प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
ADVERTISEMENT
नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा येथील वैशाली सोमनाथ बेंडकोळी या गर्भवती महिलेला चक्क झोळीद्वारे तीन किलोमीटर पायपीट करत पक्क्या रस्त्यावर घेऊन यावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. दुसरीकडे गावांमध्ये पुरेशा सुविधा पोहचल्या नाहीत हे चित्र दिसतं आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या हेदपाडा गावात नेमकी काय घडली घटना?
गावातील वैशाली यांना प्रसुतीच्या कळा सुरू झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी नातलगांनी चिखलातून तीन किलोमीटर पायपीट करत झोळी करून तिला रुग्णालयात दाखल केले. याच गावात तीन वर्षांपूर्वी देखील सर्पदंशाने एका युवतीचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. गरोदर महिलेला झोळीतून पायपीट करून घेऊन जात असतानाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
३०० लोकवस्ती असलेल्या या गावात साध्या सुविधा नाहीत
त्रंबकेश्वर अंबोली या मुख्य रस्त्यापासून ८ किलोमीटरवर असलेल्या अंबोली येथील शासकीय रुग्णालयात या महिलेने एका मुलीला जन्म दिला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगणजवळ मेटकावरा आणि हेदपाडा ही दोन गावे आहेत. ३०० लोकवस्ती असलेल्या हेदपाडा गावातील लोकांना दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याची समस्या सतावते. या गावात जाण्यासाठी रस्त्याचा चिखल झाल्याने रस्ता बंद होतो, पक्का रस्ता मंजूर असतानाही डांबरीकरणाऐवजी मातीचा रस्ता तयार केला जातो. दर पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होत असल्याने दुचाकी नेणेही मुश्किल होते असा दावा गावकऱ्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT