्ष तपासणी केली असता, त्यामध्ये गावठी पिस्तुल आणि धारदार गुप्तीचा रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना धाक दाखवणे, त्यांना मारहाण व दमदाटी करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांना विवस्त्र करणे. अनैसर्गिक अत्याचार करण्यास भाग पाडणे, शेण खाऊ घालने, आदी विक्षिप्त प्रकारचे व्हिडिओ मोबाईलमध्ये आढळून आले.रेकॉर्डिंग करण्यात आलेले व्हिडिओ एकमेकांमध्ये व्हॉट्स अॅपद्वारे प्रसारित केल्याचे दिसून आले. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या टोळीकडे बेकायदा शस्त्रं आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यांना शस्त्र बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतलं. त्यावेळी जे मोबाइल मिळाले, त्यात विचित्र प्रकारचे व्हीडिओ होते. रस्त्यात अंधाराचा फायदा घेऊन एकट्या व्यक्तीला अडवणं, त्याला विवस्त्र करून त्याला अनैसिर्गिक कृत्य करायला लावणे, शेण खायला लावणे असे विक्षिप्त आणि घृणास्पद प्रकार हे चौघेजण करत होते. त्यामुळे या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही विकृत कृत्यं ही मुलं का करत होती याची चौकशीही केली जात आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. वैशाली कडूकर यांनी मुंबई तकशी बोलताना दिली आहे.
ADVERTISEMENT