बॉलीवुडचा सुपरस्टार अक्षय कुमार आता मराठी सिनेमात पदार्पण करतो आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित करत असलेला आगामी मराठी सिनेमा वेडात मराठे वीर दौड़ले सात या सिनेमातून अक्षय कुमार मराठी सिनेमात पदार्पण करतोय . अक्षय कुमार या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सिनेमाची घोषणा
मुंबई मध्ये झालेल्या कार्यक्रमात या सिनेमाची घोषणा करण्यात आली . ज्यात अक्षय कुमार छत्रपति शिवाजी महाराजांची भूमिका करतोय हे जाहिर करण्यात आले , यावेळी अक्षय कुमारची ग्रँड एंट्रीही झाली . यावेळी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते .
महेश मांजरेकर यांनी काय म्हटलं आहे?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर भव्य सिनेमा करावा असं अनेक दिवस माझ्या मनात होतं. त्यानुसार मी हा चित्रपट तयार करण्यास सुरूवात केली आहे. आपण कन्नड किंवा दाक्षिणात्य सिनेमा असो किंवा इतर कुठलाही सिनेमा असो त्याचं कौतुक करतो. 300 सिनेमासारखा प्रयोग इंग्रजी भाषेत झाला तसाच प्रयोग मराठीत करण्याचा माझा प्रयत्न आहे. हा सिनेमा बिग बजेट असणार आहे असं महेश मांजरेकर यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सिनेमाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारळ वाढवून तर राज ठाकरे यांनी क्लॅप देऊन या सिनेमाचा शुभारंभ केला. वेडात मराठे वीर दौडले सात असं या सिनेमाचं नाव आहे.
ADVERTISEMENT